राहुल गांधींनी टोचले मुंबई काँग्रेसच्या नेत्यांचे कान

अंतर्गत गटबाजीला आवर घालण्याची सूचना; वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीकडे रोख?


मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवानंतर राहुल गांधी यांनी मुंबईतील नेत्यांची चांगलीच झाडाझडती घेतली आहे. "मुंबईत पक्षाचा जनाधार वेगाने घटत असताना नेते केवळ अंतर्गत वादात व्यस्त आहेत", अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत राहुल गांधींनी शनिवारी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांचे कान टोचले.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी भिवंडी न्यायालयात हजर राहण्यासाठी राहुल गांधी शनिवारी महाराष्ट्रात आले होते. न्यायालयीन प्रक्रिया आटोपून परतताना त्यांनी मुंबई विमानतळावर काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक बोलावली. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत २२७ पैकी अवघ्या २४ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला. या पराभवाचे विश्लेषण करताना, मुंबईतील संघटनात्मक बांधणी आणि नेत्यांमधील गटबाजीवर त्यांनी बोट ठेवले.


मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत कलह नवा नसून, तो गेल्या काही काळापासून धुमसत आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी थेट विद्यमान अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. गायकवाड यांच्या कार्यपद्धतीमुळेच पक्षाची पीछेहाट झाल्याचा आरोप करत, जगताप यांनी जानेवारी महिन्यात त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. "प्रभावी रणनीतीचा अभाव आणि कमकुवत संघटन यामुळे मुंबईत पक्षाची ताकद घटली असून, या पराभवाचे विश्लेषण केल्यास नेतृत्वातील त्रुटी स्पष्ट होतात," असे म्हणत त्यांनी वर्षा गायकवाड यांना लक्ष्य केले होते.

वर्चस्ववादातून सुप्त संघर्षाला सुरुवात


वास्तविक, वर्षा गायकवाड यांच्याकडे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा आल्यापासूनच पक्षात गटबाजीला उधाण आले आहे. भाई जगताप यांना पदावरून हटवून हायकमांडने गायकवाड यांची नियुक्ती केली, तेव्हापासूनच या दोन नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला. गायकवाड यांनी एकहाती वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात प्रिया दत्त, संजय निरुपम, मिलिंद देवरा आणि भाई जगताप यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना दुखावले. हाच जुना वाद आता पालिका निकालाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, राहुल गांधी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे चित्र दिसत आहे.

भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे


२०१४ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून राहुल गांधींवर भिवंडी न्यायालयात मानहानीचा खटला सुरू आहे. यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर त्यांचे जामीनदार होते, मात्र त्यांच्या निधनानंतर तांत्रिक कारणास्तव गांधींना शनिवारी न्यायालयात हजर राहावे लागले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधींचे नवीन जामीनदार म्हणून जामीन रोख्यावर स्वाक्षरी केली. दरम्यान, राहुल गांधींच्या आगमनावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Comments
Add Comment

DRI Gold Smuggling Seizure : DRI ची मोठी कारवाई! ६५ कोटींच्या सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; ४२ किलोहून अधिक परदेशी सोने जप्त

नवी दिल्ली : देशभरात सुरू असलेल्या सोन्याच्या तस्करीविरोधातील कारवाईला वेग देत डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून 'मुंबई बँक' जिंकण्याची जबाबदारी उपमहापौरांकडे

- वर्ष अखेरीस निवडणूक; प्रवीण दरेकर आणि संजय घाडी हे मित्र येणार आमनेसामने मुंबई (सुहास शेलार) : ठाणे जिल्हा

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात