Home टॉप स्टोरी भीमा कोरेगाव प्रकरणाचे राज्यात हिंसक पडसाद

भीमा कोरेगाव प्रकरणाचे राज्यात हिंसक पडसाद

1

भीमा कोरेगाव प्रकरणाचे मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी तीव्र पडसाद उमटले असून प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

मुंबई- भीमा कोरेगाव प्रकरणाचे मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी तीव्र पडसाद उमटले असून भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांनी संयम बाळगून शांतता राखावी आणि बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी किरकोळ वादातून दोन गटात झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारी, गाडय़ांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेकीत झाले. यात एका युवकाचा मृत्यू झाला. राहुल फटांगळे (२८) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

भीमा कोरेगाव प्रकरणाचे मुंबईसह राज्यात हिंसक पडसाद उमटले आहेत. कोरेगाव-भीमाच्या विजयदिनाच्या कार्यक्रमानंतर सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचाराचे मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी आज तीव्र पडसाद उमटले. मुंबईत काही आंदोलकांनी चेंबूरमध्ये रेल रोको केल्याने हार्बर रेल्वे काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. चेंबूरपाठोपाठ मुलुंडमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. सायनमध्येही या घटनेचे पडसाद उमटल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला होता. दुपारनंतर या आंदोलनाचे लोण मुंबईभर पसरले.

कुर्ला, मुलुंड व चेंबूर परिसरात निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान वाहनांची तोडफोड करण्यात आली. मुलुंडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्टेशन रोड परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, कुर्ला रेल्वे स्थानक परिसरातही बस फोडण्यात आली. घाटकोपर रमाबाई नगरजवळ बस क्रमांक २७च्या काचा फोडण्यात आल्या. अमर महल जंक्शन येथेही रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणा देत अनेक वाहनांची तोडफोड केली. चेंबूरमधील या आंदोलनाचे लोण गोवंडी, मानखुर्द, मुलूंड, विक्रोळी आणि सायनपर्यंत पोहचले. या भागात अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला.

आंदोलकांनी सायन-पनवेल महामार्गावर ठिय्या आंदोलन करून हा मार्ग रोखून धरला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने मुंबईहून पनवेल आणि पनवेलहून मुंबईकडे जाणा-या वाहनांचा मोठा खोळंबा झाला. शेकडो आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने झालेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कांजूरमार्ग, वडाळा, सायन कोळीवाडा आणि भांडूप आदी भागातही आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने तणाव निर्माण झाला होता.

सकाळी ११.४५ वाजता काही आंदोलकांनी चेंबूर स्टेशनमध्ये घुसून घोषणाबाजी केली. त्यानंतर काही तरुणांनी रेल्वे रुळावर ठाण मांडून घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे अप आणि डाऊन दिशेच्या लोकल ठप्प झाल्या. ऐन गर्दीच्या वेळी आंदोलकांनी आंदोलन केल्याने प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केले.

दरम्यान, भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शांततेत उद्या महाराष्ट्र बंद पाळावा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान हे आवाहन केले. यावेळी त्यांनी राज्यभरात उमटत असलेल्या हिंसक पडसादावर बोलताना सर्वांनी संयम बाळगून शांतता राखावी. सर्वसामान्यांना त्रास होईल असे काही करु नका, असे म्हटले आहे.

महाराष्ट्र बंद चे आवाहन

पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगाव, सणसवाडी, शिक्रापूर कोंढापुरी येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद मंगळवारी मुंबईसह संपूर्ण राज्यात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला, तर अहमदनगर, पुणे, नाशिकमध्ये रास्ता रोको करण्यात आला. चेंबूरमध्ये रेल रोको करण्यात आल्याने कुर्ला ते पनवेल दरम्यान हार्बर सेवा सायंकाळी उशिरापर्यंत पूर्णपणे ठप्प झाली. आंदोलकांनी दगडफेक केल्याने अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने मुंबईतील काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आली. भीमा कोरेगाव, सणसवाडी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ बुधवार, दि. ३ जानेवारी रोजी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी माहिती पडताळून घ्या- मुंबई पोलिसांचे आवाहन

भीमा कोरेगाव प्रकरणाचे राज्यभरात हिंसक पडसाद उमटले आहेत. मुलुंड, कुर्ला परिसरात बेस्ट बसची तोडफोड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. तसेच सोशल मीडियावर काहीही पोस्ट करण्यापूर्वी माहितीची खात्री करुन घेतल्यानंतरच पोस्ट करावे, असेही सांगण्यात आले आहे.

घटनेला कोणताच रंग देऊ नका- शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे. जे घडले त्याची चौकशी राज्य सरकारने करावी. जे सार्वजनिक क्षेत्रात काम करतात त्यांनी हे पसरु न देण्याची भूमिका घ्यावी. घडलेला प्रकार महाराष्ट्राला शोभादायक नाही. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांनी यात तेल न टाकता कोणतेही भाष्य करु नये किंवा चर्चा करु नये. जे काही करायचे असेल ते सामंज्यस्याने करावे, असे आवाहनही पवार यांनी केले आहे. या घटनेसंदर्भात वढू गावातील लोकांशी संवाद साधला. पुणे शहरातून आलेल्या हिंदूत्ववादी संघटनांनी येथे येऊन चिथावणी दिल्याचे गावक-यांचे म्हणणे आहे, अशी माहितीही पवार यांनी दिली.

समाजविघातक प्रवृत्तींना प्रोत्साहन नको- चव्हाण

दलित आणि मराठा समाजात भांडणे लावून त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा काही समाघविघातक प्रवृत्तीचा डाव असल्याचे भीमा-कोरेगावच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. फुले, शाहू,आंबेडकरांच्या विचारधारेला मानणा-या सर्वानी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने लढा द्यावा आणि कुटील राजकीय डाव हाणून पाडावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.

विघातक शक्तींकडून समाजात तेढ

छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आपला महाराष्ट्र चालला आहे. या महाराष्ट्रात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. सर्वजण नेहमी एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी असतात. पण अशा परिस्थितीत काही विघातक शक्तींकडून समाजात तेढ निर्माण केले जात असून अशा गोष्टींना सुजाण जनतेनी बळी पडू नये. कोणीही कायदा हातात घेऊ नये, सर्वांनी संयम राखावा. – खा. संभाजी छत्रपती

भीमा-कोरेगावची पार्श्वभूमी

भीमा कोरेगाव येथे दलित संघटनांतर्फे दरवर्षी १ जानेवारीला शौर्य दिन साजरा केला जातो. यासाठी अनेक मान्यवर तेथे उपस्थित असतात. १ जानेवारी १८१८ ला पुण्याजवळ भीमा कोरेगावात झालेल्या ऐतिहासिक लढाईत महार सैनिकांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला होता. या घटनेला १ जानेवारी २०१८ रोजी २०० वर्षे पूर्ण झाली. या दिवसाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील शनिवारवाड्यात एल्गार परिषद भरवली होती. या एल्गार परिषदेत गुजरातचा नवनिर्वाचित आमदार व दलित नेता जिग्नेश मेवाणी उपस्थित होता. या परिषदेत त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही यावर सडकून टीका केली होती.

मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा

भीमा-कोरेगाव हिंसेप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे मनोहर भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी, खुनी हल्ला, दंगल, हत्यारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता सावळे या महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी हा गुन्हा शिरूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार आहे.


भीमा कोरेगावचे पडसाद
भीमसैनिकांचा निषेध मोर्चा, रास्ता रोको, दुकाने बंद, रिक्षा बंद, म्हसा यात्रा उत्साहावर परिणाम, एसटी आणि खासगी वाहतूक पूर्णपणे ठप्प, चाकरमानी व सर्वसामान्यांचे हाल, भीमा कोरेगाव येथे दोन गटांत तुफान दगडफेक होऊन सणसवाडी येथे एका तरुणाचा मृत्यू झाला आणि भीमा कोरेगावातील परिस्थिती हाताबाहेर गेली. जवळपास दोनशे ते तीनशे गाडय़ांची जाळपोळ, दुकानांची तोडफोडही करण्यात आली. याचेच पडसाद मुंबईसह कल्याण, भिवंडी, बदलापूर, मुरबाडमध्येही उमटले.

कल्याण – भीमा कोरेगाव येथे शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या हजारो भीमसैनिकांवर समाजकंटकांनी हल्ला करीत दंगल घडविण्याचा प्रयत्न केला. या घटनेत अनेक भीमसैनिक जखमी झाले तर एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेने पडसाद भीमसैनिकांमध्ये उमटून संतापाचे वातावरण पसरले. या घटनेच्या निषेधार्थ कल्याण डोंबिवली शहरातील भीमसैनिकानी निषेध मोर्चा, रस्ता रोको करीत उत्फूर्तपणे बंद पाळला.
डोंबिवलीपूर्वेकडील इंदिरानगर शेलार नाका परिसरातील भीमसैनिक मानवंदना देण्यासाठी गेले होते. त्यातील चार ते पाच भीमसैनिक या हल्ल्याच्या घटनेत गंभीर जखमी झाल्याची माहिती कळताच इंदिरानगर आंबेडकरी जनतेमध्ये संतापाचे वातावरण पसरले व या घटनेच्या निषेध करण्यासाठी रात्री १०० ते १२५ जणांनी घोषणाबाजी करीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेरीकेटस टाकून रास्ता रोको केला. या जमावाने निषेधाच्या घोषणा देत वाहनांवर दगडफेक सुरू केली. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत जवळपास दहा ते बारा वाहने फोडली होती. कल्याण पश्चिम लालचौकी, शिवाजी चौक, कल्याण पत्री पूल, नेतिवली, सूचक नाका, चक्की नाका, तिसगाव नाका, काटेमानिवली, श्रीराम चौक आदी ठिकाणी रास्ता रोको केला. मोहने, आंबिवलीत दुकाने बंद ठेवण्यात आली होती. वालधुनी, उल्हासनगर दिशेने जाणा-या रिक्षा पूर्णत: बंद असल्याने चाकरमान्यांचे बरेच हाल झाले.


भिवंडी – भीमा कोरेगाव दुर्दैवी घटनेनंतर आंबेडकर अनुयायांकडून संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना भिवंडी शहरातील आंबेडकर अनुयायांनी मात्र शांतता राखत या घटनेचा फक्त निषेध केला. बुधवारी ३ जानेवारी रोजी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
यासाठी झालेल्या सभेत प्रा. सुमित्रा कांबळे, सुनील वाघमारे, सुरेश म्हस्के, सुनील भगत, अनिल वाणी यांसोबत प्रमुख पदाधिका-यांनी या घटनेचा निषेध करत शांततेच्या मार्गाचा अवलंब करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
दरम्यान, काही युवक आंबेडकर अनुयायांनी दुपारी अचानक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून एसटी स्टँड व तेथून उपविभागीय कार्यालयापयर्ंत घोषणाबाजी करीत निघून गेले. त्यांच्या अचानक समोर येण्याने शांतीनगर, निजामपूर पोलिसांनी प्रसंगावधान राखीत या युवकांना माघारी पाठविले.


मुरबाड – पुणे जिल्हय़ातील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव विजयस्तंभला २०० वर्षे पूर्ण होत असतानाच झालेल्या दंगलीचा परिणाम मुरबाडमध्येही झाला. या घटनेच्या निषेधार्थ सर्व रिपाई गट एकत्र येत मंगळवारी तब्बल ६ तास मुरबाड बंद पाळण्यात आला. तसेच मुरबाड-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर जवळ जवळ ४ तास रास्ता रोकोही करण्यात आला. त्यामुळे सर्वसामान्यांचे आणि चाकरमान्यांचे तर मोठय़ा प्रमाणात हाल झाले. तसेच मुरबाड शहरातील सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला १०० टक्के प्रतिसाद दिला. या बंदमुळे म्हसा यात्रेच्या कालावधीमध्ये पहिल्याच एसटी सेवा आणि खासगी वाहतूक सेवा पूर्णपणे बंद असल्यामुळे यात्रेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्या टीमने विशेष दखल घेतली होती. तहसीलदारांच्या सूचनेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


बदलापूर – भिमा कोरेगाव येथे शेकडो वाहनांची जाळपोळ, तोडफोड या घटनांच्या निषेधार्थ बदलापुरात मंगळवारी १०० टक्के बंद यशस्वी झाला. यावेळी पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पुढे घोरपडे चौकापर्यंत या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. शहरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. यावेळी रिपब्लिकन संघटनेसह अनेक पक्षांनी बंद यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. बदलापुरात रिपब्लिनक संघटनांसोबतच विविध पक्षांनी एकत्र येत बंदची हाक दिल्याने सकाळपासून व्यापा-यांनी आपली दुकाने बंद ठेवल्याने शुकशुकाट जाणवत होता. अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी संघटना, रिक्षाचालक-मालक संघटना, सहकारी बँका, वडापाव संघटना, छोटे व्यावसायिक बंदमध्ये सहभागी झाले होते. बदलापूर पश्चिमेतील रमेशवाडी भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करत निषेध मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती.

1 COMMENT

  1. पूजनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी काय शिकवले आणि अनुयायी म्हणणारे हे लोक काय करत आहे !!!
    शिका, संगठीत व्हा , संघर्ष करा ……का संगठीत व्हा आणि गाड्या फोडा ?

    I am confused ….Please babasaheb come again and coorect me.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version