रेल्वे लगतच्या इमारतींवरही विशेष लक्ष
मुंबई : मुंबईत एकूण १७४ इमारती या अति धोकादायक जागा झाल्या असून त्यात १४१ खासगी इमारतींचा समावेश आहे. त्यातील ७२ इमारती या खाली करण्यात आलेल्या आहेत तर इतर विविध इमारती या न्यायालयीन वादात अडकलेल्या असल्याने त्या खाली करणे आणि त्या इमारती पाडणे यामध्ये विविध अडचणी निर्माण झालेले आहेत.
मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा आढावा महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मुंबईतील विविध प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मुंबईत एकूण १७४ इमारतींना, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ चे कलम ३५४ अन्वये 'अतिधोकादायक व मोडकळीस' घोषित करण्यात आले असल्याची माहिती भिडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त्यामध्ये १४१ खाजगी इमारतींचा समावेश आहे. या खासगी १४१ अतिधोकादायक इमारतींपैकी एकूण ३२ इमारती शहर, ८० पश्चिम उपनगरे आणि २९ पूर्व उपनगरातील आहेत.
या एकूण १७४ अतिधोकादायक इमारतींपैंकी ७२ इमारती रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत, तर ७१ इमारतींना न्यायालयीन स्थगिती आहे. संबंधित इमारत कोसळून कोणतीही दुर्घटना घडल्यास व त्यात जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची राहील.
इमारती बाबत संबंधित सक्षम प्राधिकरण यांनी गरजेप्रमाणे पावसाळ्यापूर्वीच्या योग्य त्या उपाययोजना कराव्यात. संबंधित इमारत कोसळून कोणतीही दुर्घटना घडल्यास व त्यात जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची राहील,असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
तसेच म्हाडाच्या उपकर प्राप्त तसेच ना उपकर प्राप्त ज्या अतिधोकादायक आहेत, त्यांचीही काळजी म्हाडा दुरुस्ती मंडळाच्यावतीने घेतली जात आहे. त्यामुळे रेल्वे रुळा लगत ज्या अशा धोकादायक इमारती आहे, जुन्या इमारती आहे, त्यांचा प्रस्ताव रेल्वेला सादर करण्याचाही सूचना करण्यात आल्या आहे, जेणेकरून रेल्वेला काही भविष्यात उपाययोजना असल्यास म्हाडाला पुनर्विकासाला मंजुरी देताना विचारात घेता येवू शकतील असेही त्यांनी नमुद केले.






