Street Family : रस्त्यावरचा थाटलेला संसार!

मुंबई (मानसी खांबे): तो भरडा, चिरका आवाज, त्यात त्याचा टेम्पो चढा. क्षणभरासाठी का होईना पण पदपथावरील त्या वादंगाने कानठळ्या बसल्या होत्या. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा ‘त्या’ दोन कुटंबांतील वादावादीकडे खिळून राहत होत्या. दोन मद्यपी पुरुषांमधील झगडा आता बायका पोरांना पण त्यात ओढत होता. कोणी पोलके सांभाळत अंगावर धावून जात होते. तर कोणी बेंबीच्या खाली नेसलेल्या साडीचा पदर सावरत शिव्यांची लाखोली वाहत होते. कान, नाक टोचलेल्या काटकुळ्या पोरीही भांडायला मागे नव्हत्या. दोन्ही बाजूने शाब्दिक घमासान सुरू झाले होते. आवाजाने कळस गाठला होता. प्रश्नाला प्रतिप्रश्न होता. एकमेकांच्या मानेवर बसू पाहणारी माणसे काही वेळातच शांत झाली. बहुधा सामंजस्याची भूमिका त्यांनी घेतली असावी. ते काहीही असो. पण २४ तास रस्त्यावरच राहणाऱ्या कुटुंबांनी येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.


सणसुद आले की मुंबईच्या पदपथांवर ‘हे’ लोक हमखास नजरेत पडतात. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला हार, आपट्याची पाने यांचा ठेला, स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडे, एरवी फुगे, खेळणी असा लवाजमा घेऊन एखाद्या पुलाखाली, रस्त्यांवर हे विक्रेते दिसतात. भरड्या, चिरक्या आवाजात आपल्याच भाषेत ते एकमेकांशी संवाद साधत असतात. थोडे नजरेने चाचपडले तर मग आसपास त्यांचे बहरलेले कुटुंब दिसते. त्यात चार - पाच लहानग्यांच्या वावर असतो. नवजात बालके, त्यांना दूध पाजणाऱ्या माता दिसतात. एका बाजूला फुलांची माळ विणताना दुसरीकडे मांडीवरच्या बाळाला दूध पाजणे या दुहेरी कामासोबत त्यांच्या तोंडाची बडबड सुरूच असते. लगतच्या भिंतीवर त्यांचे कपडे वाळत घातलेले असतात. रस्त्याच्या एखाद्या कोनाड्यात आडोशाला झाडाला खेटून फाटलेल्या साड्यांनी चार कोपरे झाकले की यांची मोरी तयार असते. महिला वर्गाची आंघोळीची सोय झाली. चार विटा रस्त्यावरच मांडून त्याला लाकडाची धग मिळाली की मग यांची चूल पेटली. त्यावरच कधीतरी भाकरी, भात खाऊन पोट भरायचे. कधी कोणी खायला दिले तर दिले. नाहीतर कधीतरी उपाशीच झोपायचे. मुळात पैसे कमवायचे स्त्रोतच कमी.



धंदा झाला तर झाला, नाहीतर कधी गल्ल्यात खडखडाट. शनिवार आला की यांचा हक्काचा धंदा म्हणजे ‘नजर उतरणारे’ लिंबू विकणे. हे लोक धंदा श्रीमंत होण्यासाठी नव्हे तर पोटाची खळगी भरण्यासाठी करतात. कमवलेले पैसे साठवून ठेवायला कपाट नाही, बँकेत अकाउंट नाही. ते तयार करण्यासाठी आधार कार्ड, किंवा पॅन कार्डही नाही. साठवलेले पैसे, वस्तू चोरी होतील याचे भय नाही. मुळात तसा काही प्रकारच यांच्याकडे नसावा बहुधा. वयाच्या १६-१७ व्या वर्षीच लग्न बंधनात अडकल्याने मुलेही तुलनेने लवकरच जन्माला येतात. उन्हाळा असो पावसाळा असो वा हिवाळा रस्त्याचा कडा म्हणजेच फुटपाथ हेच त्यांचे घर होते. या रस्त्यावरच ही मुलेबाळे लहानाची मोठी होतात.


पैशाच्या मोहापायी खेळलेल्या जुगारात हक्काचं घर गेल्यामुळे, तर एखाद्याच्या कुटुंबातील सदस्याला आजाराच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी या लोकांनी मुंबईची वाट धरली. मात्र मुंबईत राहणे प्रत्येकालाच जमत नाही. त्यात डोक्यावर कर्जाचा डोंगर असतो. मग त्यात हे फूटपाथच यांचे घर होते आणि रस्त्यावर संसार मांडला जातो. कोणी कारवाईच्या नावाखाली हकलवून लावते. तर कोणी कशी बशी मिळवलेली ओळखपत्रे हिसकावून नेते. तर कधी पोटाची खळगी भरण्यासाठी पायपीट करून तयार केलेले विक्रीचे सामान देखील जप्त केले जाते. नोकरी केली तरी कोण पगार बुडवते, तर कोणी खोटे आळ टाकून संकटात भर घालते. खिशात कवडी नाही, मात्र तरीही उद्याची भ्रांत नाही.


आकाशातले तारे मोजत गाढ झोप घ्यायची. दुपारी, रात्री निवांत पत्ते खेळायचे. हे पाहिल्यावर मग प्रश्न पडतो की, पत्ते खेळायला यांच्याकडे पैसा येतो कुठून. प्रश्न पैशाचा नसतोच. चिंतेचाही नसतो. मानसिकतेचा असतो. मनी ‘समाधान’ असेल ना तर रस्त्यावरच्या संसारातील आनंद मिळवता येतो. मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या ‘या’ समाजाच्या जगण्याचे कदाचित हेच बळ असावे.

Comments
Add Comment

ब्रिटनचे प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन यांच्या भारत दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल

मुंबई: ब्रिटनचे प्रिन्स विलियम (Prince William) आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन (Kate Middleton) हे पुढच्या तीन दिवसांसाठी

ठाणे जिल्ह्यातील कोतवाल भरती परीक्षेची तारीख बदलली; आता या दिवशी होणार परीक्षा, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी

Mumbai Bomb Threat : CSMT रेल्वे स्थानक पुन्हा एकदा उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून कसून शोधमोहीम सुरू

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आल्याने

Mumbai 26/11 attack : मुंबईतील २६/११ च्या नरिमन हाऊसची रेकी केल्याप्रकरणी २० वर्षीय तरुणाला अटक

मुंबई : मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेल्या कुलाबा येथील नरिमन हाऊससह शहरातील काही

BMC Revenue: महापालिकेच्या महसूलात तबबल 815 कोटींनी होणार वाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिकेचा महसूल वाढवण्याच्यादृष्टीकोनातून लिलाव पध्दतीने भूखंड भाडेकरारावर

Sion Hospital: महापालिकेच्या शीव रुग्णालयात अतिरिक्त ड्युअल एनर्जी सी.टी.स्कॅनची सुविधा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): रुग्णांच्या आजारांसाठी तसेच विविध रोगांचे निदान करण्यासाठी डयुअल एनर्जी सी.टी. स्कॅनचा