Home टॉप स्टोरी भ्रष्ट शिवसेनेबरोबर भाजपा सत्तेत कसा?

भ्रष्ट शिवसेनेबरोबर भाजपा सत्तेत कसा?

1

सरकारमध्ये भ्रष्ट शिवसेनेला जोडीला घेऊन राज्य कसे चालविता, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजपाला केला आहे.

मुंबई- मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेना-भाजपामध्ये दररोज आरोप-प्रत्यारोपांची ‘दंगल’ सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भाजपातर्फे केला जात आहे. मग अशा भ्रष्टाचा-यांना महाराष्ट्रात सरकारमध्ये जोडीला घेऊन राज्य कसे चालविता, असा बोचरा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजपाला केला आहे. शिवसेना-भाजपा एकमेकांवर कितीही आरोप करीत असले तरी ते लाल दिव्यांच्या गाड्यांसाठी काहीही करू शकतात, असा जोरदार टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

महाराष्ट्र सरकारला दोन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी भाजपा-शिवसेना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या विश्वासाने राज्याची सत्ता भाजपाच्या हातात दिली. मात्र त्यांनी राज्यातील जनतेची पूर्णपणे निराशा केली आहे. दिलेले एकही आश्वासन हे सरकार पाळू शकलेले नाही. उलट सत्तेत असलेले मित्र पक्ष शिवसेना-भाजपा रोज एकमेकांशी भांडत आहेत. वेगवेगळे आरोप एकमेकांवर करीत आहेत. शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर भाजपाचे लोक रोज टीका करतात. शिवसेना भ्रष्टाचारी असल्याचे आरोप करतात. शिवसेनाही त्यांना त्याच भाषेत उत्तर देते. शिवसेना इतकी भ्रष्ट आहे, असे भाजपाला वाटते, तर मग कशासाठी राज्यातील सत्तेत त्यांना सामावून घेऊन राज्य करता? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला. त्या म्हणाल्या की, हे दोन्ही पक्ष एकमेकांशी भांडण्यात इतके गुंतले आहेत, की त्यांना राज्यातील जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही. प्रशासनावर या दोन्ही पक्षांचे लक्ष नाही. त्यामुळे दोन वर्षात राज्य पुढे घेऊन जाण्याऐवजी मागे जात आहे.

भाजपा सरकारचा गेल्या दोन वर्षातील कारभार पाहिला तर एकाही क्षेत्रात त्यांनी प्रगती केल्याचे दिसत नाही. राज्याची प्रगती करण्याचे तर सोडाच, परंतु विरोधी पक्षांनी सरकारच्या चुका दाखवून दिल्या तर त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. ‘तुमच्या कुंडल्या आमच्याकडे आहेत. आमच्या विरोधात बोलाल तर कारवाई करू’ असे वक्तव्य मुख्यमंत्री करतात, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्यांच्याकडे खरोखरच आमच्या काही कुंडल्या असतील तर कारवाई करावी, पण स्वत:च्या चुका सुधाराव्यात. राज्यात मराठा मोर्चे निघत आहेत. काय चुकीच्या मागण्या आहेत मोर्चेक-यांच्या? कोपर्डीतील बलात्कारा-यांना शिक्षा द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या, शेती मालाला योग्य भाव द्या अशा मागण्या करणे चुकीचे आहे काय? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी विचारला.

जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा शेतक-यांना मदत करा?

शेतक-यांचे, कष्टक-यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. गेल्या चार वर्षापासून दुष्काळ होता. या वर्षी सुरुवातीला पिके चांगली आली मात्र मध्यंतरी झालेल्या पावसामुळे पिके वाया गेली. त्याची सरकारने साधी दखलही घेतलेली नाही. सरकारच्या दोन वर्षाच्या कारभारानिमित्त त्यांना एकच विनंती आहे की काळय़ा मातीत घाम घाळून जगाला जगविणा-या शेतक-यांकडे दुर्लक्ष करू नका. जे पैसे तुम्ही जाहिरातींवर खर्च करीत आहात, ते पैसे शेतक-यांना मदत करण्यासाठी वापरा. कुपोषणामुळे मृत्यूमुखी पडणा-या आदिवासी बालकांसाठी वापरा, असा सल्लाही सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला दिला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version