Mahayuti : विधान परिषदेच्या पुण्याच्या जागेसाठी महायुतीतच चुरस

जिल्ह्यात महायुतीचे ७३४ सदस्य आहेत. मात्र, आपल्या या पारंपरिक हक्काच्या जागेवर दावा सांगणारा अजित पवार गट आणि दोन्ही महापालिकांमधील संख्याबळाच्या जोरावर पुण्यात आपले वर्चस्व अधिक वाढवू पाहणारा भाजप, या दोघांपैकी वरिष्ठ पातळीवर नेमके कोणाचे पारडे जड ठरते आणि कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


पुणे विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने पुणे जिल्ह्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. महायुतीमध्ये पुण्याची ही हक्काची जागा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात जोरदार चुरस निर्माण झाली आहे. काहीही करून पुण्यावरील आपला दावा सोडायचा नाही, असा ठाम निर्धार राष्ट्रवादीने केला आहे; तर दुसरीकडे भाजपनेही या जागेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे अखेर ही जागा महायुतीत कोणाच्या पदरात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पुण्याच्या राजकीय वर्तुळात, विशेषतः सत्ताधारी महायुतीमध्ये या जागेवरून रस्सीखेच सुरू झाली होती. राष्ट्रवादीच्या या पारंपरिक बालेकिल्ल्यावर सध्या स्थानिक पातळीवर आपले संख्याबळ अधिक असल्याचा दावा करत भाजपने ही जागा लढवण्याची तयारी दर्शवली आहे.

पुणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याने भाजपने आपला दावा ठोकला आहे. तर, राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पदाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले की, पुणे ही आपली हक्काची जागा असून ती कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये. पुणे हा आपला बालेकिल्ला असल्याने ही जागा कदापि सोडायची नाही. दुसरीकडे संख्याबळ वाढल्याने भाजपही पुण्याच्या जागेवर डोळा ठेवून आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या संख्याबळाचा विचार केला, तर सद्यस्थितीनुसार महायुतीत भाजपचे ३१९, राष्ट्रवादीचे ३४७, शिवसेनेचे ६८ सदस्य आहेत. महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे १९, उबाठाचे ११, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) १७ सदस्य आहेत, तर अपक्ष व स्थानिक आघाडीचे प्रत्येक २३ सदस्य आहेत. या आकडेवारीचा विचार केला, तर अजूनही राष्ट्रवादीचे पारडे जड आहे; मात्र राष्ट्रवादी व भाजपमध्ये फार मोठे अंतर नाही. हे पाहता भाजपकडून ही जागा खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते, तर राष्ट्रवादीने ही जागा राखण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या आकडेवारीत जिल्हा परिषदेतील स्वीकृत सदस्यांची निवड अद्याप न झाल्याने त्यांचा समावेश केलेला नाही.



पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा इतिहास पाहिला, तर या जागेवर नेहमीच राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. १९९८ ते २००४ या काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र रणपिसे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर २००४ मध्ये पिंपरी-चिंचवडचे दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष निवडणूक लढवून ऐतिहासिक विजय मिळवला होता, तर २०१० आणि २०१६ च्या सलग दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल भोसले यांनी बाजी मारली. डिसेंबर २०२२ मध्ये त्यांची मुदत संपली आणि तेव्हापासून लोकप्रतिनिधींअभावी ही जागा रिक्त होती.
आता पुण्याचे संपूर्ण राजकीय समीकरण बदलले आहे. भूतकाळात हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा गड राहिला असला, तरी सध्याच्या घडीला भाजपने जिल्ह्यात आपले पाय घट्ट रोवले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत असल्याने राष्ट्रवादी भाजपचे आव्हान कसे पेलणार आणि त्यातही भाजपच्या इच्छुकांमध्ये बलाढ्य नेते असल्याने राष्ट्रवादी ही जागा आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होणार का? की सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात त्या आपल्या राजकीय नेतृत्वाची चुणूक दाखवणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही प्रमुख महापालिकांमध्ये मात्र भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व राखले आहे. पुणे महापालिकेत एकूण १६८ सदस्यांपैकी भाजपकडे ११९ सदस्यांचे प्रचंड बहुमत आहे, तर अजित पवार गटाचे २३, काँग्रेसचे १२, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ७, उद्धव ठाकरे गटाचे ५ आणि शरद पवार गटाचे २ सदस्य आहेत. पालिकेतील १० स्वीकृत सदस्यांमध्येही भाजपचे ७, राष्ट्रवादीचे २ आणि काँग्रेसचा १ सदस्य आहे. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा विचार केल्यास, तिथल्या एकूण १२८ सदस्यांपैकी भाजपकडे ८४ तर अजित पवार गटाकडे ३६ सदस्य आहेत. शरद पवार गटाचे २, एकनाथ शिंदे गटाचे ३ आणि उद्धव ठाकरे गटाचा १ सदस्य तिथे आहे. येथील १० स्वीकृत सदस्यांमध्ये भाजपचे ७ तर अजित पवार गटाचे ३ सदस्य आहेत.
राष्ट्रवादीकडून या जागेसाठी माजी आमदार सुनील टिंगरे, विक्षस लांडे, पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर योगेश बहल, माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे, दीपक मानकर यांची नावे चर्चेत आहेत. यातील विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. मध्यंतरी झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही विक्रम यांचे नाव चर्चेत होते. हे पाहता या खेपेला त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सुनील टिंगरे यांचा वडगाव शेरी परिसरात प्रभाव आहे. पुणे शहरात भक्कम होण्यासाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. मात्र, सध्या अचानकपणे पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर, आमदार विलास लांडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसून येते.



दुसऱ्या बाजूला भाजपकडून माजी आमदार जगदीश मुळीक, गणेश बीडकर यांची नावे चर्चेत आहेत. यातील बीडकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. तर मुळीक यांनाही विधान परिषद देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजपच्या वाट्याला जागा आली, तर कुणाच्या पारड्यात पक्ष मत टाकणार, हेही पहावे लागेल. या निवडणुकीत पंचायत समितीच्या सभापतींनाही मतदानाचा अधिकार असतो. जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांपैकी तब्बल ११ ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती विराजमान आहेत, तर उर्वरित २ ठिकाणी भाजपचे सभापती आहेत. जिल्ह्याची मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेत आणि पंचायत समित्यांमध्येही अजित पवार गटाचेच एकहाती वर्चस्व पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ७३ सदस्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ५१ सदस्यांसह सर्वात मोठा पक्ष आहे, तर भाजपचे १०, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ६, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ५ आणि शरद पवार गटाचा केवळ १ सदस्य आहे.
आकड्यांच्या या संपूर्ण गणितात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जिल्ह्यातील नगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक संख्याबळ आहे, तर भाजपने दोन्ही महापालिकांमध्ये आपली ताकद सिद्ध केली आहे.
Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली