नवी दिल्ली : केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) हालचालींना आता वेग आला असून संरक्षण मंत्रालय, रेल्वे आणि इतर केंद्रीय विभागांतील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीकडे लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष लागले आहे.
कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?
या बैठकीत कर्मचारी संघटना सरकारसमोर अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडणार आहेत. त्यामध्ये मूळ वेतनात मोठी वाढ, फिटमेंट फॅक्टर वाढवणे, महागाई भत्त्याची नव्याने गणना, प्रमोशनल इन्क्रिमेंट, तसेच निवृत्तीवेतनधारकांसाठी सुधारित पेन्शन योजना या मुद्द्यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांकडून फिटमेंट फॅक्टर किमान २.८६ किंवा त्यापेक्षा जास्त ठेवण्याची मागणी होण्याची शक्यता आहे. जर ही मागणी मान्य झाली, तर लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे या बैठकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे विशेष लक्ष लागले आहे.
बैठकीसाठी ऑनलाइन अर्ज अनिवार्य :
अर्ज करताना मेमो आयडी सादर करणे आवश्यक असून विहित प्रक्रिया पूर्ण केलेल्या संघटनांनाच बैठकीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे अनेक संघटनांनी तयारीला सुरुवात केली आहे.
पुढील १८ महिन्यांत अहवाल?
आठव्या वेतन आयोगाला आपला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी सुमारे १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आयोगाच्या शिफारशी मंजूर झाल्यानंतर नवीन वेतनरचना आणि सुधारित पेन्शन लागू होण्याची शक्यता आहे.






