Saint Dnyaneshwar : ज्ञानियांचा राजा गुरू महाराव


  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे



ज्ञानेश्वरीतील प्रत्येक प्रसंग समजावून सांगताना ‘ज्ञान’देव अत्यंत साध्या, सोप्या आणि परिणामकारक दाखल्यांनी श्रोत्यांना ‘ज्ञान’ देतात. म्हणूनच संत तुकारामांनी ‘ज्ञानियांचा राजा गुरू महाराव’ असा ज्ञानदेवांचा केलेला गौरव सार्थ ठरतो.



एक शोभादर्शक (कॅलिडोस्कोप) असतो, त्यातून रंग आकारांचे किती पैलू सापडतात! ज्ञानदेव आपल्यापुढे जणू असा शोभादर्शक धरतात आणि त्यातून तत्त्वविचारांची सुंदर चित्रमालिका साकारतात! म्हणून ‘ज्ञानेश्वरी’ वाचणं हा एक अपूर्व आनंददायी अनुभव! त्यात अठराव्या अध्यायात तर त्यांच्या वाणीला अधिकच रसवंती लाभते. ‘स्वतःचा धर्म पाळावा, इतरांचा धर्म कितीही चांगला वाटला तरी त्याकडे जाऊ नये’, ही त्यातील शिकवण! ती देताना त्यांनी सांगितलेला माय-मुलाचा एक दाखला आपण मागच्या लेखात पाहिला. पण ज्ञानदेव केवळ तिथे थांबत नाहीत, ते एकापेक्षा एक सरस दाखल्यांची जणू चित्रमालिका आपल्यापुढे उभी करतात! त्यात किती अर्थपूर्णता आहे! त्याने आपण अवाक होतो.



‘अरे इतर स्त्रिया रंभेहून सुंदर असल्या तरी बालकाला त्या काय करायच्या आहेत?’
येरी जिया पराविया।
रंभेहुनि बरविया।
तिया काय कराविया। बाळकें तेणें। ओवी क्र. ९२८



हा एक बोलका दृष्टान्त! सौंदर्याचं आकर्षण कोणाला नसतं? रंभा ही ‘अप्सरा’. साहजिक रंभेसारख्या स्त्रीकडे मन ओढलं जाणार, हा मानवी स्वभाव ओळखून ज्ञानदेव श्रोत्यांना जागं करतात, सावध करतात. बाबांनो, रंभेकडे (परधर्माकडे) धावू नका; आपल्या आईकडे (स्वधर्माकडे) पाहा. हा उपदेश ज्ञानदेवांच्या या दाखल्यामुळे स्पष्ट, ठसठशीत होतो.



पुढे ज्ञानदेव मानवी सृष्टीकडून जलचर सृष्टीकडे वळतात. ‘अरे, पाण्याहून तूप गुणांत खरोखर श्रेष्ठ आहे; परंतु माशाला त्याचा काय उपयोग?’
‘अगा पाणियाहूनि बहुवें।
तुपीं गुण कीर आहे।
परी मीना काय होये। असणें तेथ॥ ओवी क्र. ९२९



स्वतःचा धर्म हा पाण्यासारखा. मासा म्हणजे संसारी जन! किती सार्थ उपमा आहे! मासा पोहत असतो. त्याप्रमाणे सामान्यजन संसारसागरात पोहत असतात. या माशाला तुपाचा (म्हणजे इतरांच्या धर्माचा) काही उपयोग नाही, म्हणून माणसाने पाण्याप्रमाणे स्वाभाविक असा स्वतःचा धर्म आचरावा.
आता माणसांच्या मनात शंका असते की, हा स्वधर्म पाळताना कष्ट होतात. त्यावर ज्ञानदेवांचं उत्तर असं - ‘कुठलेही कर्म करताना कष्ट होतातच, मग स्व-धर्म का करू नये?’ माणसाच्या मनातील शंकेला ज्ञानदेव अर्जुनाच्या निमित्ताने पुन्हा एक दिशा देतात. तो दाखला असा -



‘धनंजया हे बघ - वाटेने जाताना पदरात शिळा बांधली किंवा शिदोरी बांधली तरी जसे ओझे सारखेच होते; परंतु ज्याने विसाव्याचे ठिकाणी सुखद होईल तेच घ्यावे.’
पैं शिळा कां सिदोरिया।
दाटणें एक धनंजया।
परी जें वाहतां विसांवया। मिळिजे तें घेपे॥ ओवी क्र. ९३८



सिदोरिया म्हणजे शिदोरी (फराळाचे), शिळा म्हणजे मोठा दगड तर विसांवयाचा अर्थ विसाव्याचे ठिकाणी... इथे वाट म्हणजे माणसाचा जीवनप्रवास/ आध्यात्मिक प्रवास होय. शिळा म्हणजे दुसऱ्याचा धर्म (कर्तव्य); तर शिदोरी म्हणजे स्वत:चे कर्तव्य होय. शिदोरी ही माणसाचं पोषण करते, तर शिळा ही माणसाला भारभूत होते. अशा साध्या, सोप्या आणि अत्यंत परिणामकारक दाखल्यांनी ‘ज्ञान’देव श्रोत्यांना ‘ज्ञान’ देतात.
‘ज्ञानियांचा राजा गुरू महाराव
म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें।
असे म्हणून संत तुकारामांनी केलेला त्यांचा गौरव म्हणूनच सार्थ वाटतो.



(manisharaorane196@ gmail.com)

Comments
Add Comment

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तसं पाहिलं तर

Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना!

शारदीय नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. पितृपक्ष संपला की दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते. अश्विन महिन्यातील

Sarvapitru Amavasya 2026 : पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, ‘हा’ दिवस ठरणार महत्त्वाचा ! संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी

Sarvapitru Amavasya 2026 : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजेच

Navratri Festival : यंदा नवरात्रीत अष्टमी-नवमी एकाच दिवशी, जाणून घ्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखा

Navratri Festival : नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी यंदाचं नवरात्र विशेष ठरणार आहे. देवीच्या नऊ

Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

Navratri 9 Days Colours 2026: शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये