Thane Murder Case : ठाण्यात थरारक हत्याकांड; प्रियकराची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये लपवला!

ठाणे : उत्तर प्रदेशातील मेरठ ड्रम हत्याकांडासारखीच एक धक्कादायक घटना ठाण्यातील मुंब्रा परिसरात समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ड्रममध्ये लपवून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अरबाज मकसूद अली खान असे मृत तरुणाचे नाव आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज हा ३ एप्रिल २०२६ रोजी घरातून “पैसे आणण्यासाठी दादरला जात आहे” असे सांगून बाहेर पडला होता. मात्र, बराच वेळ उलटूनही तो घरी परतला नाही. कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीच माहिती मिळाली नाही. अखेर चिंताग्रस्त कुटुंबियांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात अरबाज बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.


तक्रार दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान अरबाजच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, त्याच परिसरात त्याची प्रेयसी महजबीन राहत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. पोलिसांनी सापळा रचत माहिती गोळा केली आणि महजबीनला चौकशीसाठी ताब्यात घेतले.


सुरुवातीला चौकशीदरम्यान महजबीनने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर तिने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. खंडणीच्या पैशांवरून अरबाजसोबत वाद झाल्याचे आणि त्यातूनच हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. महजबीनने आपल्या पती आणि भावाच्या मदतीने अरबाजला बोईसर येथे बोलावले. त्यानंतर त्याच्यावर पाईपने जोरदार हल्ला करण्यात आला. मारहाण इतकी अमानुष होती की त्यातच अरबाजचा मृत्यू झाला.



हत्या केल्यानंतर आरोपींनी पुरावा लपवण्यासाठी मृतदेह एका ड्रममध्ये भरून ठेवला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांच्या तांत्रिक तपास, कॉल रेकॉर्ड्स आणि लोकेशनच्या आधारे संपूर्ण कट उघडकीस आला.


या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी महजबीनसह तिच्या पतीला आणि भावाला अटक केली आहे. “तांत्रिक तपास आणि कॉल रेकॉर्ड्सच्या मदतीने आम्ही आरोपींपर्यंत पोहोचलो. प्राथमिक तपासात पैशांचा वाद हे हत्येमागील मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे,” अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढमाले यांनी दिली.


अवघ्या काही तासांत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असला, तरी या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, या हत्याकांडाची तुलना उत्तर प्रदेशातील चर्चित मेरठ ड्रम हत्याकांडाशी केली जात असून, “मेरठ प्रकरणाची पुनरावृत्ती” झाल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.