Home महामुंबई हौस राम मंदिराची

हौस राम मंदिराची

1

जगभरात प्रगतीची नवनवीन दालने खुली होत असताना भारतीय तरुणांनी प्रगतीपथावर वाटचाल करण्याऐवजी जुनाट कल्पनांना चिकटून राहण्याचा मार्ग अनुभवला तर त्यातून होणारे नुकसान कधीही भरून काढता येणार नाही, एवढे मोठे असेल. प्रत्येकाच्याच मनात त्याची स्वत:ची अशी काही श्रद्धास्थाने असतात. ती जपायला हवीत आणि त्यांचा सन्मानही करायला हवा; पण जग पुढे चालले असताना तरुण पिढी अशा श्रद्धास्थानाचे अवडंबर माजवत राहिली तर ते कधीही भरून न येणारे असेल. जुने ते सोने असे म्हणत आता ज्यांची गरज नाही, अशा गोष्टींनाही आपलेसे करा, असे सल्ले देणारी व्यक्ती कितीही नामवंत आणि प्रज्ञावंत असली तरी आपल्या मनाला पटणारे निर्णयच तरुणांनी घ्यायला हवेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस पुणे मुक्कामी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अयोध्येतील वादग्रस्त भूमीवर राममंदिर उभारणे आवश्यक असल्याचे भागवत यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला. राममंदिराची उभारणी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रम पत्रिकेवरील अनेक वर्षापासूनचा महत्त्वाचा विषय आहे. राम मंदिर उभारण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देताना भागवत यांनी प्रभू श्रीराम हे आदर्श पुरुष होते आणि त्यांचा आदर्श या पुढेही जपता यावा, यासाठी अयोध्येत राम मंदिराची उभारणी किती आवश्यक आहे, हे विशद करण्याचा प्रयत्न केला. आपण काहीही सांगावे आणि विद्यार्थ्यांनी ते ऐकावे, अशी बहुधा भागवत यांची समजूत असावी; पण, महाविद्यालयीन विद्यार्थी अगदीच बोळ्याने दूध पिणारे नसतात. समोरचा वक्ता आपल्याला काहीही सांगतोय की, आपल्यावर काही लादण्याचा प्रयत्न करतोय, हे कळण्याएवढी समज त्या विद्यार्थ्यांची नक्की असावी. त्यामुळेच राम मंदिर उभारल्याने गरिबांना जेवण मिळेल का, असा बोचरा सवाल एका विद्यार्थ्यांने केला. मंदिराची उभारणी होत नव्हती तेव्हा तरी गरिबांना जेवण कुठे मिळत होते, असा प्रतिप्रश्न करून मोहन भागवत यांनी त्या विद्यार्थ्यांला निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला; पण त्यामुळे त्याच्या प्रश्नातील दाहकता अजिबात कमी होत नाही. भारतात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेली कोटय़वधी कुटुंबे आहेत. उद्या त्या विद्यार्थ्यांचाच प्रश्न घेऊन ही कोटय़वधी कुटुंबे भागवतासमोर उभी राहिली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांकडे त्याचे उत्तर असेल का? अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या इर्षेतूनच १९९२ साली बाबरी मशीद पाडण्याचा कार्यक्रम काही संघटनांनी हाती घेऊन तो तडीसही नेला. बाबरी मशिदीचे पतन उत्तर प्रदेशात झाले. त्याचे जे काही बरेवाईट परिणाम भोगायला हवे होते ते उत्तर प्रदेश सरकारने आणि त्या राज्यातील जनतेने भोगले; पण, बाबरी मशीद पडल्यानंतर भारतभरातून त्यावर आततायी पाऊल अशी प्रतिक्रिया उमटताच उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह गडबडून गेले आणि सा-या प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन मोकळे झाले. बाबरी मशीद उत्तर प्रदेशात पडली तरी त्या प्रकरणानंतर बाबरीचे चाहते कमालीचे संतप्त झाले आणि त्यातूनच पुढे दंगल उसळली. ही दंगल उत्तर प्रदेशात नव्हे तर मुंबईत उसळली. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. त्याच दिवशी रात्री मुंबईत दंगलीचे पडसाद उमटायला सुरुवात झाली. पूर्ण डिसेंबर महिनाभर मुंबई भीतीच्या छायेखाली होती. डिसेंबर महिना संपला. दंगल काहीशी आटोक्यात आल्याची चिन्हे दिसत होती. पुढचा महिना म्हणजे जानेवारी १९९३ आणि पुढे फेब्रुवारी १९९३मध्येही मुंबई शांत होती. मुंबई रुळावर आली आता कसलीच भीती नाही. दोन समाजांमधील विद्वेषाचे वातावरण निवळत आहे, असे वाटत असतानाच मार्च महिना उजाडला आणि १२ मार्च १९९३ रोजी लागोपाठ १२ ठिकाणी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांनीमुंबई अक्षरश: हादरून गेली. नि:शब्द झाली. बॉम्बस्फोटात शेकडो निष्पापांनी आपले जीव गमावले. बॉम्बस्फोटांत होरपळून मेलेल्या, दंगलीत जखमी होऊन प्राण सोडलेल्यांच्या वारसांचे सांत्वन करायला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एखादा नेता कुणाच्या दारी गेल्याचे ऐकिवात नाही. आपल्या वक्तव्याने लोक नाराज होत असतील, हिंसाचारात खतपाणी मिळत असेल तर अशी वक्तव्ये करणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी टाळायला हवे. भाजपा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच राजकीय शाखा आहे.

त्यामुळे केंद्रातील भाजपा सरकारने, त्या सरकारमधील मंत्र्यांनी आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संघाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे, अशी संघाच्या नेत्यांची अपेक्षा असावी; पण नरेंद्र मोदी संघाला फारसे जुमानत नाहीत. ते आपले परदेश दौरे, स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन या विश्वातच रममाण झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे मोदी आपल्याला न जुमानता पुढे जात असल्याचे दु:ख कुठे तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांच्या मनात सलत असल्याचे जाणवते. त्यामुळे मोदी ऐकत नसतील तर स्वत:च आपला कार्यक्रम राबवण्यासाठी मैदानात उतरायला हवे, या भावनेतून मोहनराव भागवत यांनी भाषणांची मोहीम सुरू केलेली दिसते. ते त्यांची वक्तव्ये करीत असले तरी भाजपाला त्यांच्या वक्तव्यांचा अजिबात फायदा होताना दिसत नाही. बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या काळातच मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत आपले मत व्यक्त केल्यानंतर बिहारमधील मागासवर्गीय मतदार पूर्णपणे भाजपाच्या विरोधात गेला आणि एक मोठा पराभव या पक्षाच्या नशिबी आला. राज्यघटनेबाबतही भागवत यांनी मध्यंतरी काही मते व्यक्त केली होती. तीसुद्धा भाजपासाठी मारकच आहेत.

संघ परिवारातील राजकारणाचा आणखी एक भाग म्हणजे कोणत्याही कारणाने का असेना नरेंद्र मोदी मुस्लीम समाजाशी जुळवून घेताना पाहायला मिळतात. भाजपा आणि एकूणच संघ परिवारातील कट्टर हिंदुत्ववाद्यांना मोदींचे हे राजकारण अजिबात पसंद नसल्याचे पाहायला मिळते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून काही अंतर दूर राहून नरेंद्र मोदी आपले राजकारण करीत असल्याचे जाणवते. त्यांनी आपल्या या राजकारणाची दिशा बहुधा आधीपासूनच निश्चित केली असावी कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर टक्के ज्यांच्यावर निष्ठा आहेत, असे लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या पक्षातील बुजूर्ग नेत्यांना त्यांनी सुरुवातीलाच मंत्रिमंडळात घेण्याचे टाळले होते. नरेंद्र मोदी आता आपल्या पद्धतीने भाजपाचे राजकारण करताना दिसतात. पक्षावर नियंत्रण ठेवण्याची ज्यांची इच्छा आहे, अशांपैकी कुणाच्याही ताटाखालचे मांजर होण्याचे त्यांनी हुशारीने टाळल्याचे दिसते. मोहन भागवत यांना अयोध्येत राममंदिर हवे आहे; पण सत्तेवर आल्यापासून नरेंद्र मोदी यांनी मात्र एकदाही राम मंदिराचा साधा उल्लेखही केला नाही. अगदी सहजपणे सर्वेक्षण केले तरी भारतभरात लाखो राममंदिरे गावोगावी पाहायला मिळतील. या मंदिरातील रामावर त्या त्या गावातील लोकांची श्रद्धाही आहे. मग ज्यातून वादाला कारण नसताना निमंत्रण मिळेल, असे अयोध्येतील राम मंदिर मोहन भागवतांना कशासाठी हवे आहे?

1 COMMENT

  1. भारतभरात लाखो राममंदिरे गावोगावी पाहायला मिळतात. मग अजून एक मंदिर बांधले तर काय फरक पडतो? आणी जिथे रामाचा जन्म झाला, जिथे राम राज्य होते, तिथेच राम मंदिर नाही?
    हेच तुम्ही बाबरी मशिदीसाठी बोलना-यांना का नाही सांगत?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version