Home टॉप स्टोरी नारायण राणे यांचा नवा पक्ष

नारायण राणे यांचा नवा पक्ष

1

घटस्थापनेच्या दिवशी ‘काँग्रेसमुक्त’ झाल्यानंतर ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखेर रविवारी आपल्या नवीन राजकीय पर्वाचा श्रीगणेशा केला.
मुंबई- घटस्थापनेच्या दिवशी ‘काँग्रेसमुक्त’ झाल्यानंतर ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखेर रविवारी आपल्या नवीन राजकीय पर्वाचा श्रीगणेशा केला. ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या राजकीय पक्षाची मुहूर्तमेढ रोवल्याची त्यांनी घोषणा करताच, कोकणसह संपूर्ण राज्यातील राणे समर्थकांनी एकच जल्लोष केला, तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या परिसरात मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या राणे समर्थकांनीही नारायण राणे आणि स्वाभिमान पक्षाच्या घोषणा देत, सारा परिसर दणाणून सोडला. दरम्यान, आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यघटनेवर अविचल निष्ठा ठेवून, घटनेच्या चौकटीत राहून राज्याच्या विकासासाठी सनदशीर मार्गाने प्रयत्न करणार आहे. पक्षाची नोंदणीही लवकरच केली जाईल आणि पक्षाचे चिन्ह, झेंडा लवकर घोषित करणार असल्याचे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील अल्पसंख्याक, महिला आणि सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी आपला पक्ष काम करेल, असे सांगतानाच ‘देऊ शब्द तो पुरा करू’ हे आपल्या पक्षाचे ब्रीद असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राणे यांच्या पत्रकार परिषदेच्यावेळी माजी खासदार निलेश राणे, माजी आ. श्याम सावंत, दत्ता सामंत, संदीप कुडतरकर, बाळासाहेब अनासकर व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यातील सत्तेत सहभागी होण्याविषयी राणे यांनी समोरून ‘ऑफर’ आली तर विचार करू असे सांगतानाच मंत्रिमंडळात राणे सहभागी होणार की नाही याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच विचारा, असे सांगून पत्रकारांच्या तिरकस प्रश्नांना टोलवून लावले. पदासाठी मी काम करत नाही. काँग्रेसनेच मला मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते, अशी आठवण राणेंनी करून दिली. माझी आक्रमकता जन्मजात असून ती कधीच जाणार नाही. उलट याच आक्रमकपणामुळे अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. पदासाठी मी तडजोड करणार नाही, असे सांगतानाच राणे यांनी आपली मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा अजूनही कायम असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे पत्रकार परिषदेस अनुपस्थित होते. नितेश राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सदस्य कधी होणार, असे विचारले असता ‘मी याविषयी ज्योतिषांना विचारेन’, असे उपहासात्मक उत्तर राणे यांनी यावेळी दिले. याचबरोबर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) सहभागाविषयी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतानाही त्यांनी पक्ष स्थापनेनंतर याचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
पक्षात कोण कोण येणार? असा प्रश्न विचारला असता राणे म्हणाले, ‘आता मी दुकान उघडले असून कोण आमच्यासोबत येणार हे आगामी काळात कळेल,’ हे स्पष्ट केले.

राज्यावर साडेतीन लाख कोटी रुपयांचे कर्ज असून कर्जावर नियंत्रण ठेवायचे असेल, तर उत्पन्न वाढवण्यासाठी कर लावावे लागतात. तुम्हाला विकासही हवा आणि कराचा भार आल्यावर टीकाही करणार! तुम्ही दोन्ही बाजूंनी प्रश्न उपस्थित करू शकत नाही असे त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांची फसवणूक केली असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. माझे काम केले नाही म्हणून मी कोणाचाही विरोध करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान हा मोदींचा प्रवास कौतुकास्पदच आहे. चुका प्रत्येकाकडून होतात. मोदींचा नोटाबंदीचा निर्णय चुकीचा होता, या मतावर मी अजूनही ठाम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मी सत्तेत असलो तर सत्ताधाऱ्यांसारखी भूमिका घेईन आणि विरोधात असलो तरी विरोधकाची भूमिका घेईन. मी दुटप्पीपणा करणार नाही, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

बुलेट ट्रेन आणली तर बिघडले कुठे?
जी बुलेट ट्रेन ५० वर्षानंतर दिसणार होती, ती दोन-चार वर्षात दिसणार असेल, तर बुलेट ट्रेन का नको? असा सवाल करत राणे यांनी बुलेट ट्रेनचे समर्थन केले. माझा विकासाला विरोध नाही. कर्ज काढून का होईना बुलेट ट्रेन मिळत असेल तर त्याला आपला पाठिंबा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात रस्त्यांचा विकास करण्यासाठी कर्ज काढूनच नवीन रस्त्यांची निर्मिती केली आणि रस्त्यांवरील रहदारीवर टोल वसुली सुरू केली. त्यावेळी विरोध झाला नाही, मग आता कर्ज काढून बुलेट ट्रेन येत असेल तर त्याला कोणीही विरोध करण्याचे कारण नाही.

मीडियामुळे ‘मनसे’ जिवंत
राज ठाकरे यांच्या बुलेट ट्रेनच्या विरोधातील धमक्या पोकळ असून त्यांचा पक्ष मीडियाने जिवंत ठेवलेला आहे, असा टोला राणेंनी लगावला. तसेच राज ठाकरे यांनी पंतप्रधानांवर टीका करताना भान ठेवायला हवे होते. उच्च पदावरील व्यक्तीवर टीका केल्याने आपण मोठे होऊ शकतो असे वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे, असे सांगतानाच ज्या पक्षाच्या आमदाराची संख्या एक वर आली आहे, त्याने आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीचे आधी आत्मपरीक्षण करावे, असेही राणे यांनी यावेळी सुनावले.

उद्धव, अशोक चव्हाण सोडून सर्व मित्र
काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण आणि शिवसेनेत उद्धव ठाकरे सोडून त्या पक्षातील सर्वजण मित्र असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार आपल्या संपर्कात आहेत, मात्र वेळ आल्यावर त्यांची नावे जाहीर केली जातील, असे राणे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. राणे यांना भाजपने निमंत्रण दिले तर शिवसेना विरोध करेल का, असे विचारले असता राणे म्हणाले, ‘यात शिवसेनेचा काय संबंध? ते जास्तीत जास्त बाहेर टीका टीप्पणी करतील. ते मला कोठेही जाण्यापासून अडवू शकत नाहीत.’

[EPSB]

सध्या राज्यभर फार कोंदट वातावरण आहे. कधी कडक ऊन, कधी धो धो बरसणारा पाऊस, तर कधी मळभ दाटून आलेले असते.

[/EPSB]

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version