सात तासांचा टायमर आणि कर्मचाऱ्यांची धावपळ
प्राथमिक माहितीनुसार, रुग्णालयातील एका बाथरुममध्ये एक अज्ञात बॉक्स ठेवलेला होता. जेव्हा हा बॉक्स उघडण्यात आला, तेव्हा त्यात सात तासांचा टायमर लावलेले एक उपकरण दिसले. हे उपकरण पाहून स्फोटकाची शक्यता वर्तवण्यात आली, ज्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण आणि स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. कोणत्याही क्षणी स्फोट होऊ शकतो या भीतीने सर्वत्र धावपळ सुरू झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून 'बॉम्ब शोधक व नाशक पथक' (BDDS) आणि श्वान पथकाला तातडीने पाचारण करण्यात आले. या पथकांनी घटनास्थळाचा ताबा घेत संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू केली. संशयास्पद वस्तू नेमकी काय आहे, याची तांत्रिक तपासणी करण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
रुग्णालय परिसर सील
खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तातडीने उषा किरण रुग्णालय आणि त्याच्या आसपासचा परिसर निर्मनुष्य केला आहे. रुग्णालय परिसराभोवती बॅरिकेड्स लावून नाकेबंदी करण्यात आली असून, सामान्य नागरिकांना या भागात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांनी परिसराला वेढा घातला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक आणि हडपसर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण शोध मोहिमेवर वरिष्ठ स्तरावरून लक्ष ठेवले जात आहे. कोणत्याही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस दलाने रुग्णालयाभोवती कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
संशयास्पद बॉक्स सुरक्षित स्थळी हलवला
बीडीडीएस पथकाने अत्यंत कौशल्याने तो संशयास्पद बॉक्स रुग्णालयातून बाहेर काढला असून तो सुरक्षित स्थळी हलवण्यात आला आहे. ते उपकरण खरोखरच जिवंत बॉम्ब आहे की केवळ दहशत पसरवण्यासाठी रचलेले हे कारस्थान आहे, याचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांकडून तांत्रिक चाचणी केली जात आहे. रुग्णालयातील बाथरुममध्ये हा बॉक्स कोणी ठेवला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले आहे. हा प्रकार केवळ अफवा पसरवण्यासाठी केला होता की यामागे काही मोठा कट आहे, यादृष्टीने तपास सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस प्रशासन लवकरच यावर अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे.