Thursday, October 22, 2026

विद्याविहार, शीव आणि गोरेगावमधील वाहतूक कोंडी फुटणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण; ‘५९ मिनिटांत मुंबई’चे उद्दिष्ट दृष्टिपथात

मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असलेल्या बहुविध वाहतूक संपर्कव्यवस्थेमुळे प्रवासाचा वेळ कमी होण्याबरोबरच नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानातही सुधारणा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या वेगवान विकासामुळे ‘५९ मिनिटांत मुंबई’ हे उद्दिष्ट साध्य होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असलेल्या बहुविध वाहतूक संपर्कव्यवस्थेमुळे प्रवासाचा वेळ कमी होण्याबरोबरच नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानातही सुधारणा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या विद्याविहार रेल्वेस्थानकावरील पूल, शीव रेल्वेस्थानकावरील नवीन पूल आणि गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला पुणे येथून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार उपस्थित होते. विद्याविहार येथील कार्यक्रमात आमदार राजहंस सिंह, पराग शहा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मुंबईत उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम दिशांना अखंड संपर्कव्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. विद्याविहार, शीव आणि गोरेगाव पूर्व येथील तीनही पूल वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, त्यांच्यामुळे उपनगरांतील प्रवास अधिक सुलभ होईल, असे फडणवीस यांनी सांगितले. विद्याविहार रेल्वेस्थानकावरील पूल पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडतो. या दोन मार्गांदरम्यान प्रवासासाठी यापूर्वी सुमारे ३० मिनिटे लागत होती. नव्या पुलामुळे हा वेळ अंदाजे १० मिनिटांवर येणार आहे. परिणामी, घाटकोपर स्थानकाजवळील उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताणही कमी होण्यास मदत होईल.

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव पूर्व येथील रत्नागिरी हॉटेल जंक्शन ते चित्रनगरीदरम्यान उभारण्यात आलेला उड्डाणपूल पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील संपर्क अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या परिसरातील प्रमुख चौकांमधील वाहतूक कोंडी कमी होऊन वाहनांची ये-जा सुरळीत होईल. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली प्रस्तावित दुहेरी भूमिगत बोगद्यापर्यंत पोहोचणेही या मार्गामुळे सुलभ होणार आहे. सुमारे १.२६ किलोमीटर लांबीचा आणि सहा मार्गिकांचा हा उड्डाणपूल असून, त्याच्या बांधकामात पूर्वनिर्मित काँक्रीट सेगमेंटचा वापर करण्यात आला आहे. वक्राकार पोलादी स्पॅन आणि बहुदिशात्मक रचनेमुळे या प्रकल्पाचे अभियांत्रिकी काम वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.

शीव रेल्वेस्थानकावरील ११२ वर्षे जुना पूल असुरक्षित झाल्याने त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वेमार्गिकांच्या विस्तारासाठीही हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. या मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर लोकल गाड्यांची संख्या आणि वारंवारता वाढविण्याची संधी उपलब्ध होईल. नव्या पुलामुळे शीव पूर्व आणि पश्चिम भागांदरम्यानचा प्रवास सुलभ होण्याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, धारावी आणि वांद्रे या भागांतील संपर्कही सुधारेल. पुलाचे काम नियोजित वेळेच्या सुमारे चार महिने आधी पूर्ण करण्यात आले आहे.

वैशिष्ट्ये काय ?

- शीव रेल्वे पुलाची लांबी ५४.५ मीटर आणि रुंदी २६ मीटर आहे. त्यासाठी ४९६ टन वजनाचे दोन सेमी-थ्रू स्टील गर्डर वापरण्यात आले आहेत. रेल्वे पुलाच्या कामासाठी ३३.५१ कोटी रुपये, तर पोहोच रस्त्यांसाठी ३१.६२ कोटी रुपये खर्च आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, धारावी आणि लालबहादूर शास्त्री मार्गाच्या दिशेने पोहोच रस्ते उभारण्यात आले आहेत. लालबहादूर शास्त्री मार्ग आणि संत रोहिदास मार्गावर पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्गही तयार करण्यात आले आहेत.

- मुंबई महानगरपालिका काँक्रीट रस्ते, कोस्टल रोड आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून शहरातील संपर्कव्यवस्था विकसित करीत आहे. राज्य शासन, केंद्र शासन आणि महानगरपालिका यांच्या समन्वयातून मोठे प्रकल्प वेगाने पूर्ण होत असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले. या कामांमुळे मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये भर पडत असून, त्यासाठी योगदान देणारे महापालिका प्रशासन, अभियंते, कंत्राटदार, अधिकारी आणि कामगारांचे त्यांनी अभिनंदन केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >