Home टॉप स्टोरी ठाण्यात मराठा समाजाचा ‘मेगाब्लॉक’

ठाण्यात मराठा समाजाचा ‘मेगाब्लॉक’

0

सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी ठाण्यात काढलेल्या मराठा मूक क्रांती मोर्चात लाखो बांधव सहभागी झाले होते.

ठाणे- सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी ठाण्यात काढलेल्या मराठा मूक क्रांती मोर्चात लाखो बांधव सहभागी झाले होते. या महामोर्चाने ठाणे शहर पाच ते सहा तासांसाठी पूर्णपणे ब्लॉक झाले होते. ‘एक मराठा, लाख मराठा’ च्या घोषणांनी ठाणे दुमदुमून गेले होते.

तीन हात नाक्यावरून सुरू होणा-या या मोर्चासाठी शनिवारी मध्यरात्रीपासूनच मराठा बांधव ठाण्यात दाखल झाले होते. रविवारी सकाळी अगदी सहावाजल्यापासूनच मराठा समाजाचे जथ्थेच्या जथ्थे रेल्वे व रस्ते मार्गाने ठाण्याकडे कूच करत होते. तीन हात नाक्यावर मोर्चा सुरू होणार असला तरी तिथून गोखले रोडमार्गे ठाणे रेल्वे स्थानकापर्यंतचा रस्ता मोर्चेक-यांच्या गर्दीने अक्षरक्ष: फुलून गेला होता. तीन हात नाका परिसरात कुणाचा पायपोस लागणार नाही, अशी अभूतपूर्व गर्दी झाली होती. अत्यंत शिस्तबद्ध नियोजनात ११ वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात सहभागी झालेल्यांत महिलांची संख्या लक्षणीय होती. पुढे महिला व त्यानंतर पुरुष अशी शिस्त दाखवत गोखले रोड, गावदेवी मैदान, ‘प्रहार’ कार्यालय, जांभळी नाकामार्गे हा मोर्चा दुपारी दीडच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चेक-यांपैकी आठ मराठा युवतींनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. बाहेर उभारण्यात आलेल्या मंचावर मराठा युवतींनी भाषणे करून सरकारबद्दल मराठा समाजाच्या मनात असलेला रोष व्यक्त केला.

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ८०-९० टक्के गुण मिळूनही त्यांना चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळत नाही व आरक्षणाचा फायदा घेणारे अवघ्या ६० टक्क्यांवर डॉक्टर होतात, असा आरोप यावेळी करण्यात आला. आज हा मोर्चा राजधानीच्या वेशीवर आहे तो उद्या मंत्रालयावर धडकण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

प्रमुख मागण्या काय?

या मोर्चाद्वारे कोपर्डी बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग थांबवण्यासाठी त्यात सुधारणा कराव्यात, मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळावे, मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे, आदिवासी क्षेत्रातील ‘पेसा’ कायद्याची चुकीच्या पद्धतीने चाललेली अंमलबजावणी थांबवावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ फक्त मराठा समाजासाठी असावे, मराठा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी स्वायत्त संस्था स्थापन कराव्यात, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, जमिनी संपादित करून शेतक-यांना देशोधडीला लावणे थांबवावे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी व छत्रपती शिवरायांचे मुंबईत भव्य स्मारक उभारावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावाने जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहे.

मराठा समाजाच्या चोख नियोजनाने मोर्चा यशस्वी!

ठाणे येथे रविवारी आयोजित करण्यात आलेला ठाणे आणि पालघर जिल्ह्याचा मराठा मोर्चा संयोजन समितीच्या चोख नियोजनाने यशस्वी झाला. या मोर्चासाठी संपूर्ण जिल्ह्यात लावण्यात आलेले लक्षवेधी बॅनर्स, स्वयंसेवकांचे साधलेला समन्वय, मोर्चासाठी शहरात झालेली वातावरण निर्मिती आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मोर्चेक-यांची शिस्त या जोरावर हा मोर्चा यशस्वी झाला. मोर्चात कुठेही कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

रविवारी निघणा-या या मोर्चासाठी मागील महिनाभरापासून नियोजन सुरू होते. जिल्ह्यातील प्रत्येक शहरात मोर्चासाठी तयारी सुरू होती. प्रत्येक शहरात जनजागृती रॅली, बैठका घेण्यात आल्या होत्या. शिवाय मोर्चासाठी प्रत्येक शहरात मोठय़ा प्रमाणावर लक्ष वेधून घेणारी बॅनरबाजी करण्यात आली होती. मोर्चासाठी सुमारे २ हजार स्वयंसेवकांची फौज तैनात करण्यात आली होती. शिवाय जिल्ह्यातील शहरा-शहरात स्वयंसेवक नेमण्यात आले होते. या स्वयंसेवकांनी शनिवारी रात्रीपासून ठाणे शहराचा ताबा घेत नियोजन सुरू केले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर स्वयंसेवक तैनात होते. वृद्ध, बालके यांना लोकलमध्ये चढवणे, रेल्वे स्थानकात उतरवणे, मोर्चाच्या मार्गाबाबत मार्गदर्शन करणे अशी मदत त्यांनी केली. तर मोर्चाच्या वेळी कुठे बेशिस्त होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली. मोर्चासाठी ठाणे शहरात स्वत:हून मोठी वातावरण निर्मिती झाली होती. सकाळपासून रेल्वे स्थानके, रस्ते यांवरून भगव्या टोप्या आणि हातात भगवे झेंडे घेतलेले मोर्चेकरी मोठय़ा संख्येने ठाण्यात येत होते. अत्यंत शिस्तीत चालत त्यांनी तीन हात नाका गाठला. यावेळी ठाण्याचे वातावरण भगवेमय झाले होते. मोर्चात अनेक लहान बालके शिवाजी महाराज, झाशीची राणी यांच्या वेशभूषेत सहभागी झाली होती. तर वकील, डॉक्टर, पत्रकार, राजकारणी मंडळीही मराठा म्हणून या मोर्चात सहभागी झाली होती. मोर्चात कुठेही बेशिस्त दिसली नाही, तसेच स्वच्छतेचीही पुरेपूर काळजी घेण्यात आली. कुठेही कागदाचा चिटोराही टाकलेला आढळला नाही. शिवाय कसलीही घोषणाबाजी नाही, धांगडधिंगा नाही, शांतपणे एका ओळीत चाललेले मराठा बांधव, या शिस्त आणि चोख नियोजनाच्या जोरावरच मराठा समाजाने मोर्चा यशस्वी केला. या शिस्तीचे ठाणेकरांनीही कौतुक केले.


अमेरिकेत स्थायिक महिलेने मोर्चासाठी भारतातील मुक्काम वाढवून घेतला सहभाग

मराठा मोर्चात मराठा समाज स्वयंस्फूर्तीने मोठय़ा संख्येने सहभागी होत असून काही जण तर आले नियोजित कार्यक्रम पुढे ढकलून या मोर्चात सामील झाले होते. अमेरिकेत स्थायिक झालेली ठाण्यातील एक महिला मोर्चापूर्वी अमेरिकेला परतणार होती, मात्र तिने आपला प्रवास पुढे ढकलत मोर्चात सहभाग घेतला. अशा समाजबांधवांचे मराठा समाजात कौतुक होत आहे.

मूळच्या ठाणेकर आणि सध्या अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे स्थायिक झालेल्या ज्योती घाग भारतात आल्या होत्या. २६ सप्टेंबर रोजी त्या परतणार होत्या, मात्र १६ ऑक्टोबर रोजी ठाण्यात मराठा मूक क्रांती मोर्चा होणार असल्याचे त्यांना समजले आणि त्यांनी आपले जाणे रद्द केले. रविवारी सकाळी त्या मराठा मूक मोर्चात सहभागी झाल्या होत्या. भारतात काही लोकांना कसलाही धाक राहिलेला नसून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कोपर्डीसारखे अमानुष प्रकार करणा-यांना कडक शिक्षा व्हायलाच हवी, शिवाय मराठा समाजातील तळागाळातील लोकांना न्याय मिळायला हवा. समाज इतक्या मोठय़ा संख्येने रस्त्यावर का उतरत आहे? याचाही विचार होणे गरजेचे असल्याचे ज्योती घाग म्हणाल्या. आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असलो, तरी जन्माने आणि कर्माने मराठा आहोत, याचा मला सार्थ अभिमान आहे, असे त्या म्हणाल्या.


‘जातीचा नसलो, तरी मराठी मातीचा मुसलमान आहे!’

रविवारी ठाण्यात निघालेल्या मराठा मोर्चाला ठाण्यातील मुस्लीम समाजाने समर्थन दिले होते. ‘‘जातीचा नसलो, तरी या मातीचा आहे, विषय आपल्या भावांच्या हक्काचा आहे, मराठा नसलो तरी मला अभिमान आहे, मी मराठी मातीचा मुसलमान आहे’’, असे बॅनर लावून मुस्लीम समाजाने मोर्चाच्या सुमारे १० ठिकाणी मदत कक्ष उभारले होते. हे बॅनर पाहून मोर्चातील प्रत्येक मराठा बांधव आपुलकीने थांबून मुस्लीम बांधवांचे आभार मानत होता. तर अनेकांनी या बॅनर आणि मुस्लीम बांधवांसोबत अभिमानाने सेल्फीही काढले. या प्रत्येक मंडपातून मोर्चेक-यांना सुमारे २० ते २५ हजार पाण्याच्या बाटल्या आणि पाण्याचे ग्लास वाटण्यात आले. विशेष म्हणजे मोर्चा संपल्यानंतर रस्त्यावर पडलेले पाण्याचे ग्लास आणि बाटल्या या मुस्लीम बांधवांनी उचलून रस्ता स्वच्छ केला. ठाण्यातील समस्त मुस्लीम बांधवांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम मोर्चात चर्चेचा विषय ठरला होता.


‘आम्ही भवितव्याचा हक्क मागण्यासाठी आलोय!’

ठाण्यात निघालेल्या मराठा मोर्चात सुशिक्षित तरुण तरुणी व युवा वर्गाचा मोठा सहभाग असल्याचे पाहायला मिळाले. या त्यांच्याशी संवाध साधला असता मराठा समाजाला शिक्षणापासून रोजगारापर्यंत प्रत्येक ठिकाणी सावत्रपणाची वागणूक मिळत असून आमच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने आम्ही उत्स्फूर्तणे आमच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्याचे या तरुणांनी सांगितले.

मराठा समाजाला शिक्षण, रोजगार या कशातही आरक्षण मिळत नाही. समाजातील बहुतांशी लोक हे आर्थिकदृष्टय़ा कमकुवत आहेत. मात्र त्यांच्या मुलांना चांगले गुण मिळूनही चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळत नाही. त्यासाठी शेती गहाण ठेवून डोनेशन भरावे लागते, त्यानंतरही वर्षाला लाखो रुपयांची फी भरावी लागते. याउलट आरक्षणाचा लाभ घेणा-या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती तितकीशी बिकट नसतानाही त्यांना कमी गुणांवर प्रवेश मिळतो, फी परत मिळते. यामुळे आमचे हक्क मारले जात असून आम्ही उत्स्फूर्तपणे आमचे हक्क मागण्यासाठी रस्त्यावर उतरलो असल्याचे मराठा समाजातील तरुणवर्गाने सांगितले.

‘कोपर्डीत मेलेली आमची ताई होती!’

दरम्यान, कोपर्डीत ज्या मुलीवर अत्यंत अमानुषपणे अत्याचार करुन तिला ठार मारण्यात आले, ती आमची ताई होती. अत्याचार करुन तिची हत्या करणा-या नराधमांना फाशीच व्हायला हवी. तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग थांबायलाच हवा, अशा भावना मराठा समाजातील तरुणींनी व्यक्त केल्या.


मराठा समाजासाठी त्यांनी केला ५३ हजार कि. मी.चा प्रवास

मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावेत यासाठी एका अवलियाने आत्तापर्यंत सुमारे ५३ हजार कि.मी.चा प्रवास केला असून आत्तापर्यंत झालेल्या मराठा समाजाच्या तब्बल २१ मोर्चामध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. मनोहर पाटील (४८) असे त्यांचे नाव असून ते मुळचे लातूर येथे राहणारे आहेत. शनिवारी कोल्हापूर येथे झालेल्या मराठा समाजाच्या मोर्चातही ते सहभागी झाले होते. त्यानंतर रातोरात रेल्वेने ठाणे गाठत ते ठाण्याच्या मोर्चातही सहभागी झाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.

अंगावर सदरा आणि पांढरे धोतर, डोक्यावर तिरंगी फेटा, एका हातात छत्रपती शिवाजी महाराजांची छबी असलेला झेंडा, तर दुस-या हातात भारताचा तिरंगा अशा पेहरावात ठाण्याच्या तीन हात नाक्यावर एक व्यक्ती सर्वाचेच लक्ष वेधून घेत होती. त्यांच्या गळ्यात जागतिक शांततेचा संदेश लिहिलेले पोस्टरही होते, ही व्यक्ती म्हणजेच लातूरचे मनोहर पाटील. लातूरच्या ओस तालुक्यातील मंगळूर गावातली रहिवासी असलेले मनोहर पाटील हे मराठा समाजातील दुर्लक्षित आणि तळागाळातल्या लोकांना न्याय मिळावा आणि त्यांना आरक्षणाचे फायदे मिळावेत, यासाठी २००७ सालापासून राज्यात पायी चालून जनजागृती करत आहेत. त्याचवेळी मुंबईवर झालेला २६/११ सारखा हल्ला पुन्हा होऊ नये आणि जगात शांतता नांदावी, यासाठी ते गळय़ात शांततेचा संदेश देणारा फलकही घालतात.

मराठा समाजाला आरक्षण तर मिळावेच, शिवाय कोपर्डीसारखी घटना पुन्हा घडू नये, आणि यातील नराधम आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी त्यांची भावना आहे. तसेच मराठा समाजाला जोपर्यंत त्यांचे हक्क मिळत नाहीत, तोपर्यंत राज्याच्या कानाकोप-यात पायी फिरून जनजागृती सुरूच ठेवणार असल्याचे पाटील यांनी ‘प्रहार’शी बोलताना सांगितले आहे.

तर त्या मुलीच्या कुटुंबाला मदत होईल!

कोपर्डीतील ज्या निष्पाप मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली, तिची घरची परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे मराठा मोर्चामध्ये सामील होणा-या प्रत्येकाने फक्त १ रुपयाची जरी मदत केली, तरी या मुलीच्या कुटुंबाला प्रचंड मोठी मदत देता येऊ शकेल, असे पाटील म्हणाले. यासाठी प्रत्यंक मराठा बांधवाने मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version