Home महाराष्ट्र कोकण मेवा शेगावीचा योगीराणा संतश्रेष्ठ

शेगावीचा योगीराणा संतश्रेष्ठ

1

श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन ते त्यांच्या समाधीपर्यंतच्या इतिहासाचे आलेखन करताना भक्तांना आलेले अनुभवही ‘गजानन विजय’ ग्रंथात, रसाळ आणि ओघवत्या वाणीने संत दासगणूंनी मांडले, पण संतश्रेष्ठ गजाननाचे भक्तीची तत्कालीन भक्तांनी केलेली संपूर्ण आराधना या ग्रंथात नमूद झाली असे म्हणता येणार नाही.

आधुनिक काळात सुद्धा या योगीराणावर असलेल्या भावभक्तीत नमूद करण्याचे सामर्थ्य कुणाचेही नाही. त्याखाली समुद्राची शाई, मेरुदंडाची लेखणी आणि आकाशाचा कागद हे साहित्य लागेल, तर महर्षी व्यास, महर्षी वाल्मिकीसारखी उत्तुंग प्रतिमा असणारा लेखक होणे आवश्यक आहे. कारण या गजाननाच्या भावभक्तीने प्रत्येक पाऊली निराळे दर्शन होत असते.

गजानन विजय ग्रंथाच्या दुस-या अध्यायात बंकटलाल अगरवाल गजानन भक्तीमुळे वेडापिसा झाला आणि त्याची ती अवस्था दासगणूंनी सांगितली तर गोविंद बुवा टाकळीकरांचे कीर्तन ऐकण्यासाठी बंकटलाल जात असताना त्याला गजानन महाराजांचे झालेले दर्शन आठवत होते. त्याने महाराजांच्या हातावर ठेवलेले २ पैशाचे नाणे देखील स्वीकारले नाही.

हे नाणे तुमचे व्यवहारी।
मला न त्याची जरुरी।
भावभक्ती नाण्यावरी।
मी संतुष्ट राहतसे।।

असे वर्णन दासगणूंनी केले. हे बंकटलाल मित्रासोबत कीर्तनाला गेले. गोविंद बुवा टाकळीकरांनी निरुपणासाठी भागवंताच्या हंसगीताचा एकादश स्कंध घेतला होता. पूर्वार्ध कीर्तनकरांनी सांगितला त्याचा उत्तरार्ध मंदिरासमोर बसलेल्या महाराजांनी विषद केला. तो ऐकताच गोविंद बुवा आश्चर्यचकित झाले आणि या अधिकारी पुरुषाला कीर्तनास मंदिरात आणावे म्हणून त्यांनी आणि इतरांनी महाराजांना विनंती केली.

‘तुम्ही साक्षात शंकर।
बरे न बसणे बाहेर।
धन्या वाचूनि मंदिर।
शून्य साच समर्था।।

असे सांगू न माझे पूर्वजन्मीचे भाग्य म्हणून तुमचे दर्शन झाले हे शिवदर्शन म्हणजे कीर्तनाची फलप्राप्ती होय. हे गोविंद बुवांचे उद्गार महाराजांनी ऐकले आणि गोविंद बुवांना उत्तर दिले, ‘अवघे ईश्वर व्यापिले। आत बाहेर काही न उरले।
मग हा ऐसा हट्ट का? जे जे जयाने सांगावे।

ते ते तयाने आचरावे।
शब्दच्छलांसी न करावे।

साधकाने केव्हाही।। भगवंताचा श्लोक सांगासी। आणि त्याच्या विरुद्ध वागसी। कथेक-याची रीत ऐसी। बरवी नव्हे गोविंदा।। पोटभ-या कथेकरी। तू न व्हावे भूमीवरी। जा कीर्तना समाप्त करी। मी येथुनी ऐकतो।।

हे महाराजांचे उत्तर ऐकताच गोविंदबुवा ओशाळले व महाराजांना नमस्कार करून कीर्तन प्रारंभ करीते झाले. अवघ्या श्रोत्यांना त्यांनी मोठया भावभक्तीने सांगितले की, हे शेगाव राहिले नसून पंढरपूर झाले आहे, कारण संतश्री गजाननाचे रूप प्रत्यक्ष पांडुरंग वस्तीला आले आहेत.

कीर्तन झाल्यानंतर बंकटलाल आपल्या घरी गेला आणि वडील भवानीराम यांना गुरुमूर्ती गजानन महाराजांना घरी आणावे याचा आग्रह करू लागले. वडिलांची परवानगी मिळाली, त्यानंतर चवथ्या दिवशी माणिक चौकात गजानन महाराजांचे बंकटाला दर्शन झाले. महाराजांना घेऊन बंकटलाल घरी आला. भवानीरामांनी महाराजांना नमस्कार केला. ती संध्याकाळची वेळ होती, दुपारच्या असलेल्या पु-या आणि खीर याचा महाराजांना नैवेद्य दाखविला व महाराज भवानीरामाकडे यथेच्छ जेवले.

रात्री मुक्काम तेथेच केला. दुस-या दिवशी महाराजांना मंगलस्नान घालण्यात आले. महाराजांच्या निवासामुळे बंकटलालचे निवासस्थान द्वारका झाले. बंकटलालचे चुलत बंधू इच्छाराम शेटजी यांना सद्गुरूंना आपाल्याही घरी नेण्याची इच्छा झाली, तो सोमवारचा दिवस असल्याने त्याने गजानन महाराजांचे पूजन केले.

जिलेबी, राघवदास, मोतीचूर।
करंज्या, अनारसे, घिवर।
शाखांचे नाना प्रकार।
वर्णन करावे कोठवरी।।

असे वर्णन या महाराजांना दाखविलेल्या नैवेद्याचे केलेले आहे. चार माणसांचे अन्न नैवेद्यासाठी समर्थासमोर ठेवण्यात आले. गणप्या आता खाय हे अन्न असे स्वत:शीच म्हणाले व ते भोजनाला बसले. ते संपूर्ण अन्न खाऊन संपविले. अति आग्रहामुळे महाराजांना उलटी झाली, असाच प्रकार रामदासांनी केला होता. त्यांना खिरीची वासना झाल्यामुळे आकंठ खीर ते प्याले उलटी होताच तीच परत भक्षू लागले.

अति झाले की त्याची माती होते हे तत्त्व जनमाणसात ठसावे म्हणून या संतांच्या कृतीचा उपदेश आहे. गजानन चरित्र वाचताना जागोजागी विखुरलेले उपदेश पाहता, ध्यानी घेत भक्तांनी कटू जीवनाला मधुरता आणावी हेच संतांना आणि दासगुणूंना अपेक्षित आहे.

1 COMMENT

Leave a Reply to BNITIN Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version