महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागवण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील नागरिक १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत आपले विचार आणि सूचना समितीकडे मांडू शकणार आहेत, अशी माहिती समान नागरी संहिता समितीकडून देण्यात आली आहे. नागरिकांना सहभाग नोंदवणे अधिक सोपे जावे, यासाठी विशेष वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती आणि समितीच्या अध्यक्षा रंजना देसाई यांच्या हस्ते व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या पोर्टलचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.
सूचना पाठवण्याचे मार्ग:
- वेब पोर्टल: https://ucc.maharashtra.gov.in/
- ई-मेल: ucc@maharashtra.gov.in
- टपाल / पोस्टाद्वारे पाठवण्यासाठी पत्ता : समान नागरी संहिता समिती, महाराष्ट्र कार्यालय, दुसरा मजला, जुने कस्टम हाऊस, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र - ४००००१.
विविध घटकांशी चर्चा आणि अभ्यास
समिती विवाह, घटस्फोट, वारसाहक्क आणि उत्तराधिकार यांसारख्या वैयक्तिक कायद्यांचे सखोल परीक्षण करणार आहे. विविध धर्म, परंपरा, महिलांचे अधिकार, लैंगिक समानता आणि सामाजिक रचनेचा समतोल साधून शिफारशी तयार केल्या जातील. ज्या राज्यांमध्ये समान नागरी संहितेशी संबंधित प्रक्रिया सुरू आहे, त्यांच्या अनुभवांचा आणि कायदेशीर बाबींचा अभ्यासही समिती करणार आहे. कायदा तज्ज्ञ, धार्मिक प्रतिनिधी, महिला संघटना, राजकीय व सामाजिक संस्था, तसेच आम जनतेचे विचार जाणून घेण्यासाठी समितीद्वारे जनसुनावणी आणि सार्वजनिक चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे.