टीम इंडियासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान

गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना गुवाहाटी येथे शनिवार २२ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. याआधी कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला. यामुळे गुवाहाटी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचे मोठे आव्हान भारतापुढे आहे. मालिका वाचवण्यासाठी भारताला कामगिरी सुधारावी लागणार आहे.


गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर कसोटी सामना खेळवला जाईल. सकाळी नऊ वाजल्यापासून हा सामना सुरू होणार आहे. बारसापारा स्टेडियमवर पहिल्यांदाच कसोटी सामना होतो आहे. येथील खेळपट्टी अनोळखी आहे. यामुळे इथे गोलंदाजांना साथ मिळणार की फलंदाजांना याचा अंदाज करणे सध्या कठीण आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे गुवाहाटी कसोटी खेळणार नाही. तो उपचारासाठी मुंबईला गेला आहे. गिलच्या अनुपस्थितीत रिषभ पंत कर्णधारपद सांभाळणार आहे. दुसरीकडे पाहुण्या द. आफ्रिका संघालाही धक्का बसला आहे. त्यांचा हुकमी गोलंदाज कागिसो रबाडा बरगडीला दुखापत झाल्याने या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी लुंगी एनगिडीचा संघात समावेश करण्यात आला. विश्वविजेत्या दक्षिण आफ्रिकेला गेल्या तीन मालिकांमधील भारताचा हा दुसरा मालिका पराभव करण्याची संधी आहे, तर भारताला मालिका वाचवण्यासाठी ही कसोटी जिंकणे आवश्यक आहे.


मायदेशातली प्रत्येक कसोटी मालिका जिंकणारा भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध हरला. यामुळे १२ वर्षांपासूनची विजयाची परंपरा पहिल्यांदाच थांबली. आता गुवाहाटी कसोटीत कामगिरी सुधारली नाही तर भारतावर पुन्हा एकदा कसोटी मालिका गमावण्याची नामुष्की येणार आहे. कोलकाता येथे कागिसो रबाडा नसतानाही मार्को जॅन्सेन आणि अनुभवी सायमन हार्मेर यांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने भारताला रोखले होते. यामुळे गुवाहाटीत भारतापुढे दक्षिण आफ्रिकेचे मोठे आव्हान असेल असे मत क्रीडा अभ्यासक व्यक्त करत आहे.


नियमित कर्णधार शुभमन गिल याच्या गैरहजेरीत कसोटीत अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत भारताचे नेतृत्व करणार आहे. पंत हा गेल्या १२ महिन्यांत भारताचे नेतृत्व करणारा चौथा कर्णधार असेल. संघात सहा डावखुरे फलंदाज असल्यामुळे हार्मेरचा धोका लक्षात घेता, अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी किंवा बी साई सुदर्शन यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. फिरकीपटूंमध्ये अक्षर पटेल बाहेर राहण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकाचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतूनही बाहेर पडला आहे. यामुळे, जॅन्सेन आणि कॉर्बिन बॉश यांचे स्थान निश्चित झाले आहे.


गुवाहाटीची खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजीला नंतर फिरकी गोलंदाजीला पोषक असेल असे काही क्रीडा अभ्यासकांचे मत आहे. गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर होत असलेला सामना हा या मैदानावरील पहिला कसोटी सामना आहे. या निमित्ताने ही जागा हे भारताचे तिसावे आणि जगाचे १२४ वे कसोटी सामन्याचे मैदान आहे. हे स्टेडियम २०१२ मध्ये पूर्ण झाले आणि २०१७ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला. त्यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० सामना खेळवण्यात आला होता. भारतीय संघाने आतापर्यंत तेथे चार टी-२० आंतरराष्ट्रीय आणि दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत.


संभाव्य संघ


भारतीय संघ : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन,रिषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


दक्षिण आफ्रिका संघ : एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, विआन मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जिओर्गी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (यष्टीरक्षक), सायमन हार्मर, केशव महाराज, मार्को यान्सन, कॉर्बिन बॉश.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून