Navi Mumbai : निमंत्रण पत्रिकेतील नावावरून भाजप-शिवसेनेत नाराजीनाट्य

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाव वगळल्याने शिवसैनिकांचा संताप; नवी मुंबईत गणेश नाईकांची गाडी अडवली


मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेतून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळल्याने महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी सोमवारी कार्यक्रम स्थळाबाहेर जोरदार निदर्शने करत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांची गाडी अडवल्याने नवी मुंबईत कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले.


नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी आरोग्य विषयक सुविधांचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. मात्र, नवी मुंबईतील या शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिकेतून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेच नाव गायब असल्याने स्थानिक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला. कार्यक्रम सुरू असतानाच शेकडो शिवसैनिकांनी पालिकेच्या आवारात आणि कार्यक्रम स्थळाबाहेर घोषणाबाजी करत परिसर डोक्यावर घेतला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.



शिवसेनेचे स्थानिक नेते विजय माने यांनी या सर्व प्रकारावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला. "एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री असण्यासह महाराष्ट्रातील व देशातील अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचे थेट संबंध आहेत. असे असतानाही त्यांना वारंवार डावलले जात आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघ आमदार मंदा म्हात्रे यांचा आहे, गणेश नाईक यांचा नाही; तरीही उद्घाटनाचा सगळा मान नाईक यांना दिला जातोय," अशी खंत माने यांनी बोलून दाखवली. तसेच, "आज आम्ही केवळ निषेध व्यक्त करत आहोत, पण ही दुसरी वेळ आहे. तिसऱ्यांदा जर असा प्रसंग आला, तर आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही," असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला. आरोग्य सुविधांसाठीचा बहुतांश निधी एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी आणल्याचा दावाही यावेळी शिवसेनेकडून करण्यात आला.



गणेश नाईकांचे आयुक्तांकडे अंगुलीनिर्देश


या वादाबाबत वनमंत्री गणेश नाईक यांना विचारले असता ते म्हणाले, "या निमंत्रण पत्रिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव का नाही, याची मला कोणतीही कल्पना नाही. हा प्रोटोकॉलचा विषय असून याबद्दल आपण महापालिका आयुक्तांनाच विचारणा करावी," असे सांगत नाईक यांनी चेंडू प्रशासनाच्या कोर्टात ढकलला. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी काही काळ आयुक्तांच्या केबिनमध्ये आंदोलन केले.



श्रीकांत शिंदेंच्या नावाचा उल्लेख


वादग्रस्त ठरलेल्या या निमंत्रण पत्रिकेवर वनमंत्री गणेश नाईक यांच्या नावाचा मुख्य उल्लेख आहे. त्यासोबतच कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांचीही नावे शिष्टाचाराचा भाग म्हणून छापण्यात आली आहेत. मात्र, पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांचे नाव राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) डावलून वगळल्याने शिवसेनेमध्ये रोष पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण