FIFA World Cup 2026 : एर्लिंग हालांडचा दुहेरी धमाका; इराकवर 4-1 विजय मिळवत नॉर्वेची विजयी सुरुवात
June 17, 2026 02:08 PM
Mumbai : फिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेने दमदार सुरुवात करत ग्रुप-I मधील पहिल्या सामन्यात इराकचा 4-1 असा पराभव केला. स्टार स्ट्रायकर एर्लिंग हालांडने (Erling Haaland) दोन गोल झळकावत विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात मोठी छाप पाडली. या विजयासह नॉर्वेने तीन गुणांची कमाई करत ग्रुपमध्ये अव्वल स्थान पटकावले.
इराकची चूक, हालांडचा फायदा
बॉस्टन येथे झालेल्या या सामन्यात नॉर्वेने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. 29व्या मिनिटाला अँटोनियो नुसाच्या शानदार पासवर डेव्हिड मोलर वुल्फने केलेल्या क्रॉसला हालांडने अचूक स्पर्श करत गोल नोंदवला आणि नॉर्वेला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.मात्र इराकनेही हार मानली नाही. 39व्या मिनिटाला आमिर अल-अम्मारीच्या क्रॉसवर अयमन हुसेनने जबरदस्त हेडर मारत स्कोअर 1-1 असा बरोबरीत आणला. बरोबरीनंतर इराकचा आत्मविश्वास वाढला होता. पण पहिल्या हाफच्या अखेरीस झालेल्या एका मोठ्या चुकीचा नॉर्वेने पुरेपूर फायदा घेतला. गोलरक्षक जलाल हसन याने बॅकपासवर उशिरा प्रतिक्रिया दिली आणि त्याचा क्लिअरन्स हालांडच्या पायाला लागून थेट गोलमध्ये गेला. त्यामुळे नॉर्वेने पुन्हा 2-1 अशी आघाडी घेतली.या गोलसह हालांडने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 51 सामन्यांत 57 गोलांचा टप्पा गाठला.
ऑस्टिगार्डने विजयावर शिक्कामोर्तब केले
दुसऱ्या हाफमध्ये इराकने पुनरागमनाचा प्रयत्न केला.इब्राहिम बायेश, अली अल-हमादी आणि अकाम हाशिम यांनी काही चांगल्या संधी निर्माण केल्या, मात्र नॉर्वेच्या बचावफळीने त्यांना यश मिळू दिले नाही.76व्या मिनिटाला मार्टिन ओडेगार्डच्या कॉर्नरवर बदली खेळाडू लिओ ऑस्टिगार्डने शानदार हेडरद्वारे गोल करत नॉर्वेची आघाडी 3-1 अशी वाढवली.सामन्याच्या अतिरिक्त वेळेत हालांडला हॅट्ट्रिकची संधी होती, पण इराकचा गोलरक्षक हसनने उत्कृष्ट बचाव केला. मात्र काही क्षणांनंतर हालांडच्या हेडरमुळे निर्माण झालेल्या गोंधळात अयमन हुसेनकडून आत्मघातकी गोल झाला आणि नॉर्वेने 4-1 असा दणदणीत विजय मिळवला. याच गटातील दुसऱ्या सामन्यात फ्रान्सने सेनेगलवर 3-1 असा विजय मिळवला. मात्र अधिक गोलफरकामुळे नॉर्वे सध्या ग्रुप-I मध्ये अव्वल स्थानावर आहे. आता 22 जून रोजी नॉर्वेचा पुढील सामना फ्रान्सविरुद्ध होणार असून,या लढतीकडे सर्व फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागले आहे. एर्लिंग हालांडच्या दुहेरी गोलांच्या जोरावर नॉर्वेने विश्वचषक मोहिमेची शानदार सुरुवात केली असून, आता फ्रान्सविरुद्धच्या सामन्यात त्यांची खरी परीक्षा पाहायला मिळणार आहे.