ती ची खरेदी

0

पाडवा असो वा भाऊबीज, तिची खरेदी म्हटलं की मोठा प्रश्न समोर उभा राहतो. आयुष्यात दोन नाती खूप महत्त्वाची असतात. एक म्हणजे बायको आणि दुसरे म्हणजे बहीण. पुरुषांचा खिसा कसा रिकामा करता येईल त्याच्या अनेक युक्त्या यांच्याकडे असतात. त्यात भाऊबीज, दिवाळी म्हटलं की हमखास फोडणी मिळणार यात शंका नाही. दै. प्रहारच्या माध्यमातून बघू या यंदाची भाऊबीज आणि पाडव्याची तिची खरेदी कशी असणार आहे ते.

कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीयाही म्हटलं जातं. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले. भाऊबीजेच्या दिवशी कुठल्याही पुरुषाने स्वत:च्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे, असे सांगितलं आहे. यमद्वितीयेला यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो. त्यामुळे या दिवशी नरकात खितपत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो. त्यामुळे भाऊबीजेला वेगळं महत्त्व आहे.

एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याची पद्धत आहे. अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीयेस मृत्यूची देवता यमधर्म याचे पूजन करून त्याच्या चौदा नावांनी तर्पण करण्यास सांगितले आहे. असं केल्यास अपमृत्यू येत नाही.

अपमृत्यू निवारणार्थ श्री यमधर्मप्रीर्त्यथ यमतर्पणं करिष्ये,असा संकल्प करून तर्पण करावयाचे. भाऊबीजेला बहिनीने भावाला टिळा लावून त्याला ओवाळावे. त्यानंतर बहिणीने भावाच्या हाताला लाल-पिवळा धागा बांधावा. त्यानंतर गोड पदार्थ भावाला खाऊ घालावा. भावाने बहिणीचे चरण स्पर्श करून तिचा आशीर्वाद घ्यावा आणि तिला भेटवस्तू द्यावी.


ती म्हणेल तो मोबाईल..
बहिणीसाठी गिफ्ट काय घ्यावे हा मोठा प्रश्न असतो. कारण काहीही घेतले तरी तिला ते पटतं नाही. पण मनातून खरंतर तिला ते आवडलेलं असतं. त्यामुळे यावर्षी तिच्या आवडीची भेटवस्तू घेणार आहे. पंधरावी पास होण्याआधी जर मनाप्रमाणे मार्क मिळवले तर ती मागेल तो मोबाईल घेऊन देईन हे प्रॉमिस केलं होतं. तिनेही माझ्या मनाप्रमाणे मार्क मिळवले. ती ज्या मोबाईलवर हात ठेवेल तो मोबाईल तिला यंदा भाऊबीज गिफ्ट म्हणून मी देणार आहे.
– प्रशांत शेडगे, डोंबिवली


तिला माझा आवडीने गिफ्ट घेईन..
दिवाळीची खरेदी करताना आपल्या बहिणीसाठी काही खास असे काही ठरवलेले नसते. त्यात बहीण जर मोठी असेल तर अगदीच विचार करून या गोष्टी ठरव्याव्या लागतात. लहानपणी पप्पा जे देतील ते ताईला ओवाळणी म्हणून द्यायचो. गेल्या वर्षी तिला एक पुस्तक गिफ्ट म्हणून दिले. कधी टेम्प्टेशन चॉकलेट देऊन तिला खूश केले. या वेळी मात्र एखादा तिच्या आवडीचा ड्रेस किंवा साडी भेट म्हणून द्यायचा विचार आहे. माझ्या पसंतीचे काहीही ती आनंदाने स्वीकारते म्हणून तिचा वाढदिवस आणि भाऊबीज या दिवशी तिला आनंदी करण्यासाठी गिफ्ट हा उत्तम मार्ग आहे
– जाकेश दलाल, बदलापूर


पॉकेट मनीमधून ताईला गिफ्ट..
मी ताईला पैशांचं पाकीट देतो. मला तिची चॉईस माहीत आहे, पण तरी सुद्धा मुलींच्या आवडीनिवडी कधी बदलतील हे सांगता येत नाही. त्यामुळे पैशांचं पाकीट देणं हा उत्तम पर्याय माझ्या पुढे असतो. त्या पैशातून कधी ताई तिच्यासाठी काही वस्तू घेते. काही सेविंग करते किंवा कधीतरी तर माझ्यासाठीच खाऊ आणते. यंदाच्या वर्षी सुद्धा मी तिला पैशांचं पाकीट देईन पण विशेष म्हणजे ते माझ्या पॉकेट मनीमधून देईन.
– प्रसाद सुभाष कथोरे, ठाणे


घरासाठी उपयुक्त वस्तू देईन..
लहानपणी आईवडिलांसोबत एकत्र सण साजरा करायची एक सवयच लागून गेली होती. नोकरीनिमित्त मी आणि माझी बहीण मुंबईला आलो. मग आमची दिवाळी म्हणजे घरात हव्या असलेल्या आणि गरजेच्या वस्तूंची खरेदी. भाऊबीजेच्या दिवशी तिची ओवाळणी म्हणून तिला काही खास नको असते, म्हणून घरात तिला कसे खूश ठेवता येईल, यासाठी कपाट, कुकर अशा घरासाठी उपयुक्त वस्तू दिल्या. एक बहीण म्हणून तिने प्रत्येक वेळी खंबीरपणे दिलेली साथ ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे. तिच्या सुखासाठी अगदी काहीही करायला लागले तरी ते मी आनंदात करेल. बाकी ड्रेस, तिच्या आवडीचा खाऊ हे तिला त्यादिवशी भेट म्हणून देतो.
– महेश चव्हाण, डोंबिवली


रंगीत कानातल्यांचे सेट..
प्रत्येक दिवाळी मी आणि माझी बहीण आकांक्षा आम्हा दोघांसाठी खूप आनंददायी असते. तिला ओवाळणी म्हणून भाऊबीजेला भेट म्हणून मी तिचा चॉईस न आणता मलाच आवडणारी गोष्ट आणतो कारण तिला मी जे काही भेट म्हणून देतो ते तिला खूप आवडतं. यंदा मी तिला आवडणा-या कानातील विविध रंगांच्या झुमक्यांचा सेट देणार आहे.
– अभिषेक देशमुख, ठाणे


तिचं स्पेशल गिफ्ट बेंगलोरमधूनच..
या वर्षी मी भाऊबीजेला बंगलोरला आहे. पण चैताली एकूलती एक आणि त्यातही लहान बहीण आहे. त्यामुळे ती म्हणेल ते तिचे हट्ट मला पुरवावेच लागतात. तिला उपयोगी पडेल अशी एखादी गोष्ट मला तिला भेट म्हणून द्यायला आवडेल. बघू या आता तिला काय हवे आहे ते. बंगलोरवरूनच तिला काहीतरी स्पेशल गिफ्ट नेण्याचा मी माझा प्लॅन आहे.
– गौरव परांजपे, बदलापूर


कार्तिक शुद्ध प्रतिपदेला दिवाळी पाडवा असे म्हणतात. श्री विष्णूने ही तिथी बलीराजाच्या नावाने केली, म्हणून या तिथीला बलीप्रतिपदा म्हटले जाते. बलीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो त्याला देत असे. कोणाला काय, केव्हा आणि कोठे द्यावे याचा निश्चित   विचार आहे अन् तो शास्त्रात आणि गीतेत सांगितला आहे. बलीराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. तेव्हा भगवान श्री विष्णूने मुंजा मुलाचा अवतार घेतला. वामनाने बलीराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, काय हवे? तेव्हा वामनाने त्रिपाद भूमीदान मागितले. वामन कोण आहे आणि या दानामुळे काय होणार, याचे ज्ञान नसल्याने बलीराजाने त्रिपाद भूमी वामनाला दान दिली. त्याबरोबर वामनाने विराटरूप धारण करून एका पायाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. दुस-या पायाने अंतरिक्ष व्यापले अन् त्याने तिसरा पाय कोठे ठेवू? असे बली राजास विचारले. त्यावर बलीराजा म्हणाला, तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवा. तेव्हा तिसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून बलीराजाला पाताळात घालावयाचे असे ठरवून वामनाने, तुला काही वर मागावयाचा असेल तर माग असे त्याला सांगितले. तेव्हा त्याने वर मागितला, आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे आणि आपण मला पाताळात घालविणार आहात, तेव्हा तीन पावले टाकण्याचे जे सर्व घडले, ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे. प्रभू, यमाप्रीत्यर्थ दीपदान करणा-याला यमयातना होऊ नयेत, त्याला अपमृत्यू येऊ नये आणि त्याच्या घरी लक्ष्मीने निरंतर वास करावा. ते तीन दिवस म्हणजे आश्विन कृष्ण चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा. याला बलीराज्य असे म्हणतात.


पहिला दिवाळी पाडवा..
दिवाळीमधला पाडवा म्हटलं की बायकांची धम्माल, नव-याकडून मस्त भेट वस्तू मिळवायची संधी. आमच्याकडे काही अपवाद नाही. नवीन लग्न, पहिली दिवाळी म्हणजे अनंदी आनंद आणि सोबतच बायकोच्या पाडव्याच्या गिफ्टसाठी लांबच्या लांब लिस्ट. त्यात खरेदी करायला बाहेर पडणं म्हणजे कठीणच. म्हणूनच आम्ही खूप मस्त पर्याय निवडला ऑनलाईन शॉपिंग. जितका फायदा बायकोचा आहे त्यापेक्षा
जास्त तोटा माझा होतो. कारण त्यांची शॉपिंग काही संपतच नाही.
– प्रतीक आठवले, कल्याण


तिच्या चॉईसची साडी..
अनेकदा आपण आणलेली भेट ही आपल्या बायकोला आवडेल का? याच चिंतेत प्रत्येक पती असतो. परंतु ही चिंताच दूर सारून यंदा बायकोला तिच्या आवडीचीच वस्तू देणार आहे. कारण अनेकदा मी तिला वेगवेगळ्या गोष्टी भेट म्हणून देत असतो. परंतु तिला भेट म्हणून साडीच फार आवडते. त्यामुळे मी तिला यंदा तिच्या आवडीच्याच रंगाची साडी ही पाडव्याला भेट म्हणून देणार आहे.
– राजेश सावंत,विलेपार्ले


सगळय़ात जास्त खरेदी ‘सौ’ची..
दिवाळी म्हटलं की सर्वात जास्त खरेदी ही आमच्या सौभाग्यवतींची असते. मग अगदी घरात लागणा-या वस्तूंपासून ते आमच्या प्रत्येकाच्या खरेदीपर्यंत. मग अशा चोखंदळ बायकोला काही गिफ्ट द्यायचे म्हटले तर माझी तर खूपच तारांबळ उडते. यंदा आमच्या लग्नाला दहा र्वष पूर्ण होत आहेत मग या दुग्धशर्करा योगामध्ये मी तिला पेशवाई घेण्याचे ठरले. शाही पेहरावाचे खास आकर्षण असल्याने तिच्या या दिवाळीच्या आनंदाला द्विगुणित करण्यासाठी पेशवाई साडी सोबत एक सुंदरसा गजरा देण्याचे मी ठरवले आहे. सणांच्या निमित्ताने तिच्यासाठी केलेली खरेदी म्हणजे तिच्याबद्दल माझ्या मनात असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचे एक माध्यम असे मला वाटते.
– राजेंद्र घारकर, दादर


युनिक फिचर असलेला मोबाईल..
तसं म्हटलं तर यंदाची आम्हा दोघांची ही चौथी दिवाळी. प्रत्येकवर्षी तसं मी तिला साडीच पाडवा भेट म्हणून देत असतो. परंतु यंदा तिला मी आय फोन ७ हा मोबाईल भेट म्हणून देणार आहे. ती मुळातच टेक्नोसॅवी आहे त्यामुळे मी तिला युनिक फिचर असलेला मोबाईल गिफ्ट करत आहे. मला आशा आहे की तो तिला नक्कीच आवडेल.
– गौरव वाझे, ठाणे


दुप्पट शॉपिंग झाली..
आमच्या लग्नाला दोन र्वष पूर्ण झाली. आता मला अमृताच्या सर्व आवडीनिवडी समजल्या. अमृताला जास्त कुर्तीज घालायला आवडतात, त्यामुळे मी तिला या दिवाळीला वेगेवगेळ्या पॅटनचे कुर्ते गिफ्ट करणार आहे. मी दिलेल्या प्रत्येक कुर्तीजवर अमृताने मॅचिंग असे ज्वेलरी खरेदी केले आहेत. त्यामुळे आधी कुर्तीजचा खर्च आणि मग त्यावर ज्वेलरी खरेदी सुद्धा. इन अ‍ॅडव्हान्स दिलेलं पाडवा गिफ्ट तिला नक्की आवडेल याची मला खात्री होती.
– अमरेश शेट्टे, बोरिवली


घडय़ाळ किंवा डिझायनर सेट देईन..
लग्नानंतरचा प्रत्येक पाडवा हा आमच्यासाठी खास असतो. प्रत्येक नव-याची ही तक्रार असते की बायका खूप खरेदी करतात; परंतु त्या आपल्या संसारासाठी तितकेच कष्टदेखील घेतात. मग त्यांचे सण अधिकच आनंदी व्हावे यासाठी हे त्यांच्याकरता केलेले छोटेसे प्रयत्न असतात. पाडव्याच्या दिवशी सकाळी अगदी गजरा डोक्यात माळून मग ओवाळल्यानंतर तिच्या आवडीचे किंवा तिला हवे असलेले एखादे गिफ्ट तिला देतो. साडय़ांची खरेदी तर वरचेवर होतच असते म्हणून यंदा तिला एक ब्रँडेड घडय़ाळ किंवा डिझायनर सेट देण्याचे ठरवले आहे. बघू आता मी पसंद केलेल्या ह्या गोष्टी तिला आवडतील की नाही? पण एकंदरीत तिच्या खरेदीचा आनंद काही वेगळाच असतो.
– सचिन पांडुरंग चव्हाण, डोंबिवली

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version