पुणे : पुण्यातून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात आंधळा झालेल्या एका माथेफिरू तरुणाने तरुणी आणि तिच्या मित्रावर अॅसिडसदृश रासायनिक पदार्थ फेकून जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून अटक केली आहे.
पीडित तरुणी ही आरोपीसोबत राहण्यास नकार देत आपल्या मित्रासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. याचाच राग आरोपीच्या मनात होता. दोघांचा रस्ता अडवत आरोपीने तरुणीला, “तू माझ्यासोबत का राहत नाहीस? तू माझी नाहीस तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही,” अशी धमकी दिली.
शहराच्या मध्यवस्तीत भररात्री झालेल्या या अॅसिड हल्ल्याची माहिती मिळताच पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. गुन्हे शाखेच्या पथकांनी तातडीने आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपी कर्नाटकमध्ये पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी थेट कर्नाटक गाठत आरोपी श्रीराम मधु सरुन (वय २०) याला बेड्या ठोकल्या. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.






