Raj Thackeray : 'आशाताई' -दि लास्ट एम्परर असं म्हणत राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. आशा भोसले यांना काल (शनिवार ११ एप्रिल २०२६) हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशा भोसलेंची नात झानई भोसले हिने इन्स्टा पोस्ट करून आजी ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले होते.


अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राज ठाकरे म्हणाले की;


ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात.


लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीव पणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं.


तर मायकलॅन्जलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, लडिवाळपणा आणि बंडखोरी पण आहे. कधी कधी त्याची शिल्प त्या दगडातून बाहेर येण्यास आतुर आहेत असं वाटत राहतं.  तसंच आशाताईंच्या गाण्यांचं. त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे आणि माणूस म्हणल्यावर थोडा बेधडकपणा, झुगारून देण्याची तीव्र इच्छा असणारच , ते सगळं आशाताईंच्या गाण्यात जाणवत राहतं.


'गाणं हे माझं पॅशन आहे' किंवा 'ऍक्टिंग माझं पॅशन आहे' असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळतात.
असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या १५व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला. पण या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतुपरंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली.


'आशाताई' -दि लास्ट एम्परर



ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात.

लिओनार्दो द विंचीच्या… pic.twitter.com/ZdIl2H0JCP


— Raj Thackeray (@RajThackeray) April 12, 2026

मी वर म्हणल्याप्रमाणे लतादीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशावेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत.

'पिया तू अब तो आजा' मध्ये प्रियकराला थेट बेधडक आवाहन आहे. 'आईये मेहरबान' मध्ये लडिवाळपणा आहे, 'दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए' मध्ये नजाकत आहे. 'दम मारो दम' मध्ये बंडखोरी आहे, सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे. याच आशाताई मराठी भावसंगीतात 'मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश' म्हणत युगायुगांचं वैराग्याचे प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात.


व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वादळं पहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत, दुःख हत्यार बनवलं नाही, कडवटपणा येऊ दिला नाही. दुःख हाताळायची त्यांनी कलाच जणू आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या.


जसा दीदींचा सहवास मिळाला तसाच आशाताईंचा मिळाला. मी भाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील.


मी मागे माझ्या भाषणांत म्हणालो होतो की लता दीदी असतील, आशाताई असतील किंवा त्यांच्यासारखे इतर कलाकार असतील , ते जर नसते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या भावविश्वात गुंतवून ठेवलं नसतं तर या देशांत कधीच अराजक आलं असतं  ! उत्तुंग काय असतं आणि ते कुठे बघायचं याचा मापदंड या लोकांनी  आपल्याला घालून दिला !


जसं लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसाँस युगाला त्या दोघांनी वेगेवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लतादीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या  रेनेसाँस युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या  रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला !


आशाताईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने