Home महामुंबई हायकू माझा भाव आहे, तो माझा स्वभाव आहे

हायकू माझा भाव आहे, तो माझा स्वभाव आहे

1

उपजतच साहित्यिक वारसा लाभलेल्या, आचार्य अत्रे यांची कन्या, पत्रकार, लेखिका आणि कवयित्री अशी चतुरस्र ओळख असलेल्या तसंच अनेक लेखकांना लिहितं केलेल्या ज्येष्ठ लेखिका शिरीष पै यांचा १५ नोव्हेंबर हा जन्मदिवस. आज त्या ८७ वर्षाच्या होत आहेत. यानिमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यातून एकूणच त्यांचा साहित्यिक प्रवास उलगडला..

तुमच्या साहित्यिक वारस्याबद्दल सांगा ना!?

मला अतिशय अभिमान वाटतो की, मी आचार्य अत्रे यांची कन्या आहे. मला ते ‘नानी’ म्हणायचे. मी चार वर्षाची होते. बिछान्यात झोपून वडिलांना बघत असायचे. अगदी पहाटेपासून ते लिहीत असायचे. इतकं वाङ्मयाचं प्रेम आणि वेड मी अन्य कोणात बघितलं नसेल. माझ्या वडिलांना लिहिताना पाहून मला अतिशय आनंद व्हायचा. ते कुठेही बसले की मी त्यांच्या मांडीला चिकटून बसायचे.

लेखक, कवी मंडळी त्यांना भेटायला यायची. त्यांच्या गप्पा ऐकत बसायचे. त्या सगळ्या गप्पा ऐकून ऐकून मला मराठी भाषेची उत्तम जाण आली. शाळेत असताना मुलांच्या ‘खेळगडी’ नावाच्या मासिकात, कथास्पर्धेत एक कथा लिहिली. त्या कथेला पहिलं पारितोषिक मिळालं. तेव्हा बाबा मुंबईला होते. त्यांना ते कळलं आणि त्यांना आनंद झाला. त्यांनी मला तिथून एक पत्र लिहिलं. त्यात त्यांनी एक वाक्य लिहिलं. ‘लिही लिही लिही.. अशीच लिहीत राहा..’ हे वाक्य कधीच विसरले नाही. असं मला माझ्या वडिलांनीच घडवलं. शिकत असताना ‘नवयुग’च्या कार्यालयात सारखी जाऊन बसायचे.

त्या वेळी शांताबाई शेळके यांचं काम पाहत होते. त्या नोकरी सोडून निघून गेल्या. तेव्हा बाबा अतिशय रडकुंडीला आले होते. आता काय करणार, कोण मदत करणार या विचारात होते. तेव्हा त्यांना भीत भीत मी मदत करू का, असं विचारलं. त्यावर ते म्हणाले, ‘अरे वा! तू ‘नवयुग’मध्ये कामाला लागलीस. शंभर रुपये पगारावर तुझी नेमणूक केली आहे. उद्यापासून कामाला लाग.’ अशा रितीने मी पत्रकार अकस्मात झाले. त्या वेळी दत्तू बांदेकर होते. त्यांचे रविवारी पहिल्या पानावर ‘मोरावळा’ म्हणून विनोदी सदर होतं. ते लोकप्रिय होतं. कथा, कविता, ललितलेख निवडणं, असं सगळं नवयुगचं काम करत गेले.

इतकंच नाही तर नाटय़ परीक्षण, चित्रपट परीक्षण असं सगळं लिहीत होते. स्वत:चं लेखन काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी ‘लालन बैरागिणी’ ही कादंबरी लिहायला लागले. पुढे ती लोकप्रिय झाली. राजकपूर, नर्गीस, बेबी शकुंतला, उषा किरण अशा कलावंतांच्या मुलाखती घ्यायला लागले. अशी मी लेखन करायला लागले आणि वृत्तपत्रांतल्या वेगळ्या भाषेचा परिचय झाला. वडिलांमुळे मी लेखिका आणि पत्रकार झाले.

तुम्ही पत्रकार झालात आणि अनेक मोठमोठय़ा लेखकांना तुम्ही लिहितं केलंत. नारायण सुर्वेचं नाव आवर्जून घेता येईल, त्याविषयी सांगा ना.

‘नवयुग’मध्ये मी संवादिका होते. त्यानंतर दैनिक ‘मराठा’ सुरू झाला. त्याच्या रविवारच्या पुरवणीतला वाङ्मयीन भाग मी सांभाळत होते. त्यावेळी अनेकांना लिहितं केलं. त्यात प्रामुख्याने नावं घ्यायचं बाबुराव बागुल, नारायण सुर्वे, रा. ग. जाधवांच्या मी अनेक कथा प्रकाशित केल्या होत्या. केशव मेश्राम असे बरेच लेखक त्यातही दलित लेखक पुढे आणले. रविवारची पुरवणी लोकांना आवडू लागली. त्याचा खप एक लाखांनी वाढला. पुढे पपांच्या मृत्यूनंतर ‘मराठा’ची संपादिकाही झाले.

मात्र कामगारांनी संप केला आणि मराठा बंद केला. संधी मिळाली होती ती तिथेच बंद झाली. नारायण सुर्वे अतिशय सुंदर कविता करायचे. त्या काळी सत्यकथा वगैरे त्यांना उभंही करत नव्हते. एके दिवशी ते ‘मराठा’मध्ये मला भेटायला आले. त्या वेळी कम्युनिस्ट पक्षाच्या तारा रेड्डी आमच्याकडे होत्या. त्यांनी मला त्यांच्या कविता पाहायला सांगितल्या. त्यांच्या कविता पाहिल्यावर त्या कविता अतिशय अप्रतिम असल्याचं लक्षात आलं. ताबडतोब मी त्यांची कविता प्रसिद्ध केली आणि लोकांना ती भावली.

त्यानंतर त्यांच्या ब-याचशा कविता प्रसिद्ध केल्या आणि ते एकदम लोकप्रिय कवी झाले. पुढे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या पत्नीने त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध केलं. त्यात त्यांनी माझा उल्लेख केलेला आहे. अतिशय गुणी लेखक होते. अधिकाधिक लेखनाने ते प्रसिद्ध झाले.

हायकूची प्रेरणा कशी मिळाली?

हायकूच्या प्रेरणेची फार मोठी मजेदार गोष्ट आहे. हायकू हा जपानी काव्यप्रकार असून तो तीन ओळींचा आहे. आशा भोसले यांची कन्या वर्षा भोसले ही हायकू या काव्यप्रकाराची खूप मोठी भक्त होती. हायकूचे इंग्रजीत खूप अनुवाद झाले होते. वर्षा भोसलेने मला हे अनुवाद वाचायला आणून दिले आणि मला तो काव्यप्रकार अतिशय आवडला. त्या वेळी मराठामध्ये विजय तेंडुलकर काम करत होते.

त्यांनीही मला काही कविता वाचायला आणून दिल्या आणि म्हणाले, ‘तुम्हाला हा काव्यप्रकार खूप जमेल असं मला वाटतं.’ मी प्रयत्न केला पण मला काही तो काव्यप्रकार जमला नाही. नाद सोडून दिला. पण पुढे एक मजेशीर गोष्ट झाली. सहज बसले होते आणि खिडकीवर एक कावळा ओरडू लागला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला एकदम हायकू सुचला.

‘केव्हापासून ओरडतोय खिडकीवरला एकाकी कावळा भरून आलाय त्याचाही गळा..’
हा मला सुचलेला पहिला हायकू. त्यानंतर बागेमध्ये एक माळी खचाखच फुलं तोडत होता आणि कळ्याच तुटत होत्या. तेव्हा अनेक हायकू सुचले.

‘फुलं तोडताना त्याने फांदी खचकन ओढली.
चुकून कळीच तोडली.’

पुढे एक हायकूचं वेडच लागलं. हायकू करत गेले. चार-पाच संग्रह प्रसिद्ध झाले. नुकताच ‘थोडे हायकू’ नावाचा एक हायकूचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. माझी एक आणखी कविता आहे.

‘हायकू माझा भाव आहे. तो माझा स्वभाव आहे’

जसं काही हायकू लिहिण्यासाठीच माझा जन्म झाला आहे की काय असं मला वाटतं. तो काव्यप्रकार माझ्या रक्तात रुजलाय. मला तो केव्हाही आठवतो. परवा अर्धवट झोपेतही मला हायकू सुचलं.
‘ढेकर दिला,
आतला वारा बाहेर गेला.’
असा विनोदी हायकू सुचला. खूप हायकू केले. मात्र हे करताना मी एक फरक केला, मुळात जपानी हायकूमध्ये यमक हा प्रकार नाही. उच्चाराचं तंत्र आहे. मात्र मी यमक आणलं. दुस-या आणि तिस-या ओळीत यमक केलं.

एकूणच मराठी साहित्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

मराठी वाङ्मय फाय थोर आहे. अगदी ज्ञानेश्वरांपासून सुरुवात केली तर तेराव्या शतकात जावं लागेल. त्यानंतर सोळाव्या शतकात तुकाराम आले. ज्ञानेश्वर, मुक्ताबाई सगळेच अभंग रचत होते. ज्ञानेश्वरी लिहून मराठी साहित्यात फार मोठी मोलाची भर घातली आहे. तुकारामाचे अभंग खूप मोठे आहेत. ज्ञानेश्वर-तुकारामापासून मराठी साहित्याची सुरुवात होते. त्यानंतर महानुभाव पंथात चांगलं काव्य आहे. महादंबेचे ढवळे प्रसिद्ध झाले आहेत. मधल्या काळात मोठं साहित्य आलं नाही.

अभंग, लावण्या, पोवाडे हे शिवाजी महाराजांच्या काळातही होते. इंग्रजी साहित्याच्या परिशीलनानं मराठी साहित्यात बदल झाला. गडकरी, केशवसुत, बालकवी या कवींनी नव्या कवितेला सुरुवात केली. तसंच हरी नारायण आपटे यांच्या कादंबऱ्यांनी वेगळ्या तऱ्हेची भर मराठी साहित्यात घातली आणि मराठी साहित्य वेगळ्या उंचीला जाऊन पोहोचलं. कुसुमाग्रज, बोरकर यांच्यासारखे मोठे कवी झाले.

रेव्हरंड, टिळक, भा. रा. तांबे यांच्यासारखे मोठे कवी झाले. आधुनिक काळातले श्री. ना पेंडसे, करंदीकर, बापट, पाडगावकर यांच्या काव्यवाचनाने मराठी कवितेला त्यांनी खूपच लोकप्रिय केलं. सुरेश भट, ग्रेस असे मोठे कवी महाराष्ट्राला लाभले. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगुळकर, पु. भा. भावे आणि विजय तेंडुलकर यांनी गद्य साहित्यात मोलाची भर घातली. अगदी अलीकडेसुद्धा मराठी कविता बदललेली आहे. वृत्तरचना सोडून दिलेली दिसते.

मात्र चांगले चांगले कवी महाराष्ट्रात आले आहेत. निरजा चांगल्या कविता आणि कथा करतात. अशा तऱ्हेने मराठी साहित्य अत्यंत समृद्ध आणि महाराष्ट्राला नवा विचार देणारं आहे. नवीन कादंबरी, नाटकं चांगली येतायेत. एकूणच मराठी साहित्याचा मला अभिमान वाटतो. कविता, कथा, कादंबरी, नाटकं असा कोणताही प्रकार घ्या. काळाचं भान राखून त्याप्रमाणे नवे नवे विचार मराठी साहित्याने महाराष्ट्राला दिले आहेत. आपण ज्या महाराष्ट्रात जन्मलो त्या महाराष्ट्रात साहित्याचा दर्जा इतका मोठा आहे.

गीतारहस्य लिहिणारे टिळक, संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर, आचार्य अत्रेंसारखे लेखक, पत्रकार ही सगळी मंडळी या महाराष्ट्रात होऊन गेली. तसं पाहायला गेलं नुसती कथा नाही किंवा कविता नाही तर विचारप्रवर्तक वाङ्मय लिहिलं गेलं. साहित्यात, विचारात, लेखनात खूप मोठे मोठे लेखक होऊन गेले आहेत की त्यांनी महाराष्ट्राला, मराठी माणसाला उन्नत केलं.

मराठी साहित्याची एवढी समृद्ध-परंपरा असतानाही मराठी शाळांची गळचेपी होतेय. त्याविषयी तुम्हाला काय वाटतं?

हो, याचं खूप वाईट वाटतंय. याबाबत सरकार काहीही करत नाही. खरं म्हणजे यासाठी आंदोलन व्हायला हवं. आज इंग्रजीचं खूप वेड लागलंय. आजकालची मुलं इंग्रजी शाळेत जातात आणि इंग्रजीतच बोलतात. त्यांना मराठीविषयी काहीही वाटत नाही. अभिमान नाही. पंजाब, बंगाल, कर्नाटक या ठिकाणी पहिली ते दहावीपर्यंत राज्याभाषा वापरली जाते. पण आपल्याकडे का नसावी याचं वाईट वाटतं. महाराष्ट्रात मराठी शाळांविषयी आंदोलन करायला हवं, असं मनापासून वाटतं. जनतादेखील का गप्प बसली आहे, हे समजत नाही. कारण असंच होत गेलं तर मराठी भाषा लुप्त होईल. मुंबई-पुणेसारख्या शहरांच्या बाहेर जी गावं आहेत, तिथे मराठी जिवंत आहे. मात्र मोठय़ा शहरांत लुप्त झाली आहे. सरकारने काहीतरी करायला हवं, असं मनापासून वाटतं.

च् आजच्या पत्रकारितेविषयी तुमचं काय मत आहे?
आजची पत्रकारिताच वेगळी आहे. दैनिकामध्ये बातम्यांना महत्त्व असतं. बातम्या द्यायलाच हव्यात. पण त्यामानाने पुरवणीत विविधता नसते. पुरवणीमध्ये वाङ्मयीन वेड असलेले संपादकच उरले नाहीत. वृत्तपत्र पुढारलेली आहेत. बातम्या चांगल्या आहेत. काही मोजक्या वर्तमानपत्रांची पुरवणी चांगली आहे. त्यात मी ‘प्रहार’चं नाव आवर्जून घेईल. वृत्तपत्राची उत्तम पुरवणी असणं, हे वृत्तपत्रात भरच घालतं.

1 COMMENT

  1. Namaskar,! कैलासवासी shri,बाळासाहेब ठाकरे आणि tumche पप्पा yanchi एक ” khas prakarchi dosti “hoti.
    Aamhi त्या वेळी. मार्मिक आणि maraatha madhun tyanche kisse vaachat hoto, एकदम धम्माल ! Doghanche
    Lekhaat asaaychi. आज दोन्ही महापुरुष aaplyat nahit,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version