Home महाराष्ट्र गावातील पोलीस पाटील पद रद्द करा

गावातील पोलीस पाटील पद रद्द करा

1

ब-याच काळापासून सुरू असलेली पोलीस पाटील पदे रद्द करावीत, अशी सूचना शिवसेना नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

मुंबई- गावातील पोलीस पाटलांच्या जबाबदा-यांना मर्यादांचे कुंपण असल्याने गावातील इतर प्रश्न सोडवताना पोलिसांना अनंत अडथळे येतात. पोलीस पाटलांचा हवा तसा उपयोग सरकारला गावातील प्रश्न सोडवताना होत नाही. त्यामुळे ब-याच काळापासून सुरू असलेली पोलीस पाटील पदे रद्द करावीत, अशी सूचना शिवसेना नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पोलीस पाटील पदाऐवजी ‘गाव पोलीस मित्र’योजना सुरू करावी, अशी मागणीही राठोड यांनी केली आहे.

राज्यात १९६७ पासून ‘महाराष्ट्र व्हिलेज पोलीस’ अधिनियमांतर्गत हजारो पोलीस पाटील कार्यरत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या पोलीस पाटलांवर महसूल विभागाचाही अंमल राहिला आहे. जुन्या काळापासून पोलीस पाटलांना काही विशेष अधिकार देण्यात आले आहेत. पूर्वी त्यांची थेट नियुक्ती केली जात असे. आता मात्र लेखी परीक्षा घेऊनच ही पदे नेमली जातात. ब-याच वर्षापासून सुरू असलेल्या पोलीस पाटील पदाच्या कर्तव्यात अद्याप सुधारणा झालेली नाही. त्यामुळे गावातील इतर काही समस्या असल्यास किंवा सरकारला एखाद्या योजनेचा पाठपुरावा करायचा असल्यास पोलीस पाटलाचा फारसा उपयोग होत नसल्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी तर पोलीस पाटील संगनमताने लोकांची छळवणूक होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलीस पाटील पद रद्द करावे, अशा सूचना राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केल्या.

त्या बदल्यात तरुणांना प्राध्यान्य देऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या पोलीस मित्र योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘गाव पोलीस मित्र’ योजना सुरू करण्यात यावी. यात पोलीस पाटलांना प्रथम प्राधान्य द्यावे, पोलीस मित्रांना एक विशिष्ट गणवेश असावा. तसेच पोलीस मित्राने गावातील समस्या सोडवताना आपली भूमिका मर्यादित न ठेवता काम करावे. अशा उमेदवारांची नियुक्ती करून गाव पोलीस मित्र योजना सुरू करण्याची मागणी राठोड यांनी केली आहे. राज्यभरात पोलीस पाटलांचे मोठे जाळे आहे. शिवाय अनेकांची २०-२५ वर्षापेक्षा जास्त कालावधीची सरकारी सेवा झाली आहे. सरकारकडून मिळणा-या तुटपुंजा मानधनावर हे पोलीस पाटील आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे ही पदे रद्द केल्यास त्यासाठी जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version