Home टॉप स्टोरी महागाई आभाळाला भिडणार

महागाई आभाळाला भिडणार

1

‘अच्छे दिन’ची आश्वासने देणा-या मोदी सरकारने आपल्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे.

नवी दिल्ली- निवडणुकीत ‘अच्छे दिन’ दाखवण्याची गोंडस आश्वासने देणा-या मोदी सरकारने आपल्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात जनतेला महागाईच्य खाईत लोटले आहे. संतापाच्या भीतीने प्रवासी दरवाढ टाळतानाच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मालवाहतुकीचे भाडे वाढवले आहे. त्यामुळे अन्नधान्य, कडधान्य, स्टील, सिमेंट आदी जीवनावश्यक बाबींच्या किंमती गगनाला भिडणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पानंतर सिमेंट आणि वीज कंपन्यांनी सिमेंट व वीज महाग होण्याचे संकेत तात्काळ दिले. या रेल्वे अर्थसंकल्पाने सर्वसामान्य जनतेची साफ निराशा केल्याची टीका विविध पक्षांनी केली आहे.

प्रभू यांनी गुरुवारी लोकसभेमध्ये आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना प्रवासी भाड्यामध्ये कोणतीही वाढ न करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला. मात्र त्याचवेळी कोणत्याही नव्या रेल्वे गाडीची घोषणा न करुन त्यांनी भ्रमनिरासही केला. दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पामध्ये नव्या रेल्वे गाड्यांची घोषणा केली जाते. मात्र यापुढे सर्वेक्षण करुन नव्या रेल्वे गाडयांची घोषणा करु असे प्रभू यांनी सांगितले.

रेल्वे अर्थसंकल्पातील महत्त्वाची वैशिष्ट्ये

प्रभू यांनी आपल्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. संतापाच्या भीतीने प्रवासी दरवाढ टाळतानाच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मालवाहतुकीचे भाडे वाढवले आहे. त्यामुळे अन्नधान्य, कडधान्य, स्टील, सिमेंट आदी जीवनावश्यक बाबींच्या किंमती गगनाला भिडणार आहेत.

मोदी सरकारचा २०१५-१६ चा रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेत मांडला. यावेळी रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा हे ही उपस्थित होते. या रेल्वे अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना मोठय़ा अपेक्षा होत्या. मात्र रेल्वेमंत्र्यांनी त्यांची साफ निराशा केली.

प्रहार कौल-

[poll id=”941″]

रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी भाडेवाढीला त्यांनी हात लावला नाही, मात्र अन्नधान्य, कडधान्य, सिमेंट, कोळसा, पोलाद, लोखंड, पेट्रोलियम पदार्थाच्या वाहतुकीच्या दरात वाढ केली. या जीवनावश्यक वस्तूंमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्यांना फटका बसणार आहे. हे नवीन दर एप्रिलपासून लागू होणार आहेत, असे प्रभू यांनी सांगितले.

रेल्वे प्रवाशांना गरज असतानाही त्यांनी कोणत्याही नवीन गाडय़ांची घोषणा केली नाही. सध्या गाडय़ांमधील प्रवासी क्षमतांचा अभ्यास केल्यानंतरच नवीन गाडी सुरू केली जाईल, अशी मखलाशी रेल्वेमंत्र्यांनी केली.

सिमेंट महागणार

रेल्वेने सिमेंटच्या वाहतुक खर्चात वाढ केल्याचे जाहीर केल्यानंतर सिमेंट कंपन्यांनी सिमेंटची ५० किलोच्या पोत्यांचे भाव ७ ते १० रुपयांनी वाढवण्याचे संकेत दिले. ५० किलो सिमेंट बॅगच्या उत्पादन खर्चात या निर्णयामुळे २ ते ४ रुपयांची वाढ होणार आहे, असे दालमिया भारत सिमेंट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहेंद्र सिंगी यांनी सांगितले. नामवंत सिमेंट कंपनीने सांगितले की, कोळसा, स्टील आणि सिमेंटचा वाहतूक खर्च वाढल्याने सिमेंटच्या पिशवीमध्ये पाच ते दहा रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

वीजेचा शॉक बसणार

रेल्वे भाडेवाढीमुळे कोळशाच्या किंमती वाढणार आहे. त्यामुळे ऊर्जा कंपन्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना महागडय़ा वीजेचा फटका बसेल. कोल इंडियाने सांगितले की, रेल्वे भाडेवाढ झाल्याने कोळसा महागणार आहे. तर या भाडेवाढीमुळे उत्पादन खर्चात पाच पैशांनी वाढ होईल. यामुळे वीज उत्पादनाचा खर्च दोन टक्क्याने वाढेल, अशी माहिती एनटीपीसीने दिली. वाढीव वाहतूक खर्च वाढीचा थेट परिणाम वीज महागण्यावर होणार आहे.

एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही प्रभू यांच्या रेल्वे अर्थसंकल्पावर जोरदार टिका केली. या अर्थसंकल्पाने महाराष्ट्र आणि मुंबईला ठेंगा दाखवला आहे. गर्दीच्यावेळी मुंबईतला लोकल प्रवास जीव नकोसा करणारा असतो. त्यामुळे प्रभू मुंबईतील लोकलसेवेवरील वाढता भार लक्षात घेऊन काही घोषणा करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी मुंबईच्या तोंडाला पाने पुसली.

मागच्या रेल्वे अर्थसंकल्पात ज्या घोषणा झाल्या होत्या. त्याचे काय झाले असा सवाल बसप प्रमुख मायावती यांनी उपस्थित केला.

प्रभू यांनी या अर्थसंकल्पातून प्रवासी सुविधा आणि रेल्वेच्या आधुनिकीकरणावर भर दिला आहे. गेल्या काही वर्षात रेल्वे सुविधांमध्ये फारशी प्रगती न झाल्याने गुंतवणूक कमी झाल्याचे प्रभू यांनी आपल्या भाषणात सांगितले.

सार्वजनिक-खासगी भागीदारीतून पुढच्या पाचवर्षात रेल्वेने ८.५ लाख कोटींच्या गुंतवणूकीचे लक्ष्य ठेवले आहे. सुरक्षा आणि पायाभूत सुविधांमध्ये रेल्वेला सर्वोत्तम बनवायचे असल्याचे प्रभू म्हणाले.

उत्तम प्रवासी सुविधा, सुरक्षित प्रवास, आधुनिक पायाभूत सुविधा आणि रेल्वेचे आर्थिक स्वावलंबन या चतुसूत्रीने रेल्वेचा कायापालट करण्याचे प्रभू यांचे लक्ष्य आहे. रेल्वे मधल्या स्वच्छतेसाठी रेल्वे मंत्रालयात स्वतंत्र विभाग सुरु करण्याची घोषणा प्रभू यांनी केली.

रेल्वे अर्थसंकल्पातील वैशिष्ट्ये

» रेल्वे भाड्यात कोणतीही वाढ नाही- रेल्वेमंत्री

» येत्या पाच वर्षांत ८.५ लाख कोटींची गुंतवणूक करणार

» रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी खासगी कंपन्यांची मदत घेणार

» रेल्वेच्या सफाईसाठी नवीन विभाग

»रेल्वेला स्वच्छ भारत अभियानाशी जोडणार –  रेल्वेमंत्री

»विमानाप्रमाणे रेल्वेतही व्हॅक्युम टॉयलेटची सुविधा

»नवा रेल्वे हेल्पलाईन क्रमांक १३८ तर संकटसमयी १८२ हा क्रमांक एक मार्चपासून सुरु  होणार

»जनरल डब्यांमध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधा

»रेल्वेचे आयआरसीटीसी हे संकेतस्थळ अन्य भारतीय भाषांमध्येही

»महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे

»गाड्यांची माहिती देण्यासाठी एसएमएस अलर्टची सुविधा

»हिंदी आणि इंग्रजीसोबत इतर भारतीय भाषांमध्ये ई तिकीटची सुविधा उपलब्ध होणार

»मुंबईत एसी लोकल चालवणार –  रेल्वेमंत्री

»पाच मिनिटात ई-तिकीट मिळणार, १०८ रेल्वेत ई-केटरिंगची सुविधा

»मोठ्या स्थानकांवर लिफ्ट आणि सरकत्या जिन्यांची सुविधा

»४०० स्थानकांवर वायफायची सुविधा

»रेल्वे स्थानकांवर १७०० बायोटॉयलेट उभारणार

»स्वच्छ रेल, स्वच्छ भारत मोहीम राबवणार

»मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर अलार्मची सुविधा

»रेल्वेच्या नऊ मार्गांवर ताशी २०० किमी वेगाने रेल्वे धावणार

»रेल्वे अपघात टाळण्यासाठी पाच वर्षांचा आराखडा

»दिल्ली-कोलकाता, दिल्ली-मुंबई प्रवासाचा वेळ कमी करणार

»देशातील चार विद्यापीठात रेल्वे संशोधन अभ्यासक्रम

»वर्धा-नागपूर तिस-या मार्गासाठी नवी योजना लवकरच

»निधी उभारण्यासाठी रेल्वे स्थानक, गाड्यांना कंपनीची नावे देणार

»कोकण रेल्वेवर तीन वर्षांत ५० हजारांना रोजगाराची संधी

»तीन हजार मानवरहीत फाटक काढून टाकणार

»सर्व्हे करुनच नव्या गाड्यांची घोषणा- प्रभू

»व्हील चेअरची सुविधा आता ऑनलाईन बुकिंग करता येणार

»लोकल रेल्वेला आधुनिक बनवण्याची योजना

»महिला सुरक्षेसाठी निर्भया फंडातून निधी उपलब्ध करुन देणार

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version