Home प्रहार ब्लॉग सेना-भाजपाचा खरा चेहरा?

सेना-भाजपाचा खरा चेहरा?

0

आगामी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याची भाषा करणा-या राज्यातील सत्ताधारी भाजपा आणि त्याचा मित्रपक्ष शिवसेना या दोन्ही पक्षांत सध्या एकमेकांवर चिखलफेख करण्यासाठी चुरस लागली आहे. मात्र, दोन्ही पक्षांनी विरोधाची खालची पातळी गाठल्याने एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सत्तेची मधुर फळे चाखणा-या शिवसेना-भाजपाचा खरा चेहरा कोणता? असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडला आहे.

राजकारणात प्रसंगही युती करणे अपरिहार्य असते. असे असले तरी स्वपक्षाची ताकद वाढवण्यासाठी गलीच्या राजकारणाचा मार्ग स्वीकारून एकमेकांची फरफड करणे निरोगी राजकारणाचे लक्षण नव्हे. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने आघाडी करीत सत्ता गाजवली. आघाडीतही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत होते. पण दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एक शिस्त आघाडीचा धर्म म्हणून पाळली होती.

शिवसेना-भाजपा युती मात्र अशा कोणत्याच धर्म तत्त्वावर उभी नाही. कोणतेच अधिष्ठान या युतीला नाही. राजकीय सत्ता आणि त्यामुळे हाती लागणारे घबाड ओरबडण्यासाठी प्रसंगी एक असल्याचा ही नाटकबाजी आहे.

म्हणून लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत जास्त मते मिळणा-या भाजपाला शिवसेना चिल्लर वाटू लागली आहे. तर भाजपाची सत्ता जणू काही आपल्यामुळेच शाबूत आहे, असा समज करून दररोज कोणत्या ना कोणत्या विषयावर भाजपाला कमी लेखणा-या शिवसेनेचा खरा धर्म कोणता? अशा संभ्रमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जवळून पाहणा-या प्रत्येकास पडला आहे.

पालिका निवडणूक जवळ येताच शिवसेनेला मराठी माणसांचे उमाळे लागतात. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जेव्हा माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा उकरून काढला, तेव्हा शिवसेनेची बोटचेपी भूमिका अवघ्या मराठी जणांनी पाहिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या विदर्भासाठी मतदान केले होते, ते वेगळ्या विदर्भाचे पुरस्कत्रे आहेत, अशी चर्चा सुरू होती. तेव्हा विधानसभेचे कामकाज थांबवून प्रथम मुख्यमंत्र्यांना तुम्ही अखंड महाराष्ट्रवादी की वेगळ्या विदर्भाचे पुरस्कत्रे आहात? असा जाब विचारायचे सोडून शिवसेना आमदार देवनार डिम्पग ग्राऊंडला लागलेल्या आगीचे कारण देते सभागृहात उपस्थित नव्हते. अधिवेशन संपेपर्यंत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना याबाबत जाहीर विचारणा केली नव्हती. तेव्हा कोठे होता शिवसेनेचा अखंड महाराष्ट्रातील

मराठी माणसांचा धर्म? मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महत्त्वाकांशी मेट्रो-३ प्रकल्पाला विरोध करण्यामागे शिवसेनेचे राजकारण आहे. गिरगावसारख्या मराठमोळ्या विभागात शिवसेना शाखांना लागणारी घरघर हेच शिवसेनेच्या विरोधाचे मुख्य कारण असल्याचे भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांचे म्हणणे शिवसेनेच्या मुळावर घाव घालणारे आहे. हा घाव शिवसेनेला एवढा जिव्हारी लागला की भाजपाला ‘निजामाचा बाप’ म्हटले.

त्यावर भाजपाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असलेली व्यंगचित्रे काढून चांगलेच चिमटे काढले. शिवाय जलयुक्त शिवाराचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक करताच जळपळाट झालेल्या शिवसेनेने उस्मानाबाद परांडा तालुक्यातील ‘शिवजलक्रांतीचे’ भांडवल करीत जलयुक्त शिवार योजनेची यश झाकोळण्याचा प्रयत्न केला.

शिवछत्रपतींच्या आशीर्वादेने आणि बाळासाहेबांच्या अथक परिश्रमातून उभ्या राहिलेल्या ‘शिवसेना’ या संघटनेची सत्ताधारी भाजपासमोर सुरू असलेली केवीलवाणी धडपड बाळासाहेबांच्या ख-या शिवसनिकाला अस्वस्थ करणारी आहे. निजामाचे बाप असलेल्या भाजपा सरकारमध्ये मांडीला मांडी लावून शिवसेना बसतेच कशी हा खरा मुदा आहे.
तेव्हा शिवसेनेला मराठी माणसाचा मुखवटा घेऊन जास्त काळ वावरता येणारे नाही.

पालिकेची सत्ता हाती घेण्यासाठी सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप निवडणुकीचा निकाल हाती येताच बदलेले जातात, हे समजण्याइतपत मराठमोळा मतदार दुधखुळा राहिलेला नाही. सोबत विकासाची नाटकबाजी करण्या-या भाजपालाही तो आपली लाडकी मुंबई सहजतेने सोपवणार नाही. भाजपाने मुंबईकरांशी केव्हाच आपलेपणा जपलेला नाही. व्यापारी आणि धनदांडग्यांचा पक्ष अशी झालेली भाजपाची चौकट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाने देखील बदललेली नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या विकासाच्या नावाखाली सुरू झालेले शिवसेना-भाजपामधील आरोप-प्रत्यारोप किती मतलबी आहेत, हे कळून चुकते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version