Home महामुंबई ठाणे पाकशी आज युद्ध झाले तर भारताचाच विजय निश्चित!

पाकशी आज युद्ध झाले तर भारताचाच विजय निश्चित!

1

पाकिस्तान कधीही भारताची बरोबरी करू शकत नाही, असा ठाम विश्वास भारतीय सैन्याचे माजी हवालदार मोतीराम गोडसे यांनी व्यक्त केला.

ठाणे- भारत आणि पाकिस्तानचे आज जरी युद्ध झाले, तरी १०० टक्के भारताचाच विजय निश्चित आहे, कारण पाकिस्तान कधीही भारताची बरोबरी करू शकत नाही, असा ठाम विश्वास भारतीय सैन्याचे माजी हवालदार मोतीराम गोडसे यांनी व्यक्त केला. भारतातर्फे ३ युद्धात सहभागी झालेल्या गोडसे यांना तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते १२ वीरता मेडल्सने गौरवण्यात आले आहे. सध्या ठाण्यात वास्तव्यास असलेल्या गोडसे यांचा शनिवारी ठाणे पालिकेतर्फे ठाणेभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर रविवारी त्यांनी ‘प्रहार’शी विशेष संवाद साधला.

मूळचे सातारा जिल्ह्यातील वडूज गावचे असणारे मोतीराम गोडसे यांचा जन्म १ मार्च १९४३ साली झाला. १२ जून १९६० रोजी वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी ते भारतीय सैन्यात दाखल झाले. त्यांची नेमणूक नाईक पदावर वायरलेस ऑपरेटर म्हणून झाली. त्यानंतर १९६५ साली पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात जम्मू-काश्मीर सीमेवर त्यांनी युद्धात सक्रिय सहभाग घेतला. इतकेच नव्हे, तर आपण पाकिस्तानचे अनेक सैनिक मारल्याचेही ते अभिमानाने सांगतात. या युद्धानंतर त्यांना राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या हस्ते २ मेडल्स प्रदान करण्यात आली. ६५ सालच्या युद्धानंतर थेट ७१ साली युद्ध झाल्याचे सर्वाना माहीत असेल, तरी ६५ आणि ७१ मध्ये भारताचे चीनसोबत एक गुप्त युद्ध झाल्याचे गोडसे यांनी सांगितले.

या युद्धात सिक्कीम सीमेवर लढताना भारताने चीनचे २०० सैनिक मारले होते. या युद्धातही गोडसे यांचा सक्रिय सहभाग राहिला होता. तर त्यानंतर ७१च्या युद्धात पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश) युद्धातही गोडसे ढाक्याच्या जवळपास तैनात होते. त्यांच्याजवळच असलेला एक पूल तुटल्याने भारतीय सैन्य अडकून पडले होते. हा पूल भारतीय सैन्याने अवघ्या ६ तासांत उभारून बांगलादेशात घुसत युद्ध जिंकल्याची आठवण गोडसे यांनी ‘प्रहार’शी बोलताना सांगितली. या युद्धात गोडसे यांना ५ स्टार मिळाले. त्यानंतर दीड वर्ष संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेत व्हिएतनाम येथे त्यांनी काम केले आणि १९७८ साली १८ वर्षे सेवा बजावून ते सैन्यातून निवृत्त झाले.

..आणि घरच्यांनी तेरावा उरकून घेतला

गोडसे हे १९६५च्या युद्धात आपल्या १२ सहका-यांसह पाकिस्तानच्या सीमेत घुसले होते. मात्र पाकिस्तान आता आपल्याला पकडणार, असे स्पष्ट होताच त्यांनी आपल्या गळ्यातील सैन्याचे बॅच तोडून टाकले. शिवाय त्यांनी त्यांच्याजवळील शस्त्रे आणि रेडिओ सेटही एका म्हातारीच्या झोपडीजवळ जमिनीत पुरून ठेवली. यानंतर सुमारे १३ दिवस कराचीच्या जेलमध्ये त्यांना डांबून ठेवले होते. या १३ दिवसांत युद्धकैदी असूनही पाकिस्तानने आपल्याला अत्यंत वाईट वागणूक दिल्याचे सांगताना गोडसे यांच्या डोळ्यांत पाणी आले. त्याठिकाणी खाण्यासाठी फक्त चणे आणि भाकरी दिली जात होती. तर पिण्यासाठी कधी लघवी, तर कधी इतर काही द्यायचे, असे गोडसे म्हणाले. मात्र त्या जेलचा जेलर अतिशय चांगला होता, आम्हाला रात्री १२ वाजता तो शिधा आणून द्यायचा आणि आम्ही ते शिजवून खायचो, असे त्यांनी सांगितले. त्या जेलरनेच आमच्या जोग नावाच्या कॅप्टनशी संपर्क साधला आणि मग युनोमध्ये जाऊन भारताने आमची सुटका करून घेतली, असे गोडसे म्हणाले. या दरम्यानच्या काळात सैन्याने आमची पेटी घरी पाठवून दिली होती. त्याकाळी फक्त पेटी परत आली, म्हणजे शहीद झालो, अशी समजूत असल्याने घरच्यांनी माझे कार्य केले आणि माझा तेरावा सुरू असतानाच मी घरात आलो, ते बघून घरच्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला, असा अनुभव गोडसे यांनी सांगितला.

कुणाचा बापही भारतालाहरवू शकत नाही!

सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे संबंध असून नुकतेच भारताने पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जकिल स्ट्राईक केल्यानंतर दोन्हींकडून युद्धासाठी तयार राहण्याची तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर खरोखर जर आज युद्ध झाले, तर कोण कोणावर भारी पडेल? असे गोडसे यांना विचारले असता, भारताकडे अमेरिकेचे मार्गदर्शन, रशियाची शस्त्रे आणि भारतीय सैन्यांची चलाखी, चपळपणा, युद्धनीती आहे. त्यामुळे आज पाकिस्तानच काय, कुणाचा बापही भारताला हरवू शकत नाही. आणि पाकिस्तानची तर भारताशी तुलनाच होऊ शकत नाही, असे गोडसे म्हणाले. शिवाय आज फक्त २-३ किलोमीटर गेलेत, उद्या आपले सैनिक इस्लामाबादपर्यंत जाऊन येतील, तुम्ही बघा, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

1 COMMENT

Leave a Reply to Pandudada. Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version