कोकणातलो बाबूली मेस्त्री गाजवणार ऑस्कर; दशावतार सिनेमाची ऑस्करसाठी निवड

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण ... . २०२५ मध्ये प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळवणारा ‘दशावतार’ हा मराठी चित्रपट थेट ऑस्कर अर्थात अकॅडमी अवॉर्ड्स २०२६ च्या मुख्य स्पर्धेत पोहोचला आहे. विशेष म्हणजे मराठी सिनेइतिहासात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाची ‘मेन ओपन फिल्म कॅटेगरी’मध्ये निवड झाल्याने सिनेप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.


‘दशावतार’ने मागील वर्षी बॉक्स ऑफिसवर यश मिळवताच कलात्मक आणि पारंपरिक सांस्कृतिक मांडणीमुळेही आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मराठी प्रेक्षकांसोबतच अमराठी रसिकांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं. इतकंच नाही, तर हा सिनेमा मल्याळम भाषेतही प्रदर्शित करण्यात आला होता. आता २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ‘दशावतार’ मराठी सिनेमाचं नाव उज्ज्वल करताना दिसतो आहे.


चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितलं की, अकॅडमी अवॉर्ड्सच्या मुख्य स्पर्धेसाठी जगभरातून १५० हून अधिक चित्रपटांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये ‘दशावतार’ हा एकमेव मराठी चित्रपट आहे. विशेष म्हणजे अकॅडमीच्या अधिकृत स्क्रीनिंग रूममध्ये दाखवला जाणारा हा पहिलाच मराठी सिनेमा ठरणार आहे.


 


सुबोध खानोलकर यांनी निर्मात्यांना आलेल्या अधिकृत ई-मेलचा स्क्रीनशॉट शेअर करत ही निवड निश्चित असल्याचं स्पष्ट केलं. अनेक वर्षांची मेहनत, प्रामाणिक प्रयत्न आणि मोठी स्वप्नं पाहण्याचं धाडस याची आज दखल घेतली जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. ‘दशावतार’चं हे यश केवळ एका चित्रपटापुरतं मर्यादित नसून, मराठी सिनेमा जागतिक पातळीवर सक्षमपणे उभा राहू शकतो, याचा हा ठोस पुरावा असल्याचं त्यांनी सांगितलं.


या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी बाबुली मेस्त्री या कोकणातील दशावतार कलाकाराची भूमिका साकारली असून, त्यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे. यासोबतच महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, रवी काळे, विजय केंकरे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर आणि कोकणातील स्थानिक कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.


ऑस्कर जिंकणं किंवा अंतिम यादीत पोहोचणं हा पुढचा टप्पा असला, तरी मुख्य स्पर्धेत मराठी चित्रपटाचा समावेश होणं हीच मोठी बाब मानली जात आहे. ‘दशावतार’मुळे मराठी सिनेमाची मान जागतिक स्तरावर उंचावली असून, हा प्रवास केवळ सुरुवात असल्याची भावना सिनेप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

Paro Film : ‘पारो: वधू गुलामगिरीची अज्ञात कहाणी’ चित्रपट लवकरच; वधू तस्करीचा विषय मांडणारा नवा सिनेमा

महिलांची वधू म्हणून खरेदी-विक्री आणि त्यातून होणारे शोषण या गंभीर सामाजिक समस्येवर भाष्य करणारा ‘पारो: वधू

शिक्षकांच्या संघर्षाची गोष्ट सांगणारा ‘कबीर सर का आखरी लेसन’ इफ्फीमध्ये झळकला

काळ बदलला, वर्ग बदलले, फळ्याची जागा स्मार्ट बोर्डने घेतली. पण या बदलत्या काळात अनेक पिढ्या घडवणारे शिक्षक मात्र

Fulwara Marathi Movie: 'फुलवरा'चा लावणीसाज! वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या नव्या लूकची चर्चा

Fulwara Marathi Movie: रवी जाधव दिग्दर्शित आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘फुलवरा’ या चित्रपटाची उत्सुकता आता

Tu Aahes Na: इफ्फीच्या मंचावर मराठी चित्रपटाची भावुक झलक! ‘तू आहेस ना’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद

Tu Aahes Na: गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) येथे लव फिल्म्स फिल्म्सची

ऑस्कर 2027 च्या शर्यतीत 2 भारतीय चित्रपट! 'गोंधळ' आणि 'अँग'ने मिळवली पात्रता

Oscars 2027 : भारतीय चित्रपट 'गोंधळ' आणि 'अंग' यांनी ऑस्कर 2027 च्या शर्यतीत प्रवेश केला आहे. 'गोंधळ'ला आंतरराष्ट्रीय फीचर