Home टॉप स्टोरी शिवसेनेच्या घोटाळय़ाने मुंबईचे वाटोळे!

शिवसेनेच्या घोटाळय़ाने मुंबईचे वाटोळे!

0

शिवसेनेने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण न करता फक्त घोटाळे केल्याने मुंबईचे वाटोळे झाले असून मुंबईच्या अधोगतीला शिवसेना जबाबदार आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. 

मुंबई- शिवसेनेने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण न करता फक्त घोटाळे केल्याने मुंबईचे वाटोळे झाले असून मुंबईच्या अधोगतीला शिवसेना जबाबदार आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. मुंबईतील भूखंड भाजपा सरकारने बिल्डरांच्या घशात घातले आहेत, असेही चव्हाण म्हणाले.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण यांनी शिवसेना आणि भाजपाच्या कारभाराचे वाभाडे काढले. चव्हाण म्हणाले की, शिवसेनेला पराभव दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्यामुळे शिवसेना आता यूपीए सरकारचे गोडवे गात आहे. यूपीए सरकारने केलेली कामे जनतेच्या समोर आहेत, आम्हाला शिवसेनेच्या प्रमाणपत्राची गरज नाही.

या निवडणुकीनंतर शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येतील असा अपप्रचार केला जात आहे. ना महापालिकेत, ना राज्यात काँग्रेस पक्ष कदापिही शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षासोबत जाणार नाही, असे चव्हाण म्हणाले.

शिवसेना-भाजपा हे दोन्ही पक्ष महापालिकेत एकत्र सत्तेत होते. यांनी २०१२ सालीचा जाहीरनामा एकत्रित प्रकाशित केला होता. या जाहीरनाम्यातील अनेक आश्वासने अद्यापही पूर्ण केली नाहीत. मराठी भाषा भवन, मराठी रंगभूमी भवन बांधण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. पण ते पूर्ण केले नाही.

शिवसेना मराठी माणसाच्या नावाने राजकारण करते, पण मराठी माणसाच्या विकासासाठी काहीच करीत नाही. शिवसेनेच्या गेल्या पाच वर्षाच्या काळात मुंबईतील ३७ मराठी शाळा बंद झाल्या आहेत आणि ४० हजार मराठी मुलांनी शाळा सोडली.

रस्ते घोटाळा, डम्पिंग घोटाळा, पेंग्वीन घोटाळा, टॅब्लेट घोटाळा, नालेसफाई घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांशिवाय शिवसेना-भाजपाने काही केले नाही. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करून लोकांचे लक्ष विकासाच्या प्रश्नावरून दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसने मुंबईच्या विकासाची भूमिका मांडली आहे.

शिवसेना-भाजपाचे भांडण हे सत्तेसाठी सुरू असलेली साठमारी आहे, हे जनतेला कळून चुकले आहे, त्यामुळे जनता काँग्रेसलाच निवडून देईल, असे चव्हाण म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी म्हाडा इमारतींच्या पुनर्वकिासासाठी हाऊसिंग स्टॉक रद्द करून प्रीमियम चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय देखील बिल्डरांच्या फायद्याचा आहे. मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाचा पुनविचार करावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली. या पत्रकार परिषदेत बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी शिवसेना-भाजपावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मुंबईतल्या मराठी माणसाला फसवण्याचे काम शिवसेनेने केले.

खंबाटा, असो किंवा सेंटॉर हॉटेल बंद करण्याचे प्रकरण असो, मराठी कामगारांना देशोधडीला लावण्यात शिवसेनाच अग्रेसर राहिली आहे. पालिकेत सत्ता आल्यावर शिवसेना भाजपच्या कार्यकाळातील घोटाळ्यांची चौकशी करून घोटाळेबाजांना जेल मध्ये पाठवू असे निरूपम म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version