Pandharpur Crime News : पंढरपूर दुहेरी हत्याकांड : अवघ्या १० मिनिटांत मायलेकावर सपासप वार, तपास अधिकारी बदलले अन् असं उकललं पंढरपूरचं हत्याकांड

पंढरपूर : आषाढी वारीच्या पवित्र काळानंतर पंढरपूरला हादरवून सोडणाऱ्या मायलेकाच्या निर्घृण हत्याकांडाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून हे प्रकरण पोलिसांसाठी एक मोठे आव्हान ठरले होते. अनेक तपास अधिकारी बदलले, जनतेचा रोष वाढला आणि आंदोलनेही झाली, मात्र ठोस पुरावा हाती लागत नव्हता. अखेर या गुंतागुंतीच्या प्रकरणाची सूत्रे IPS अधिकारी प्रशांत डगळे यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांनी सूत्रे हाती घेताच तपासाला वेग दिला आणि अवघ्या ३० दिवसांत या प्रकरणाचा छडा लावून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. प्रशासकीय कौशल्य आणि अचूक तपासाच्या जोरावर पोलिसांनी हे 'ब्लाईंड मर्डर' केस उलगडल्याने शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.



दहा मिनिटांचा थरार अन् मायलेकाचा शेवट


पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती वस्तीत रात्रीच्या वेळी घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. लखन संजय जगताप आणि त्यांची आई सुरेखा जगताप या मायलेकाची त्यांच्याच घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली. अवघ्या दहा मिनिटांच्या कालावधीत आरोपींनी हे रक्ताळलेले क्रौर्य अंगावर आणणारे कृत्य केले. मारेकऱ्यांनी प्रथम लखन या तरुणावर १६ वेळा सपासप वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. पोटच्या मुलावर होणारा हा जीवघेणा हल्ला पाहून मदतीसाठी धावलेल्या सुरेखा जगताप यांनाही आरोपींनी सोडले नाही. त्यांच्यावर ९ वार करून त्यांचीही जीवनयात्रा संपवण्यात आली. अत्यंत वर्दळीच्या वस्तीत हे हत्याकांड घडवून आरोपींनी काही क्षणातच पळ काढला. या घटनेमुळे पंढरपुरात दहशतीचे वातावरण पसरले असून, गुन्हेगारांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते.



ना CCTV, ना पुरावा! तरीही तपासाची होणार सुरुवात नव्याने


या तपासामध्ये घटनास्थळी एकही CCTV कॅमेरा नसल्याने आणि ठोस धागेदोरे मिळत नसल्याने हे प्रकरण 'ब्लाईंड मर्डर' ठरले होते. मात्र, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी हार न मानता तपासाची चक्रं शून्यातून फिरवली. पुराव्याअभावी डगळे यांनी तांत्रिक तपासावर भर दिला. त्यांनी तब्बल १,५०० हून अधिक फोन कॉल्स आणि इंटरनेट रेकॉर्ड्सची सूक्ष्म तपासणी केली. याच अवाढव्य डेटाच्या विश्लेषणातून संशयास्पद हालचालींची एक साखळी तयार झाली, ज्याने पोलिसांना थेट आरोपींच्या उंबरठ्यापर्यंत नेऊन सोडले. केवळ आधुनिक तंत्रज्ञान आणि संयमी तपासाच्या जोरावर पोलिसांनी हे कठीण कोडे सोडवण्यात यश मिळवले आहे.



पोलिसांना गुंगारा देण्यासाठी रचला चोरीचा बनाव


पंढरपूर येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एखाद्या सिनेमाला शोभेल असा बनाव रचला होता, मात्र आयपीएस प्रशांत डगळे यांच्या चाणाक्ष नजरेतून ते सुटू शकले नाहीत. तपासात समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, आरोपींनी केवळ खूनच केला नाही तर पोलिसांना तपासापासून लांब ठेवण्यासाठी अनेक युक्त्या लढवल्या होत्या. मुख्य आरोपींपैकी एक, विशाल शिंदे नाईक याने खुनानंतर स्वतः पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली होती. आपण एक जागरूक नागरिक किंवा खबऱ्या आहोत असे भासवून पोलिसांचा संशय वळवण्याचा त्याचा प्रयत्न होता. हा खून चोरीच्या उद्देशाने झाला आहे असे वाटावे, यासाठी आरोपींनी घरातील ५५ इंची टीव्ही आणि काही मौल्यवान साहित्य लंपास केले होते. मात्र, तपासात हा केवळ पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी रचलेला बनाव असल्याचे सिद्ध झाले. खुनासाठी आरोपींनी साधे चाकू किंवा सुरा न वापरता, गवत कापण्याच्या मशीनच्या पात्यांपासून खास घातक हत्यार तयार करून घेतले होते, जेणेकरून तपासात तांत्रिक अडथळे येतील. अखेर 'डिजिटल पुरावे' आणि 'तपासातील चिकाटी' यामुळे आरोपींचा हा मास्टरप्लॅन फसला असून ते आता गजाआड आहेत. या हत्याकांडात एका अल्पवयीन मुलाने आरोपींना मदत केल्याचेही समोर आले आहे. खुनाच्या वेळी पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीशी पोलिसांच्या खबऱ्याने मैत्री करून त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळवली. यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. या दुहेरी हत्याकांडात विशाल शिंदे नाईक याने अथर्व शिंदे नाईक यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी आणि जगताप कुटुंबीय हे शेजारी राहत होते. त्यांच्यातील वैमनस्य हेच खुनामागील प्रमुख कारण असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी राजस्थानला कामासाठी गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. हत्येच्या वेळी विशालचा मोबाईल फोन सुमारे एक तास बंद होता. फोन बंद करण्यापूर्वी त्याने सहआरोपी अथर्वशी संपर्क साधल्याचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले. याच आधारावर दोघांनाही अटक करण्यात आली.



चंद्रभागेच्या पात्रात दडवलं होतं खुनाचं रहस्य


गेल्या आठ महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या दुहेरी हत्याकांडातील महत्त्वाचे पुरावे अखेर चंद्रभागा नदीच्या पात्रातून शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर, पोलिसांनी नदीपात्रातून ५५ इंची टीव्ही आणि हत्येसाठी वापरलेले खास हत्यार जप्त केले आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी घरातून चोरलेला टीव्ही आणि हत्येचे शस्त्र चंद्रभागेत फेकून दिले होते. तांत्रिक तपासापुढे नमतं घेत आरोपींनी हा गुन्हा मान्य केला. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा छडा लागत नसल्याने गेल्या आठ महिन्यांपासून पंढरपूर पोलिसांवर टीकेची झोड उठत होती. मात्र, IPS प्रशांत डगळे यांनी सूत्रे स्वीकारताच अवघ्या ३० दिवसांत या गुंतागुंतीच्या केसचा निकाल लावून पोलिसांची मान उंचावली आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली