Home कोलाज ललितलेखनाच्या दिशा विस्तारणारा संग्रह

ललितलेखनाच्या दिशा विस्तारणारा संग्रह

1

लहानपणापासून परिस्थितीशी झगडत, संघर्ष करीत शिक्षण घेऊन सरकारी नोकरीतील उच्चपदस्थ अधिकारी, कवी, साहित्यिक श्रीकांत देशमुख यांचा समुहभावानी आकाराला आलेल्या भाव जगतातील चिवट संघर्ष कहाण्यातून निर्माण झालेला ललित लेख संग्रह म्हणजे ‘पडझड वा-याच्या भिंती’.

ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्मलेले असल्यामुळे स्वाभाविकपणे कृषीसंस्कृतीत अनुभवलेल्या घटना, व्यक्ती आणि संस्कृती या लेखनाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे भारतीय कृषीसंस्कृती आणि तत्कालिन काळातील सामाजिक परिस्थितीचे दर्शन या संग्रहातून होते. नकळत वाचकही त्या घटनांशी समरस होऊन जातो.

लेखक या पुस्तकात आई, वडील, मामा, भाऊ, या नात्यातील व्यक्तीरेखांबरोबर काही घटना आणि निसर्ग याबद्दल लिहिता झालेला आहे. स्त्रीजन्मापासून मरेपर्रयत जगलेल्या श्रमजीवी दु:ख आणि कष्टानी भरलेल्या प्रवासाची प्रतिमा उमटली आहे. आसपास आसलेल्या नात्यातील व्यक्ती तसेच समाजातील व्यक्ती, परिसर वाचत निरीक्षण करीत माणूस स्वत:ला कसा घडवितो याचे उत्तम चित्रण लेखकानी निवेदकाच्या रूपात मांडलेले आहे.

पर्यावरण झाडे, निसर्ग, वास्तु याबद्दलची व्यथा कळकळीने मांडली आहे ते वाचताना लेखकाच्या कवी मनाची आणि सामाजिक जाणिवेची ओळख होते.

पहिल्याच लेखातील ग्रामीण भागातील स्त्रीचा तिच्या संसारात आपल्या पतीच्या बरोबरीने घर सांभाळून शेतीत केलेल्या कष्टाचे वर्णन वाचून ग्रामीण भागातील स्त्री बद्दलचा आदर वाढवितो. या लेखात आपल्या रक्ताच्या नसल्यातरी जवळच्या लोकांशी असलेले नाते संबंध कसे होते याचे सुरेख चित्रण वाचावयास मिळते. तसेच संसार करावा नेटका असा संदेश आजच्या भौतिक सुखामागे लागलेल्या नव्या पिढीला मिळतो.

बापू या लेखात लेखक आपल्या जन्मदात्याची ओळख करून देतो. आपण घडण्यामागे वडीलांचा कसा सहभाग आहे, याचे चित्रण या लेखात आहे. त्यावेळचे सहावी शिकलेले ग्रामीण भागात असणारे आणि वाढलेले आणि व्यवसायाने शेतकरी असलेले वडील मुलांच्या शिक्षणाबद्दल खूपच जागरूक होते हे लक्षात येते.

पोवाडे, गाणी कवितांचं वेड असलेल्या वडीलांचा वारसा लेखकाकडे आलेला दिसतो. कुणबी असल्याचे अनेक पुरावे जरी दिसले त्यांची ‘भाषा’ मात्र बरीच शुद्ध होती. हे या लेखातून कळते.

मामा, मावशी, शेजारीण अशा व्यक्तिचित्रणाबरोबर लेखकाने निसर्गातील ‘कुबडा, लिंब’ पडझड वा-याच्या भिंती, आणि गोविंद बाग हे निव्वळ निसर्गावरील चित्रण या पुस्तकात मांडले आहे. यावरून त्याने जपलेली कृषीसंस्कृती आणि कृषीसंस्कृतीने घडलेला मानवी संवेदन स्वभाव हा आपल्या लेखनाच्या केंद्रस्थानी ठेवलेला आहे. निसर्ग आणि मानव यांची तुलना लेखकाने छान मांडली आहे.

वा-याच्या भिंतीवरही गवती घर बांधणा-या पाखरांच्या वस्तीची आणि गड किल्ला मातीनी भिंती बांधून घर बांधणा-या माणसाची तुलना नेमकी मांडली आहे. काही पाखरे माणसाच्या आसपास वस्ती करतात की, त्यामुळे त्याला दाणापाणी मिळेल असा विश्वास वाटतो, तर काही पाखरे माणसापासून चार हात लांब वस्ती करतात, की जेणेकरून मानव त्या ठिकाणी पोहचून घरटय़ाला इजा करणार नाही.

निसर्गातील सुगरणीच्या घरटय़ाबद्दल जेवढे माहितीपूर्ण लिखाण लेखकाने केले आहे. तसेच मानव निर्मित पडक्या वाडय़ाचे वर्णनही उत्तमरित्या मांडले आहे. जेणेकरून माणसाच्या भिंती, माती, दगड या गोष्टीशी असलेले नाते त्याने उघड उघड मांडले आहे. त्यामुळेच ते वाचनीय झालेले आहे.

हे सर्व वाचकापुढे मांडताना लेखक वैदर्भीय सामाजिक गोष्टी आणि सणवार रितीरिवाज याची माहिती वाचकाला देत असतो. ‘गोविंदबाग’ या लेखाने पुस्तकाचा शेवट आहे. या लेखात मात्र लेखक आपले वृक्षप्रेम आणि गाव व गावाची माती याबद्दल भरभरून लिहतो. गावातल्या लोकांची आर्थिक वैचारिक परिस्थिती मांडलीच आहे. परंतु त्याने स्वत: शेत, बाग, मळा, आमराई या गोष्टी उभ्या करण्याकरिता घेतलेले कष्ट आणि परिस्थितीवर मात करून मिळवलेले यश याबद्दल लिहतो.

यामुळेच ग्रामीण भागातील शेतक-याचे कष्ट त्याची आर्थिक परिस्थिती त्यांची मानसिक स्थिती याबद्दल ओळख होते. निसर्गावर कसं प्रेम असावं याबद्दल प्रार्थना करतो. ‘माझ्या भोवती यावी, पाखरांची चिवचिव श्वास मिटण्याच्या आधी, जावा भेटूनी या गावा.’ पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ तसेच छपाई व चित्र उत्कृष्ठ असल्यामुळे अधिक सजले आहे.

पडझड वा-याच्या भिंती
लेखक :
प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशनश्रीकांत देशमुख
मूल्य : ३५०/-
पृष्ठ :३३०/-

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version