Home टॉप स्टोरी घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?

घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?

4

संपामुळे सर्वस्व गमावलेला गिरणी कामगार सातत्याने आपल्या हक्काच्या घरांसाठी लढा देत आहे. 

मुंबई- संपामुळे सर्वस्व गमावलेला गिरणी कामगार सातत्याने आपल्या हक्काच्या घरांसाठी लढा देत आहे. कामगारांच्या हतबलतेचा फायदा एकीकडे दलाल वर्ग घेत असताना दुसरीकडे राज्य सरकारनेही कामगारांना लुबाडण्याचे ठरवले आहे.

[poll id=”1352″]

म्हाडाच्या घरांची किंमत ९ लाख ५० हजार, तर एमएमआरडीएच्या घरांची ६ लाख किंमत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. ही भली मोठी रक्कम कामगार वर्ग देणार कसा, असा सवाल ‘गिरणी कामगार एकजूट’ संघटनेने केला आहे.

कामगारांच्या घरांची किंमत गिरणी मालक आणि विकासकांकडून वसूल करून घ्यावी ही आमची सुरुवातीपासूनची मागणी असून त्यावर ठाम आहोत. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी धुडकावून लावल्याने त्यांच्या निषेधार्थ २१ एप्रिल रोजी दुपारी ४ वा. भारतमाता, लालबाग येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.

१ लाख ४८ हजार कामगार वर्गाला घर मिळावे यासाठी शासनाने ठोस धोरण बनवायला हवे. घरांच्या ताबा प्रक्रियेत भ्रष्टाचार होऊ नये यासाठी पात्र कामगारांना किंवा त्यांच्या वारसदारांना विशिष्ट पात्रता कार्ड द्यायला हवे. आगामी सोडत अर्जाची, कागदपत्रांची पूर्ण छाननी केल्यानंतरच काढावी, असे ‘गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी’ संघाच्या चेतना राऊत यांनी सांगितले.

एकाच कामगाराला दोन घरे लागणे, एका गिरणीतील कामगाराला दुस-याच गिरणीच्या जागी घर लागणे, घरे दलालांच्या घशात जाणे असे गैरप्रकार पहिल्या सोडतीत घडले असल्याचे त्या पुढे म्हणाल्या. संपामुळे उद्ध्वस्त झालेल्या कामगार वर्गाला ९ लाख किंमत जमा करणे खूप अवघड आहे.

म्हाडाच्या २ हजार ६३४ तर एमएमआरडीएच्या २ हजार ४१८ घरांची सोडत लवकरच काढली जाणार आहे. घरांची सोडत आणि किंमत गिरणी कामगारांच्या काही संघटनांशी चर्चा करून निश्चित केली गेली. कामगारांच्या घरांबाबत निर्णय घेताना किमान सर्व कामगार संघटनांना बोलवणे अपेक्षित होते.

मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे गिरणी मालक, विकासक तुपाशी आणि कामगार उपाशी आहे, असा संताप कामगारांनी व्यक्त केला. अद्याप २०१२च्या पहिल्या सोडतीतील घरांचे वितरण पूर्ण झाले नाही.

एकाच कामगारांना दोन घरे वितरित केली गेल्याने त्या विरोधात आम्ही न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. अशा परिस्थितीत सोडत काढण्यासाठी घाई का, असा सवालही कामगारांनी केला.

4 COMMENTS

  1. गिरणी कामगारांनी घरासाठी किती वर्ष वाट बघायची. लवकर घरं मिळाली तर बरं होईल संपामुळे त्याना मुलांना पूर्ण शिक्षण देता आले नाही त्यामुळे सगळयांना घर घेणे शक्य नव्हते निदान या लॉटरी मूळे तरी त्यांचे स्वप्न पूर्ण होऊदे

  2. खूप सहन केले गिरणी कामगार ने त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे

  3. खूप सहन केले गिरणी कामगार ने त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. गिरणी कामगारांनी घरासाठी किती वर्ष वाट
    बघायची. लॉटरी नाही हक्कचे घर मिळाला पाहिजे.

  4. गिरणी कामगारांना मोफत घर मिळाला पाहिजे हे त्यांचा मूळ अधिकार आहे. बॉम्बे डायिंग कंपनीचा कामगारांना आणि सर्वे कामगारांना घर मोफत मिळाला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version