TCS Case : छत्रपती संभाजीनगरच्या फ्लॅटमध्ये लपली होती निदा खान; सोबत होते ‘हे’ ५ जण, प्रकरण अधिक गूढ

छत्रपती संभाजीनगर : नाशिकमधील टिसीएस (TCS) कंपनीतील कथित लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी घडामोड समोर य़ेत आहे. या प्रकरणातील फरार आरोपी निदा खान (Nida Khan) हिला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील नरेगाव परिसरातील कैसर कॉलनीतील एका फ्लॅटमधून तिला ताब्यात घेण्यात आले. नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. एसआयटीकडून (SIT) नऊ वेगवेगळ्या गुन्ह्यांची चौकशी सुरू असताना झालेल्या या अटकेमुळे प्रकरणातील धर्मांतरण नेटवर्क, आर्थिक स्रोत आणि इतर धागेदोरे उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



नाशिक टिसीएस (TCS) कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे कथित लैंगिक शोषण, मानसिक छळ, धार्मिक भावना दुखावणे, विनयभंग आणि सक्तीच्या धर्मांतराशी संबंधित दाखल झालेल्या नऊ प्रकरणांचा तपास सध्या विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. याच तपासादरम्यान पोलिसांना मोठे यश मिळाले असून, २५ मार्चपासून फरार असलेल्या निदा खानचा अखेर शोध लागला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निदा खान गेल्या चार दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील नरेगावच्या कैसर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये लपून राहत होती. विशेष म्हणजे त्या फ्लॅटमध्ये ती एकटी नव्हती. सूत्रांच्या माहितीनुसार, तिच्यासोबत तिची आई, वडील, भाऊ आणि आत्या असे एकूण पाच जण राहत होते. पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून त्या फ्लॅटवर गुप्त नजर ठेवली होती. अखेर योग्य संधी साधत पोलिसांनी छापा टाकून निदा खानला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला नाशिकमध्ये आणून अधिकृत अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.



आज निदा खानला नाशिक न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे. यापूर्वी तिने अटकपूर्व जामिनासाठी अनेकदा न्यायालयात धाव घेतली होती. मात्र स्थानिक न्यायालयाने तिचा अर्ज वारंवार फेटाळून लावला. विशेष तपास पथकाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात गंभीर आरोपांचा उल्लेख करत तिच्या जामिनाला तीव्र विरोध केला होता. २० एप्रिल रोजी न्यायालयाने तिला अंतरिम संरक्षण देण्यासही नकार दिला होता.


या प्रकरणात निदा खानच्या आधीच अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. रझा रफीक मेमन, तौसीफ बिलाल अत्तार, दानिश शेख आणि शाहरुख हुसेन शौकत कुरेशी या चार मुख्य आरोपींना न्यायालयाने १८ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


काय आहे संपूर्ण प्रकरण?


निदा खान ही टीसीएस कंपनीची निलंबित कर्मचारी असून ती कंपनीच्या नाशिक युनिटमध्ये कार्यरत होती. तिच्यावर महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचार करणे, मानसिक छळ करणे आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी सहा कर्मचाऱ्यांना अटक केली होती. निदा खान गेल्या अनेक दिवसांपासून फरार होती आणि तिचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांची दोन स्वतंत्र पथके कार्यरत होती.


दरम्यान, या प्रकरणातील एफआयआरमध्ये काही धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. फिर्यादींच्या आरोपानुसार, निदा खान महिला सहकाऱ्यांवर इस्लामिक परंपरा स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होती. यामध्ये कपडे, आहाराच्या सवयी आणि धार्मिक आचार याबाबत सक्ती केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी सादर केलेल्या माहितीनुसार, निदा खानने तक्रारदारांपैकी एका महिलेला बुरखा आणि हिजाब दिला होता. तसेच तिला नमाज शिकवण्यात आला आणि तिच्या मोबाईलमध्ये इस्लामिक शिक्षणाशी संबंधित अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल (Application Install) करण्यात आल्याचाही आरोप आहे.



तपास यंत्रणांच्या मते, पीडितेचे नाव बदलून ‘हानिया’ ठेवण्याचा आणि तिला नोकरीच्या निमित्ताने मलेशियाला पाठवण्याचा कटही रचण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाचे स्वरूप अधिक गंभीर मानले जात आहे.


आता पोलिसांचे लक्ष निदा खानच्या मोबाईल फोन आणि डायरीवर केंद्रित झाले आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, या दोन्ही गोष्टींमधून बाहेरून मिळणाऱ्या निधीचे स्रोत, मालेगाव आणि मलेशियाशी संबंधित कथित धर्मांतरण नेटवर्कचे संबंध, तसेच या संपूर्ण रॅकेटमागील इतर लोकांची माहिती समोर येऊ शकते. त्यामुळे पोलिस तिच्या कोठडीतील चौकशीसाठी न्यायालयाकडे मागणी करण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jain Diksha Mahotsav : प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार; अहिंसा आणि जीवदयेचा विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते. अहिंसा, त्याग, आत्मसंयम आणि जीवदया ही मूल्ये

Bharat Scouts and Guides : भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सदस्यसंख्या 5 कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट

Bharat Scouts and Guides: ‘भारत स्काउट्स अँड गाईड्स’ या संघटनेच्या 13 व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ST Bus Stand : राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार ! जेजुरीच्या धर्तीवर उभारणार दुमजली प्रसाधनगृहे

ST Bus Stand : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर आता स्वच्छ आणि

Eknath Shinde : विनोद कांबळींच्या उपचारांसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार ! दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारणार

Eknath Shinde : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज

Prahaar Marathi News Live, 29 November 2026 :- भारतीय संघाचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, जुरेलचे शतक हुकलं

Prahaar Marathi News Live दिनांक 29 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,