Pandharpur News : पंढरपुरात विठ्ठलाच्या पुरणपोळीच्या नैवेद्याला विरोध, ३०० वर्षाची परंपरा काय सांगते ?

पंढरपूर : विठ्ठल चरणी अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्यावरून आता पंढरपुरात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. चैत्र एकादशीच्या निमित्ताने देवाला पूर्वापार परंपरेनुसार पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येतो. मात्र, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी या प्रथेवर आक्षेप घेतला आहे. देवाचा आहार हा भक्तांच्या आहाराशी सुसंगत असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या परंपरेला आता वैचारिक विरोधाची धार लागल्याने, चैत्र एकादशीचा हा 'गोड' नैवेद्य वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.



पंढरपुरात नैवेद्यावरून विठ्ठल पाटील आक्रमक


आषाढी, कार्तिकीप्रमाणेच चैत्र एकादशीलाही पंढरपुरात मोठी गर्दी असते. मात्र, यंदा ही एकादशी भक्तीऐवजी वादानेच अधिक गाजण्याची चिन्हे आहेत. विठ्ठलाला दाखवण्यात आलेल्या पुरणपोळीच्या नैवेद्यावर वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सडकून टीका केली असून, मंदिर प्रशासनाच्या या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विठ्ठल पाटील यांच्या मते, एकादशीचे व्रत हे वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि मूळ भक्तीचे साधन आहे. हजारो वर्षांपासून लाखो भाविक निर्जळी उपवास करून ही एकादशी पाळतात. अशा अत्यंत कडक नियमांच्या दिवशी देवाला पुरणपोळीसारखा जड नैवेद्य दाखवणे, हे वारकरी परंपरेच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. "एकादशीच्या दिवशी देवाला असा नैवेद्य दाखवणे ही अत्यंत निंदनीय घटना आहे आणि याचे मला मनापासून दुःख होत आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पाटील यांनी या प्रथेमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक आणि धार्मिक पेचावर बोट ठेवले आहे. जर आमचा पांडुरंग स्वतः एकादशीला पुरणपोळी खात असेल, तर बाहेरील लोक आम्हा वारकऱ्यांना प्रश्न विचारतील की, तुमचा देव जेवतोय मग तुम्ही उपवास का करता? शास्त्राप्रमाणे उपवासाचा नैवेद्य हा एकादशीला न दाखवता, दुसऱ्या दिवशी (द्वादशीला) उपवास सोडताना दाखवायला हवा होता. मग एकादशीलाच हा घाट का घातला? जर चैत्र एकादशीला पुरणपोळी चालते, तर मग वर्षातील इतर एकादशींप्रमाणे ही एकादशी उपवासातून 'माफ' आहे का? असा उपरोधिक सवालही त्यांनी केला आहे. हा नैवेद्य दाखवण्याचा निर्णय कोणी घेतला आणि कोणत्या शास्त्राच्या आधारे घेतला, याचा स्पष्ट खुलासा संबंधितांनी करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पुरणातील कथांचा आधार घेऊन विठ्ठलाला नैवेद्य दाखवणे ही वारकरी संप्रदायाची शुद्धता धोक्यात आणणारी गोष्ट असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.



विठ्ठलाच्या 'पुरणपोळी' नैवेद्यामागे आहे ३०० वर्षांचा इतिहास


पहिली आख्यायिका शिखर शिंगणापूर येथील महादेव आणि पार्वतीच्या विवाह सोहळ्याशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार, चैत्र एकादशीच्या दिवशी महादेवाचा विवाह संपन्न झाला होता. या मंगल प्रसंगी सर्व देवी-देवता उपस्थित होत्या. असे मानले जाते की, महादेवाच्या लग्नाच्या पंगतीत भगवान विठ्ठलाने आनंदाने पुरणपोळीचे भोजन केले होते. याच दैवी विवाहाच्या स्मृतीप्रत्यर्थ आणि विठ्ठलाच्या त्या आवडीच्या भोजनाची आठवण म्हणून चैत्र एकादशीला पंढरपुरात पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवण्याची प्रथा रूढ झाली. दुसरी महत्त्वाची ऐतिहासिक घटना विजयनगर साम्राज्याशी जोडलेली आहे. राजा कृष्णदेवराय यांनी हम्पी येथे विठ्ठलाचे भव्य मंदिर बांधले होते आणि पंढरपूरची मूर्ती तेथे नेली होती. संत एकनाथ महाराजांचे पणजोबा, संत भानुदास महाराज यांनी मोठ्या जिद्दीने ही मूर्ती पुन्हा पंढरपुरात आणली. ज्या दिवशी विठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात पुन्हा प्रस्थापित झाली, तो दिवस 'चैत्र एकादशी'चा होता. विठ्ठल पुन्हा पंढरीत परतल्याच्या आनंदोत्सवात संपूर्ण नगरात पुरणपोळीचा नैवेद्य वाटण्यात आला होता, जी परंपरा आजही अखंड सुरू आहे. गेल्या ३०० वर्षांपासून या दोन्ही आख्यायिकांच्या आधारे चैत्र एकादशीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जात आहे. विशेष म्हणजे, आजवर वारकरी संप्रदायातील अनेक ज्येष्ठ महाराज आणि कीर्तनकारांनी या परंपरेवर कधीही आक्षेप घेतला नव्हता. मात्र, आता वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्टल पाटील यांनी या ३०० वर्षांच्या परंपरेला 'शास्त्रीय' आधार नसल्याचे म्हणत प्रश्न उपस्थित केल्याने, जुन्या परंपरा आणि नवीन विचारप्रवाह यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे.

Comments
Add Comment

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी