शासकीय योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे : जागतिक महिला दिन आणि समाजसुधारक डॉ.मुत्थुलक्ष्मी रेड्डी यांच्या विधानमंडळ सदस्यत्वाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेत महिलांना अधिकाधिक संधी दिल्यास सक्षम नेतृत्व घडते, यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


मीरा-भाईंदरजवळील उत्तन येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम) यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व ९ मार्च २०२६ रोजी ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ या दोन दिवसीय ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.


यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, पद्मश्री पोपटराव पवार, प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळपाटील, कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, अपर तहसिलदार निलेश गौड आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढणे ही काळाची गरज आहे. महिलांना योग्य संधी दिल्यास त्या प्रभावी नेतृत्व घडवू शकतात आणि समाजाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शासनाच्या विविध योजनांद्वारे महिलांच्या सक्षमीकरणाला चालना दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. ‘लखपती दीदी’ योजनेंतर्गत यावर्षी ३७ लाख महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले असल्याची माहिती त्यांनी दिली. उद्योग आणि स्टार्टअप क्षेत्रात महाराष्ट्रातील महिलांनी देशात अग्रक्रम मिळवला असल्याचेही त्यांनी नमूद केले.


या परिषदेत देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सुमारे ५०० ग्रामीण महिलांचा सहभाग असून, व्यवसाय, उद्योग, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या यशस्वी वाटचालीचे अनुभव या व्यासपीठावरून मांडले जाणार आहेत.


यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करताना, महाराष्ट्रातील निवडून आलेल्या तसेच भविष्यात निवडून येणाऱ्या महिला सरपंचांसाठी प्रशिक्षण शिबिरे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आयोजित करण्यात यावीत, अशी सूचना केली. यामुळे सुशासनाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
परिषदेचे प्रास्ताविक प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी केले. पद्मश्री पोपटराव पवार यांनी स्वागतपर भाषण केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळपाटील यांनी आभार प्रदर्शन केले.


यावेळी विधान परिषद सदस्या रेखाताई महाजन तसेच मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती. या परिषदेत ग्रामीण महिलांच्या नेतृत्व विकास, उद्योजकता आणि सामाजिक परिवर्तनातील योगदानावर विविध सत्रांमध्ये चर्चा होणार असून, काही विशेष महिलांचे प्रेरणादायी अनुभव कथनही सादर करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने