Home एक्सक्लूसीव्ह पुरुषांच्या आत्महत्येत वाढ

पुरुषांच्या आत्महत्येत वाढ

0

हुंडाबळी, स्त्री-भ्रूण हत्या, कौटुंबिक कलह व पुरुषी अहंकारी वृत्तीला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारणा-या गृहिणींची संख्या सर्वाधिक असून सध्या विवाहित पुरुषांच्या आत्महत्येतही वाढ होत असल्याचे विदारक चित्र समाजात निर्माण झाले आहे.

संग्रहित छायाचित्र

२०१३-१५ या तीन वर्षात मुंबईत ३,६४० जणांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. यात २ हजार ३०४ पुरुष आणि १ हजार ३३३ स्त्रियांचा समावेश होता. पूर्वी पुरुषी विचारसरणीला स्त्रिया बळी पडत होत्या. मात्र, सध्याच्या आधुनिक युगात हे चित्र बदलून महिलांच्या अत्याचारामुळे पुरुष जीव मुठीत घेऊन जगत असल्याचे दिसून येत आहे. देशात दरवर्षी ६५,००० पुरुष महिला अत्याचाराला कंटाळून जीवन संपवतात. त्यामुळे स्त्रियांवर होणा-या अत्याचाराबाबत मोकळ्यापणाने बोलले जाते. मात्र, पुरुषांच्या या वाढत्या आत्महत्येसंदर्भात सरकार गाफील असल्याचे दिसून येते. त्यामुळे, पुरुषांवर होणा-या अत्याचाराकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काही पुरुष संघटनाही समाजात न्याय-हक्कासाठी झुंज देत आहेत. मात्र, अनेकांना याची कल्पना सुद्धा नाही, याचीच खंत वाटते.

महाराष्ट्रासह देशात वाढत असलेल्या आत्महत्येमुळे लोकांना यापासून दूर नेण्यासाठी नुकताच १० सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय आत्महत्याविरोधी दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. या दरम्यान आत्महत्या करणा-याची संख्या पाहिल्यास मन हेलावून जाते. सध्या धावपळ आणि प्रचंड ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे मुंबईत आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आत्महत्या ही दिवसेंदिवस गंभीर समस्या बनून आपल्या समोर येत आहे. मागील तीन वर्षात मुंबईत या-ना-त्या कारणामुळे झालेल्या आत्महत्येत १५ ते ४५ वयोगटातील लोकांचा मोठा समावेश होता. शिक्षण, करिअर, कौटुंबिक प्रश्न, आजारपण, आर्थिक चणचण, वैवाहिक संबंध, प्रेमभंग ही मुंबईकरांच्या आत्महत्येची मुख्य कारणे आहेत. याची तीव्रता सतत वाढत आहे. मुंबईत २०१३ साली १,३२२ जणांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला होता. त्यात ८३१ पुरुष व ४९१ महिलांचा समावेश होता. २०१४ मध्ये १,१९६ जणांनी आत्महत्या केल्या. यात ७४५ पुरुष आणि ४४९ महिलांचा समावेश होता. याशिवाय मागील वर्षी २०१५ मध्ये मुंबईत १,१२२ जणांनी आत्महत्या केल्या असून यात ७२७ पुरुष व ३९३ महिला होत्या. या आकडेवारीचा विचार केल्यास तिन्हीही वर्षात आत्महत्या करणा-यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची नोंद सर्वाधिक असल्याचे आढळून येते. दरम्यान, मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या व्यक्तींमध्ये ३३२ जणांनी शालेय शिक्षणाच्या पुढे मजल मारली नाही. तर ६६७ जणांनी प्राथमिक शिक्षणापासून शाळा सोडली. तर १ हजार १६ जणांनी दहावीनंतर शाळा सोडली. ८३८ जणांनी दहावी पूर्ण केली असली तरी ५२८ जणांनी अकरावी-बारावीनंतर शिक्षण सोडल्याचे कळते.

सध्या गळफास घेऊन, विष प्राशन करून, इमारतीच्या किंवा छतावरून उडी मारून, स्वत:ला जाळून घेऊन किंवा रेल्वेखाली येऊन आत्महत्या करण्याचे प्रकार वाढत आहेत. यात गळफास घेणा-यांची संख्या सर्वाधिक असून एकूण आत्महत्येपैकी २,६०० जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या आहेत. तर ४५० जणांनी राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून आयुष्य संपवल्याचे कळते. मुळात, आधुनिक युगात स्त्री-पुरुष समानतेचे कितीही गोडवे गायले जात असले तरी आजही आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती समाजात आपले पाय घट्ट रोवून आहे. या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे महिलांना वर्षानुवर्षे अन्यायाला सामोरे जावे लागले. पुरुषी विचारसरणीला स्त्रिया आजही बळी पडतायेत. परंतु, सध्या देशातील पुरुषही या संस्कृतीला बळी पडत असल्याने नवल वाटते. पण पुरुषांच्या या आत्महत्यांकडे कोणी फारसे सहानुभूतीने पाहताना दिसून येत नाही.

रस्त्यावर किंवा रेल्वेच्या जनरल डब्यात एखाद्या महिलेचा/मुलीचा पुरुषाला धक्का लागला तर काहीच फारसा फरक पडत नाही. पण त्याजागी पुरुषाचा चुकून धक्का लागल्यास पुरुषाला नालायक ठरवून स्त्रिया मोकळ्या होतात. शिवाय, पुरुषांवर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असते. काही पुरुषांना ही जबाबदारी सक्षमरित्या उचलणे शक्य होत नाही. याचा अर्थ त्यांच्यात काही कमी आहे असा अजिबात होत नाही. पण तरीही संबंधित व्यक्ती विवाहित असल्याने त्याची पत्नी सणासुदीच्या वेळी दागिन्यांची किंवा कपडय़ांची मागणी करते. अशावेळी पत्नीच्या अपेक्षा पूर्ण करणे अनेकांना शक्य होत नाही. लहानसहान अपेक्षाही पूर्ण करू न शकल्याने पुरुषाच्या मनावर सतत होणारा आघात आणि वाढत जाणारा मानसिक दबाव त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करत असावा, असे म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही.

मानसिक आजारासंदर्भात जागरूकता व्हावी

‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’(एनसीआरबी)च्या आकडेवारीनुसार देशात मागील वर्षी २०,४१२ विवाहित स्त्रियांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यावरून स्त्री व पुरुष दोघांच्या आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी राज्य सरकारने वेळीच ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. आत्महत्येपासून लोकांना परावृत्त करण्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. मानसिक दडपणाखाली येऊन लोक आत्महत्या करत असल्याने अशा लोकांवर तातडीने उपचार करून त्यांना बरे केले पाहिजे. मात्र, अनेकदा मानसिक रुग्ण सहसा ओळखू शकत नाहीत. कारण या आजाराची कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. त्यामुळे, सरकारने सुरुवातीला मानसिक आजार म्हणजे नेमकं काय? त्यावर कोणते उपाय आहेत? यासंदर्भात लोकांना जागरूक करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास आत्महत्येचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकेल.

समुपदेशनाची गरज

मुंबईत पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण ६३ टक्के इतके आहे. यात विवाहित पुरुषांची संख्या सर्वाधिक आहे. वैवाहिक जीवनात येणा-या चढ-उतारांमुळे कंटाळून अनेक पुरुष आयुष्य संपवण्याचा विचार करतात. यामुळे विवाहविषयक समुपदेशनाची गरज निर्माण होऊ लागली आहे. कारण, कुटुंबाची जबाबदारी, प्रेमभंग किंवा वैवाहिक संबंधातील अडचणींमुळे पुरुष मंडळींना नेहमी समस्यांना सामोरे जावे लागते. यावर वेळेच उपाययोजना न केल्यास त्या मानसिक रोगी बनतात व नकळतपणे आत्महत्येचा प्रयत्न करतात.

वास्तव फाऊंडेशन

men’s rights are human rights या शीर्षकांतर्गत वास्तव फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था अनेक वर्षापासून पुरुषांच्या हक्कासाठी लढा देत आहे.

माहितीसाठी हेल्पलाईन नंबर :- ८४२४०२६४९८, ८४२४०२७४९८, ८४२४०२८४९८ किंवा ९३२२१५६१४१

मुंबईतील आत्महत्यांचे प्रमाण

वर्ष पुरुष महिला
२०१३ ८३१ ४९१
२०१४ ७४५ ४४९
२०१५ ७२८  ३९३

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version