Thursday, October 22, 2026

बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीचा वाद मिटणार? विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे महत्त्वाचे निर्देश

कल्याण तालुक्यातील चिकणघर येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीचा प्रश्न सामोपचाराने सोडवण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. जमिनीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे, सातबारा उताऱ्यावरील नोंदी आणि बुद्धभूमी आंतरराष्ट्रीय बौद्ध पर्यटन केंद्राच्या विकासाबाबत विधानभवनात उच्चस्तरीय बैठक पार पडली.

मुंबई : कल्याण तालुक्यातील मौजे चिकणघर येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या दीर्घकालीन ताब्यातील जमिनीचे संरक्षण, अनधिकृत टी.डी.आर. आणि नोंदी रद्द करणे तसेच या ठिकाणी 'बुद्धभूमी आंतरराष्ट्रीय बौद्ध पर्यटन केंद्र' विकसित करण्यासंदर्भात विधानभवनात एका उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत बोलताना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले की, बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीचा वाद कोणत्याही संघर्षाशिवाय सामोपचाराने व लवकरात लवकर सोडविला जावा. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्यास परिसराचा सांस्कृतिक व धार्मिक विकास वेगाने होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. या जमिनीच्यासंदर्भातील कायदेशीर बाबींची पूर्तता करत ही जमीन कायमस्वरूपी भाडेतत्त्वावर देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, या जमिनीसंदर्भातील कायदेशीर व योग्य ती नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठीची प्रक्रियाही विनाविलंब पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी बैठकीमध्ये एमएमआरडीएद्वारे (MMRDA) परिसरात करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आणि त्यामुळे निर्माण झालेला प्रश्नांचाही आढावा घेण्यात आला. एमएमआरडीएच्या कामांमुळे बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीचे किंवा मालमत्तेचे काही नुकसान झाले असल्यास, त्याची पाहणी करून ते नुकसान संबंधित कंत्राटदाराकडून तातडीने भरून घेण्यात यावे, असे निर्देशही अण्णा बनसोडे यांनी दिले. या निर्णयामुळे फाउंडेशनला मोठा दिलासा मिळणार असून रखडलेल्या विकासाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या बैठकीला कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांचे वरिष्ठ अधिकारी तसेच बुद्धभूमी फाउंडेशनचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून या प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >