Nashik : अभिमानास्पद ! नाशिकच्या भाविका अहिरेकडे भारताच्या अंडर-19 महिला संघाचे नेतृत्व; श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधारपदाची मोठी जबाबदारी

Nashik : नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. सटाणा तालुक्यातील लखमापूर गावची कन्या भाविका अहिरे हिची भारतीय महिला १९ वर्षांखालील क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची धुरा भाविकाच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याने नाशिक जिल्हा आणि शहरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.



भाविका अहिरेकडे टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा


भारतीय महिला अंडर-19 संघ आगामी श्रीलंका दौऱ्यावर तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात २२ जूनपासून होणार असून, ६ जुलैपर्यंत सामने रंगणार आहेत. या महत्त्वाच्या दौऱ्यासाठी यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या भाविका अहिरेची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.


भाविका अहिरे हे नाव क्रिकेटविश्वासाठी नवे नाही. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित विविध स्पर्धांमध्ये खेळताना तिने आपल्या दमदार कामगिरीने अनेकांचे लक्ष वेधले होते. दोन ते तीन वर्षांपूर्वी नाशिकमध्ये इंडियन ऑईल्सतर्फे आयोजित स्पर्धेत तिच्या उत्कृष्ट खेळीची विशेष चर्चा झाली होती. त्यावेळीच क्रिकेट जाणकारांनी ही खेळाडू भविष्यात मोठी चमक दाखवेल, असा अंदाज व्यक्त केला होता आणि आज तो खरा ठरताना दिसत आहे.


भाविकाचे मूळ गाव सटाणा तालुक्यातील लखमापूर असले, तरी क्रिकेटसाठी तिची कर्मभूमी पुणे ठरली. वडील मनोजकुमार अहिरे आणि आई पूनम अहिरे नोकरीनिमित्त आधी नाशिक, त्यानंतर २०१३ मध्ये पुण्यात स्थायिक झाले. सध्या भाविका पुण्यातील भोसरी येथे राहत असून, एस.पी. कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत आहे.



क्रिकेट प्रवासामागे वडिलांचा मोठा वाटा


भाविकाच्या क्रिकेट प्रवासामागे तिच्या वडिलांचा मोठा वाटा आहे. टेनिस क्रिकेटची आवड असलेल्या वडील मनोजकुमार यांनी मुलीतील क्रिकेटचे कौशल्य ओळखून वयाच्या दहाव्या वर्षी तिला कासारवाडी येथील ओम साई क्रिकेट अकॅडमीत दाखल केले. प्रशिक्षक संजय हाडके यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांच्या संघात एकटी मुलगी म्हणून सराव करत तिने आपले कौशल्य अधिक धारदार केले. कोरोनासारख्या कठीण काळातही सरावात खंड पडू दिला नाही.


भाविकाने आपल्या आक्रमक फलंदाजी आणि अचूक यष्टीरक्षकानेनिवड समितीचे लक्ष वेधले. १५ वर्षांखालील संघाकडून बडोद्याविरुद्ध ११३ धावा, तर पदार्पणाच्या सामन्यात मुंबईविरुद्ध तब्बल १२९ धावांची खेळी करत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर १९ वर्षांखालील संघात मेघालयाविरुद्ध पदार्पणातच शतकी खेळी करत तिने आपली क्षमता सिद्ध केली.



नाशिकची लेक चमकली


चॅलेंजर ट्रॉफी आणि आशिया कपमध्ये नाबाद ८३ धावांची खेळी करून भाविकाने भारतीय संघातील स्थान अधिक भक्कम केले. डिसेंबर २०२४ मध्ये आशिया कप विजेत्या भारतीय संघातही तिचा महत्त्वाचा सहभाग होता. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे २०२३ पासून सलग तीन वेळा नॅशनल क्रिकेट अकॅडमी, बंगलोर येथे उच्च प्रशिक्षणासाठी तिची निवड झाली.


विशेष म्हणजे, जानेवारी २०२५ मध्ये आयसीसी अंडर-19 टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातही भाविकाचा मोलाचा वाटा होता. या ऐतिहासिक यशासाठी जानेवारी २०२६ मध्ये बीसीसीआयकडून तिला प्रतिष्ठेचा ‘नमन अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या हस्ते तिचा विशेष सन्मान करण्यात आला होता. आता श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व करताना नाशिकची ही लेक पुन्हा एकदा आपल्या खेळाची चमक दाखवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.