Home टॉप स्टोरी १०० शाळा डिजिटल करणे हे क्रांतिकारी पाऊल!

१०० शाळा डिजिटल करणे हे क्रांतिकारी पाऊल!

1

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी एकाच वेळी १०० शाळा डिजिटल करणे हे आमदार नितेश राणे यांचे शिक्षण क्षेत्रातील क्रांतीकारक पाऊल आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी काढले.

कणकवली- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी एकाच वेळी १०० शाळा डिजिटल करणे हे आमदार नितेश राणे यांचे शिक्षण क्षेत्रातील क्रांतीकारक पाऊल आहे. आपल्या मतदार संघातील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात प्राविण्य मिळविणारे, शिक्षणाबरोबर व्यावसायिक ज्ञान असणारे आणि प्राविण्य मिळविणारे व्हावेत यासाठी तळमळीतून हे काम हाती घेतले आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी काढले. नितेश राणे यांच्या कामाची, बुद्धीमत्तेची, दूरदृष्टीची बरोबरी करणारा एकही आमदार किंवा मंत्री महाराष्ट्रात नाही, असेही नारायण राणे म्हणाले.

टाटा कंपनी ट्रस्टच्या माध्यमातून शंभर शाळांना डिजिटल करण्याचा शुभारंभ नारायण राणे यांच्या उपस्थितीत झाला. कणकवली येथे झालेल्या या कार्यक्रमाला टाटा ट्रस्टचे समन्वयक परेश मनोहर, स्वाभिमानचे जिल्हा अध्यक्ष दत्ता सामंत, बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, सुदन बांदिवडेकर, सभापती सायली सावंत, भाग्यलक्ष्मी साटम, शारदा कांबळे, अमोल तेली, संदीप साटम, अरविंद रावराणे, विजय कुमार वळंजु, अनिल डेगवेकर, नलावडे, आदी व्यासपिठावर उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ. मिलींद कुलकर्णी यांनी केले.

संगणक आला तेव्हा, जगात क्रांती घडली. आधुनिकतेच्या गोष्टी, विकासाच्या साधनाने गतीमान करण्यासाठी डिजिटल युगाचीच गरज आहे. जे देश प्रगत आहेत त्यांनी या डिजिटल साधनांचा पुरेपुर वापर केला आहे. ब्रिटन सारख्या देशाचे दरडोई उत्पन्न डिजिटल साधनांच्या वापरामुळेच ३२ लाखापर्यंत पोहोचले. आपला भारत देश, राज्य व समाज गतीमान दिशेने वाटचाल करावा असे वाटत असेल तर दर्जेदार शिक्षणाची गरज आहे, असेही नारायण राणे म्हणाले.

मराठी शिक्षणाइतकीच इंग्रजी शिक्षणाची गरज आहे. इंग्लिश लिहिता-बोलता येणे गरजेचे आहे. त्यासाठीच इंग्लिशला महत्त्व द्या, असे आवाहन करून ते पुढे म्हणाले की, ज्या व्यक्तीची इंग्लिशवर कमांड नाही ती व्यक्ती कोणत्याच क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. देशाचे भवितव्य असणारे तरुण-तरुणी हे प्रत्येक क्षेत्रात तरबेज असावेत, कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी परिपक्व बनावेत. त्यांनी गतीमान दिशेने वाटचाल करावी. कॉर्पोरेट क्षेत्रात गरुड झेप घ्यावी. यासाठी नितेश राणे यांनी पहिल्या पासून डिजिटल शिक्षण पद्धतीवर भर दिला आहे. त्याचा स्वीकार करून क्रांती घडवा, असे आवाहनही नारायण राणे यांनी केले.

विरोधकांचा समाचार घेताना नारायण राणे म्हणाले की, डिजिटल म्हणजे काय? हे कुडाळ-मालवणच्या आमदार किंवा खासदार राऊत यांना माहित तरी आहे काय? याउलट शिक्षण क्षेत्रात पारंगत असलेले कणकवली, देवगड, वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांचे काम पहा. नितेश राणे यांची दुरदृष्टी लक्षात घ्या. विद्यार्थी वेगवेगळय़ा क्षेत्रात पारंगत व्हावेत. म्हणून कंपनीच्या माध्यमातून क्रांतीकारक योजना त्यांनी आणली आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ३० बेडचे हॉस्पीटल ५० बेडचे करून उपजिल्हा रुग्णालय म्हणून भुमिपूजन करत आहेत. मी ७० एकरमध्ये कसाल पडवे येथे सर्व सोयींनी परिपूर्ण हॉस्पीटल बांधत आहे. १२३ तज्ज्ञ डॉक्टर येथे असणार आहेत. राज्यात आणि देशात असे हॉस्पीटल दुसरे नाही. दुसरीकडे पालकमंत्री डोंगर पोखरून उंदीर काढतात. काय तर २० बेडचे हॉस्पीटल, अशा शब्दात राणे यांनी पालकमंत्री केसरकर यांचा समाचार घेतला.

टाटा कंपनीच्या माध्यमातून नितेश राणे शाळा डिजिटल करीत आहेत. टाटा कंपनीचे मालक, संचालक, व्यवस्थापक अधिकारी यांचे या सहयोगासाठी मी आभार मानतो, असे सांगतानाच राणे म्हणाले की, आदर्श शहर ही समाजाची गरज आहे. जितकी माणसाला अन्नाची गरज आहे, तितकीच आनंदाचीही गरज आहे. म्हणून आनंद देणारे उद्यान देवगड येथे उभे केले जाणार आहे. याला प्रगती म्हणतात, असे सांगून नारायण राणे म्हणाले की, लोकसभेत-विधानसभेत बोलता न येणारे खासदार-आमदार हवे आहेत की, नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासारखे उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी हवेत, याचा विचार आता सिंधुदुर्गमधील जनतेने करावा. आताचे खासदार विनायक राऊत उद्या टाटा कंपनीकडे सीआरएस फंड मागण्यासाठी गेले, तर कोणत्या भाषेत बोलणार? ना हिंदी येते, ना त्याला इंग्रजी येते, अशी मिश्किल टीका नारायण राणे यांनी केली.

शिक्षण क्षेत्रात राणे कुटुंबीयांनी केलेले कार्य सांगताना नारायण राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासप्रक्रियेत आम्ही उभ्या केलेल्या इंजिनिअरींग कॉलेजचे महत्त्वपुर्ण योगदान आहे. या कॉलेजमध्ये १६०० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील ४० टक्के विद्यार्थी सिंधुदुर्गातील आहेत. काही दिवसांपुर्वी याच कॉलेजचे दोन विद्यार्थी पुण्यात भेटले ते ४५ हजार ते ४८ हजार रुपये प्रतिमहा पगारावर एका मोठय़ा कंपनीत काम करीत आहेत, याला प्रगती म्हणतात. उपचारासाठी झटपट मुंबईला जाता यावे, पर्यटकांना सिंधुदुर्गात येता यावे म्हणून मी मंत्री असताना २०१४ मध्ये चिपी विमानतळ पूर्ण केले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या कृपेने आमचे सरकार गेले. नवीन सरकारमध्ये चिपी विमानतळावरून विमान उडतही नाही आणि उतरतही नाही. पालकमंत्री फक्त तारखा जाहीर करतात. या विमानतळावर पायलट शिक्षण सुरू केले जावे, अशी अट मी मंजुरी देताना घातलेली आहे, असेही राणे यांनी सांगितले.

यावेळी टाटा ट्रस्टचे समन्वयक परेश मनोहर यांनीही आपले विचार मांडले. स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी नितेश राणे यांच्या कार्याबद्दल अभिमान व्यक्त केला. ते म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलेल्या कामावर आमदार नितेश राणे यांनी कळस चढविला आहे. जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी दुरदृष्टि असलेला आमदार कणकवली मतदार संघाला लाभल्याबद्दल आनंद व्यक्त केला. शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणार- आ.नितेश राणे

शाळा डिजिटल करण्यासाठी टाटा ट्रस्टकडून सीएसआर मिळाला याचे श्रेय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनाच आहे. मी जेव्हा टाटा ट्रस्टच्या अधिका-यांना भेटलो, तेव्हा जपलेली नाती कशी कामाला येतात, हे पहायला मिळाले. टाटा ट्रस्टने माझा प्रस्ताव मान्य करून राणे साहेबांसोबत काम करण्यास उत्सुकता दाखविली. राणेसाहेब हे महाराष्ट्राला विकसीत करण्याचा दृष्टिकोन ठेऊन काम करतात, हे महत्त्वाचे असल्याचे मत टाटा ट्रस्टच्या अधिका-यांनी व्यक्त केले, असे नितेश राणे म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेसाहेबांनी १९९० पासून शिक्षणाला महत्त्व दिले. म्हणून लातुर नंतर सिंधुदुर्ग पॅटर्न तयार झाला. आज दहा गावातून ७ गावातील शाळा डिजिटल करा म्हणून मागणी करतात. आजचा विद्यार्थी, तरुण ही देशाची संपत्ती आहे. त्याला दर्जेदार शिक्षण आणि चांगले विचार देण्यासाठी सेवा सुविधा दिल्या पाहिजेत. त्यासाठी हा डिजिटलचा उपक्रम महत्त्वाचा आहे, असे सांगून नितेश राणे म्हणाले की, मी आमदार म्हणून दिलेला प्रत्येक शब्द पुर्ण करण्याचा दिवस-रात्र प्रयत्न करणार आहे. मी माझ्या क्षमतेपेक्षा मतदार संघातील विकासकामे करत आहे. शासनाच्या निधीला ४० टक्के कपात झालेलीच आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टी शासन देईल आणि मी विकास करेन यासाठी आमदार नसतो, तर वेगळे प्रयत्न करून विकासनिधी आणायचा असतो. वैभववाडी आदर्श शहर बनवावे, देवगड येथे बालोद्यान निर्माण करावे, प्राण्यांवर उपचार करण्यासाठी रुग्णालय उभे करावे आणि शाळा डिजिटल करुन दर्जेदार शिक्षण व्यवस्था निर्माण करावी यासाठी टाटाची मदत आपण घेत आहोत, असेही नितेश राणे म्हणाले.

1 COMMENT

  1. नुसत्या सरकारी शाळा डिजिटल करुन काहिही उपयोग नाही त्या आधी ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version