सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षा होणार, प्रफुल्ल पटेलांची घोषणा

नवी दिल्ली : अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार असल्याची घोषणा पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारी केली. येत्या पंधरा दिवसांत त्यांच्या निवडीची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अजित पवारांच्या आकस्मिक जाण्याने पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या पदासाठी त्या एकमेव उमेदवार असून, पक्षातील सर्व स्तरांतून त्यांना पाठिंबा मिळत आहे. सध्या आमचे सर्वोच्च प्राधान्य सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला पुन्हा उभारी देणे आणि संघटन अधिक मजबूत करणे हेच आहे, असे पत्रकारांशी बोलताना पटेल म्हणाले. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दमदार कामगिरी केली आहे. पुणे जिल्हा परिषदेतील दणदणीत विजयासोबतच कोल्हापूर आणि अन्य जिल्हा परिषदांमध्येही पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर, आगामी काळात गावपातळीवरील कार्यकर्त्यांना बळ देऊन पक्षाचा पाया विस्तारण्यावर आमचा भर असेल, असे पटेलांनी नमूद केले.


कोण आहेत सुनेत्रा पवार ?


सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी तेर (जि. धाराशिव) येथे झाला. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण असून, त्यांना मोठा राजकीय वारसा लाभला. १९८५ मध्ये अजित पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर काटेवाडी (ता. बारामती) येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली.


काटेवाडीमध्ये ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ रोवण्याचे श्रेय सुनेत्रा पवार यांना जाते. पहाटेपासून स्वतः हातात खराटा घेऊन कामाला सुरुवात करत त्यांनी संपूर्ण गावाला या अभियानात सहभागी करून घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली काटेवाडीने ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या कामाची दखल घेत देश-विदेशातील अभ्यासकांनी काटेवाडीला भेट दिली. याच कार्यामुळे त्यांना सार्क देशांच्या 'साकोसान' परिषदेत सहा राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या सामाजिक कार्याची दखल व्यापक पातळीवर घेतली गेली.


बारामतीमध्ये ‘एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण तसेच महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती असे विविध उपक्रम त्यांनी राबवले. या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय व नेतृत्वात्मक सहभाग राहिला. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.


लग्नानंतर शेतकाम, पोल्ट्री व्यवसाय, गाईगुरे सांभाळणे आणि दूध काढणे अशी कामे त्यांनी आवडीने केली. अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीत घर सांभाळणे, नातेसंबंध जपणे, सामाजिक कार्य करणे तसेच कठीण प्रसंगी त्यांना साथ व सल्ला देणे, ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्या नावावर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम नोंदवला जाणार आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश केला. त्यापूर्वी त्या पवार कुटुंबातील सदस्यांसाठी प्रत्येक निवडणुकीत सक्रिय प्रचार करत असत आणि बारामतीतील अनेक विक्रमी विजयांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. पक्षफुटीनंतर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली; मात्र त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तरीही त्या खचल्या नाहीत आणि जनसेवेत सक्रिय राहिल्या.


यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. राज्यसभा खासदार म्हणून काम करत असतानाच त्यांच्याकडे तालिका सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या आसनावर विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला. आता अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली