Friday, November 27, 2026

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

Mumbai Indians Hand Leadership Back to Rohit Sharma: आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्स फासे टाकले. तीन वर्षानंतर पुन्हा एकदा रोहित शर्माच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी टाकली आहे. हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये गेल्यानंतर हा निर्णय घेतला गेला आहे. या घडामोडीनंतर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे.

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात मुंबई इंडियन्समध्ये एक खेळाडू म्हणून खेळत होता. मात्र या तिन्ही पर्वात मुंबई इंडियन्सच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे कर्णधार बदलाच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं असून रोहित शर्मा आयपीएल 2027 स्पर्धेत संघाची धुरा सांभाळणार आहे. मुंबई इंडियन्सला पाचवेळा जेतेपदाची चव चाखून देण्यात रोहित शर्माचं नेतृत्व मार्गदर्शक ठरलं होतं. त्यामुळे फ्रेंचायझीने त्यावर विश्वास टाकला आहे. असं असताना रोहित शर्माबाबत मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने एक खास पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. यात ब्लू हार्ट आणि #CaptainRo हॅशटॅगचा वापर केला आहे. मुंबई इंडियन्सने एका सिनेमॅटिक व्हिडीओचा वापरही केला आहे. या व्हिडीओत रोहित शर्मा संघाच्या जर्सीत टीमसोबत मोठ्या आत्मविश्वासाने चालताना दिसत आहे. व्हिडीओत गोल्डन क्राउन आणि 'कॅप्टन रो'पुतळ्यासारख्या चिन्हांद्वारे त्याच्या पुनरागमनाचा आनंद साजरा करण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्सने काय केलं ट्वीट?

रोहितच्या कर्णधारपदी पुनरागमनाची बातमी कळताच चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.सोशल मीडियावर त्याला 'हिटमॅन' आणि एक महान कर्णधार म्हणून गौरवणाऱ्या प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला आहे. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, "सर्वांनी हसा, हसा." या पोस्टसोबत एक निळ्या रंगाचा हार्ट आणि #CaptainRo हा हॅशटॅग आहे. व्हिडिओच्या शेवटी रोहित शर्मा देखील दिसत आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, "मुंबई इंडियन्स माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग राहिला आहे. या संघाचे कर्णधारपद भूषवणे ही माझ्यासाठी नेहमीच अभिमानाची बाब राहिली आहे. आगामी हंगामाबाबत नीता वहिनी आणि आकाश यांच्यासोबत झालेली चर्चा खूपच उत्साहवर्धक आहे. मला विश्वास आहे की आम्ही या हंगामात चांगली कामगिरी करू शकतो." रोहित शर्मा पुढे म्हणाला की, 'मी 20व्या हंगामाची आणि पुढील आव्हानांची आतुरतेने वाट पाहत आहे. आमच्या संघाला आनंद साजरा करण्याच्या अनेक संधी मिळाव्यात अशी माझी इच्छा आहे. आमच्या शैलीनुसार क्रिकेट खेळणे, एकत्रितपणे स्पर्धा करणे आणि खेळाचा आनंद घेणे यावर आमचे लक्ष केंद्रित असेल.'

रोहित शर्माची कर्णधारपदाची कारकिर्द

रोहित शर्माने 2013 मध्ये पहिल्यांदा मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद स्वीकारलं होतं. त्यानंतर मुंबईने त्याच्या नेतृत्वात 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये जेतेपद पटकावलं होतं. असं असातना फ्रेंचायझीने त्याला 2023 नंतर कर्णधारपदावरून काढलं आणि हार्दिक पांड्याकडे जबाबदारी दिली. 2024 ते 2026 या तीन पर्वात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली. 2025 मध्ये मुंबई इंडियन्स संघ क्वॉलिफायर 2 पर्यंत पोहोचले. पण अंतिम फेरी गाठण्यात अपयश आलं.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >