Friday, September 4, 2026

Mohan Bhagwat Britain Visit : सरसंघचालकांच्या ब्रिटन दौऱ्यात ‘लोकसंवादा’वर भर

Mohan Bhagwat Britain Visit : सरसंघचालकांच्या ब्रिटन दौऱ्यात ‘लोकसंवादा’वर भर

लंडन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत 2 ते 7 सप्टेंबरदरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यादरम्यान 100 हून अधिक संघटनांनी भागवत यांचे स्वागत केले असून, त्यांच्या विविध कार्यक्रमांना या संघटनांकडून सहकार्य केले जात आहे. सामुदायिक नेत्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला 310 संघटनांचा पाठिंबा असल्याचेही आंबेकर यांनी सांगितले. (Mohan Bhagwat Britain Visit)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. ब्रिटनमधील ‘इंटिग्रल’ या संस्थेच्या निमंत्रणावरून मोहन भागवत ब्रिटनमध्ये दाखल झाले आहेत. या दौऱ्याचा उद्देश विविध समुदायांतील अधिकाधिक लोकांशी संवाद साधणे हा असल्याचे आंबेकर यांनी स्पष्ट केले. सरकारांमधील राजनैतिक संवाद महत्त्वाचा असला, तरी देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी लोकांमधील थेट संवादही तितकाच आवश्यक आहे, असे आंबेकर यांनी सांगितले. (Mohan Bhagwat Britain Visit)

सांस्कृतिक आणि सभ्यतागत संबंध अधिक मजबूत केल्याने परस्पर समज आणि सहकार्याला व्यापक आधार मिळू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.संघ हा संस्कृती आणि सभ्यतेच्या आधारावर कार्य करणारा जगातील सर्वात मोठा स्वयंसेवी संघटनात्मक समूह असल्याचा दावा आंबेकर यांनी केला. जागतिक पातळीवरही आरएसएसची महत्त्वपूर्ण भूमिका असू शकते, असे त्यांनी सांगितले. सरकारांच्या पातळीवरील संवादासोबतच ‘लोकांमधील संवाद’ आणि ‘संस्कृतींमधील संवाद’ पुढे नेण्याचा भागवत यांचा ब्रिटन दौरा हा एक प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Mohan Bhagwat Britain Visit)

हिंदुत्वाबाबत पाश्चिमात्य शैक्षणिक क्षेत्रात असलेल्या समजुतींबाबत विचारलेल्या प्रश्नावर आंबेकर यांनी त्यासंदर्भात अनेक गैरसमज असल्याचे सांगितले. भारताकडे केवळ आधुनिक राजकीय राष्ट्र-राज्य या संकल्पनेच्या चौकटीतून पाहता येणार नाही. भारताची एक व्यापक सांस्कृतिक आणि सभ्यतागत ओळख आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (Mohan Bhagwat Britain Visit)

हिंदुत्वाची संकल्पना एखाद्या एका धर्मापुरती मर्यादित नसल्याचेही आंबेकर यांनी सांगितले. विविध धर्म आणि धार्मिक परंपरांबद्दल आदर तसेच सत्यावर विश्वास या व्यापक विचारांचा हिंदुत्वाच्या संकल्पनेत समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले. मोहन भागवत यांच्या ब्रिटन दौऱ्यादरम्यान होणाऱ्या संवादातून भारताची सांस्कृतिक संकल्पना तसेच हिंदुत्वाबाबत असलेल्या विविध गैरसमजांना अधिक व्यापक संदर्भात समजून घेण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आंबेकर यांनी व्यक्त केली. (Mohan Bhagwat Britain Visit)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >