इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन
June 26, 2025 07:40 PM
Archer included in England squad for second Test
लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडने मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना २ जुलै रोजी बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे सुरू होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने संघ जाहीर केला आहे. या संघात ३० वर्षीय वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची निवड झाली आहे. आर्चर शेवटची कसोटी फेब्रुवारी २०२१ मध्ये खेळला होता. आतापर्यंत १३ कसोटी सामने खेळलेला आर्चर २ जुलैपासून १४ वी कसोटी खेळणार आहे.
पाठीच्या कण्याच्या दुखापतीमुळे दीर्घ काळ आर्चर क्रिकेटपासून दूर होता. २०२१ ते २०२४ या काळात तो मैदानाबाहर होता. पुनरागमन केल्यानंतर आधी एकदिवसीय क्रिकेट खेळलेला आर्चर आता कसोटी क्रिकेटमध्येही पुनरागमन करत आहे. आर्चरचा समावेश वगळता इंग्लंडच्या उर्वरित संघात कोणताही बदल नाही. पहिली कसोटी खेळलेले खेळाडूच दुसऱ्या कसोटीतही खेळणार आहेत.
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.
इंग्लंड विरुद्ध भारत पाच कसोटी सामन्यांची मालिका २०२५
पहिली कसोटी, हेडिंग्ले, लीड्स - इंग्लंड पाच गडी राखून विजयी
दुसरी कसोटी, एजबॅस्टन, बर्मिंगहॅम - २ ते ६ जुलै
तिसरी कसोटी, लॉर्ड्स, लंडन - १० ते १४ जुलै
चौथी कसोटी, एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर - २३ ते २७ जुलै
पाचवी कसोटी, केनिंग्टन ओव्हल, लंडन - ३१ जुलै ते ४ ऑगस्ट