Home Uncategorized शेळीपालनातून आर्थिक विकासाचा मंत्र!

शेळीपालनातून आर्थिक विकासाचा मंत्र!

2

दुष्काळी परिस्थिती दरवर्षीच शेतक-यांची परीक्षा घेत असताना फुलंब्रीतील रवी हिरासिंग राजपूत यांनी शेळीपालनातून राज्यातील तमाम शेतक-यांना आर्थिक विकासाचा मंत्र दिला आहे. 

पाल- दुष्काळी परिस्थिती दरवर्षीच शेतक-यांची परीक्षा घेत असताना फुलंब्रीतील रवी हिरासिंग राजपूत यांनी शेळीपालनातून राज्यातील तमाम शेतक-यांना आर्थिक विकासाचा मंत्र दिला आहे. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे पारंपरिक शेती व्यवसाय करणे जिकिरीचे बनले असताना शेळीपालनातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून राजपूत यांनी राज्यातील शेतक-यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

रवी राजपूत यांच्याकडे केवळ दीड एकर शेतजमीन आहे. शेतीतून मिळणा-या अत्यल्प उत्पन्नावर आई-वडिलांसह कुटुंबातील आठ सदस्यांना गुजराण करावी लागते. मात्र गेल्या काही वर्षात अनियमित पावसामुळे पारंपरिक शेती करणे कठीण होऊन बसले होते. अशा परिस्थिती एका वर्तमानपत्रात पाहिलेली जाहिरात रवी राजपूत यांच्यासाठी प्रकाशाचा कवडसाच ठरली.

शेळीपालनाची यशोगाथा वाचून त्यांनी शेळीपालन करण्याचा ठाम निर्णय घेतला. दुष्काळी परिस्थिती असल्याने गाठीशी भांडवल नव्हते. परंतु त्यावर कसाबसा मार्ग काढत त्यांनी २०११ मध्ये पहिली शेळी खरेदी केली. मग त्यांची गाडी हळूहळू पुढे सरकत शेळय़ांची संख्या वाढली. शेळीची पिले विक्री करून अवघ्या दोन वर्षात त्यांनी शेळय़ांची संख्या २५वर गेली.

अवघ्या दोन महिन्यांत शेळय़ा व बोकड विक्रीतून त्यांनी दोन लाख रुपये नफा मिळाल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती चांगलीच सुधारली. त्यानंतर त्यांनी इतर शेतकरी मित्रांनाही हा लाखमोलाचा मार्ग दाखवला. सध्या त्यांच्याकडे ४५ शेळय़ा असून त्यांना दिवसांतून चार-पाच तास चरण्यासाठी सोडले जाते. सायंकाळी मका, गहू, सोयाबीनचा भरडा असे खाद्य दिले जाते. त्याचप्रमाणे शेळय़ांना नियमित लसीकरण करून औषधी मात्रा दिली जाते.

दर तीन महिन्यांनी जंतांचे औषध शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यातून दिले जाते. राजपूत यांनी शेळीपालनचा निर्णय घेताना अनेक ठिकाणी भेटी दिल्या. शेळीपालनाची इंत्यभूत माहिती करून घेतली. आजघडीला औरंगाबाद, परभणी, बीड, जालना, परतुर, सिंधुदुर्ग, बुलडाणा, धुळे, हिंगोली, नाशिक, लातूर आदी जिल्ह्यांत शेळीपालन करणारे व्यावसायिक राजपूतकांकडे शेळीपालनविषयक मार्गदर्शनासाठी रीघ लावत आहेत.

राजपूतही अशा असंख्य शेतक-यांना नि:शुल्क मार्गदर्शन करून समाजसेवा करत आहेत. आतापर्यंत ७० जणांनी त्यांच्या केंद्राची पाहणी केली असून उत्पन्नाचा उत्तम स्त्रोत म्हणून शेळीपालन व्यवसायाकडे वळणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सोशल मीडियाही मदतीला

रवी राजपूत यांनी शेळीपालन व्यवसायाच्या माहितीसाठी तसेच शेळी विक्रीसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर चार ग्रुप तयार केले आहेत. या चार ग्रुपमध्ये राज्यातील शेळीपालन व्यावसायिक, अधिकारी मिळून सुमारे आठशे जण जोडले गेले आहेत. या माध्यमातून राजपूत यांनी आतापर्यंत एक शेळी व चार बोकडांची कोल्हापूरच्या व्यावसायिकाला १७ हजारांत तर चार शेळय़ा बीड जिल्हा केज तालुक्यात २३ हजारांत विकल्या आहेत.

दुष्काळाला शेतक-यांनी धैर्याने सामोरे गेले पाहिजे. पारंपरिक शेतीसह शेतात नवीन प्रयोग करून उत्पन्न वाढवायला हवे. शेळीपालनातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. अत्यल्प भांडवलात सुरू करता येणारा हा व्यवसाय गरजूंसाठी लाभदायी आहे. – रवी राजपूत

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version