Home Uncategorized क्रिकेट विश्वचषक २०१५ इंग्लंडचा स्कॉटलंडवर ११९ धावांनी विजय

इंग्लंडचा स्कॉटलंडवर ११९ धावांनी विजय

1

 इंग्लंडने अखेर सोमवारी दुबळया स्कॉटलंडवर विजय मिळवून स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. 

ख्राईस्टचर्च – विश्वचषक अभियानाची पराभवाने सुरुवात करणा-या इंग्लंडने अखेर सोमवारी दुबळया स्कॉटलंडवर विजय मिळवून स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. इंग्लंडने स्कॉटलंडवर ११९ धावांनी विजय मिळवला.

इंग्लंडच्या विजयाचा नायक ठरला मोईन अली. फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही चमक दाखवत मोईन अलीने स्कॉटलंडच्या दोन महत्वाच्या फलंदाजांना बाद केले. इंग्लंडने दिलेल्या ३०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा डाव १८४ धावात संपुष्टात आला.

स्कॉटलंडकडून सलामीवीर काइल कोएटझरने सर्वाधिक ७१ धावा केल्या. मोईन अलीने त्याला ख्रिस वोक्सकरवी झेलबाद केले. कोएटझर वगळता सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरले आणि स्कॉटलंडचा डाव १८४ धावात कोलमडला.

तत्पूर्वी  प्रथम फलंदाजी करणा-या इंग्लंडने ३०० पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारत स्कॉटलंडला विजयासाठी ३०४ धावांचे लक्ष्य दिले.  मोईन अलीच्या शतकाच्या बळावर इंग्लंडने तीनशे धावांचा टप्पा गाठला. मोईन अली आणि इयान बेलने १७२ धावांची दणदणीत सलामी दिली.

मोईन अलीने (१२८) आणि बेलने (५४) धावा केल्या. मोईन अलीने आपल्या शतकी खेळीत बारा चौकार आणि पाच षटकार लगावले. धावांसाठी चाचपडणा-या कर्णधार इयान मॉर्गननेही आश्वासक खेळी केली. त्याने ४२ चेंडूत ४६ धावा केल्या.

या तिघांचा अपवाद वगळता इंग्लंडचे अन्य फलंदाज प्रभावी कामगिरी करु शकले नाहीत. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारणा-या स्कॉटलंडला इंग्लिश फलंदाजांनी दाद दिली नाही. स्कॉटलंडकडून जोश डॅवेने १० षटकात ६८ धावा देत सर्वाधिक चार गडी बाद केले.

इंग्लंड – ३०३/८ (५० षटके)

स्कॉटलंड – १८४ /१० (४२.२ षटके)

सामनावीर – मोईन अली 

1 COMMENT

  1. इंग्लंडला विजयासाठी हार्दिक शुभेच्छा. फार दिवसांनी आज चांगली कामगिरी पहावयास मिळाली. मोईन अली ची अष्टपैलू कामगिरी पाहून डोळे सुखावले. इंग्लंडच्या प्रयत्नांचे फळ त्यांना मिळाले. अभिनंदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version