नामनिर्देशन पत्रे, निवडणूक खर्च आणि आचारसंहितेबाबत राजकीय पक्षांना दिली माहिती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता निवडणूक प्रक्रिया पूर्णतः निर्भय, मुक्त, पारदर्शक तसेच शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी महानगरपालिका प्रशासन व निवडणूक यंत्रणा कटिबद्ध आहे. या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सर्वतोपरी व व्यापक तयारी केली असून, आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत राजकीय पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लोकशाही मूल्यांचे संवर्धन व्हावे तसेच निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व विश्वासार्ह राहावी यासाठी सर्व राजकीय पक्षांनी, त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, तसेच महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे. निवडणूक प्रक्रियेत एक सकारात्मक व आदर्श उदाहरण निर्माण करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी केले आहे.


मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्‍या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत महानगरपालिका मुख्‍यालयात सोमवारी २२ डिसेंबर २०२५ रोजी बैठक संपन्‍न झाली. यावेळी गगराणी यांनी निवडणुकीच्या विविध प्रशासकीय, तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची सविस्तर माहिती दिली. अतिरिक्‍त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सहआयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) विश्‍वास शंकरवार, सहायक आयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्‍लाळे, उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी यांच्‍यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.


निवडणुकीच्या सुलभ संचलनासाठी प्रशासकीय विभाग कार्यालयनिहाय कार्यान्वित करण्यात आलेल्या एकूण २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय आणि त्यांच्या कार्यक्षेत्राबाबत सविस्तर माहिती राजकीय पक्षांना देण्यात आली. यासोबतच नामनिर्देशन प्रक्रिया, अर्जांची छाननी, हरकती नोंदवणे आणि निवडणूक प्रक्रियेतील दैनंदिन कामकाजासाठी या कार्यालयांशी संपर्क साधण्याच्या पद्धतीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. उमेदवारांना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर आवश्यक ती सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे, असे महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी सांगितले.


अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्‍या की, निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे (उमेदवारी अर्ज) दाखल करताना उमेदवारांनी चूक करू नये, यासाठी सर्व मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. शपथपत्रातील कोणताही रकाना कोरा ठेवल्यास किंवा चुकीची माहिती आढळल्यास उमेदवाराचे नामनिर्देशन रद्द होऊ शकते, यासह इतर सर्व बाबी लक्षात घ्याव्यात, असे त्या म्हणाल्या.


सहआयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) विश्‍वास शंकरवार म्‍हणाले की, महानगरपालिकेच्या वतीने 'स्वीप' (SVEEP) कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्‍ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच, निवडणूक खर्चाबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी प्रचारादरम्यान होणाऱ्या प्रत्येक खर्चाची नोंद ठेवणे आणि विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्र, शौचालय वापर प्रमाणपत्र, जोडपत्र १ आणि जोडपत्र २, निवडणूक उमेदवार प्रतिनिधी नियुक्ती यासह विविध मुद्यांवर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर