TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे पोलिसांनी (Thane Police)  भिवंडीत पर्दाफाश केला आहे. २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या 'शिक्षक पात्रता परीक्षेचा' (TET) (Teacher Eligibility Test) पेपर चक्क दीड कोटी रुपयांना विकला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोंनगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे परीक्षेच्या काही तास आधीच तीन आरोपींना रंगेहाथ बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली प्रश्नपत्रिका 'ओरिजिनल' असल्याचे खुद्द शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.



कसा रचला गेला सापळा ?


या संपूर्ण कारवाईची सुरुवात एका अत्यंत गुप्त आणि खात्रीलायक माहितीवरून झाली. भिवंडी परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त (DCP) डॉ. पवन बनसोड यांना २७ जून रोजी टीईटीचा पेपर विकण्यासाठी काही जण भिवंडीत येणार असल्याची पक्की खबर मिळाली. या माहितीची गंभीर दखल घेत ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण आणि अपर पोलीस आयुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने विशेष पथके तैनात करण्यात आली. पोलिसांनी कोंनगाव परिसरात अचूक सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत टीईटीच्या प्रश्नपत्रिकेचे संच सापडले. तत्काळ शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून खात्री केली असता, हा उद्या होणाराच मुख्य पेपर असल्याचे निष्पन्न झाले आणि पोलिसांनी तिघांनाही जागीच अटक केली.



दीड कोटींची डील आणि थेट परराज्य कनेक्शन!


या पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्राबाहेर पोहोचले आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी दोन आरोपी बिहारचे, तर एक जण हरियाणाचा रहिवासी आहे. या आरोपींकडून प्रश्नपत्रिकेचे तब्बल ४ सेट, मोबाईल फोन आणि काही डेबिट कार्ड्स जप्त करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पेपर तब्बल १.५ कोटी रुपयांना विकला जात होता. या टोळीने अन्य काही ठिकाणीही पेपरची विक्री केल्याचा दाट संशय आहे. सध्या या रॅकेटचा मुख्य सूत्रधार (मास्टरमाईंड) फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.



कोचिंग क्लासेस रडारवर


पेपरफुटीचे मुख्य स्त्रोत शोधण्यासाठी पोलिसांनी सर्व शक्यता पडताळून पाहण्यास सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्तांच्या मते, प्राथमिक तपासात तरी शिक्षण विभागातील कोणत्याही अधिकाऱ्याचा यात सहभाग आढळून आलेला नाही. मात्र, विद्यार्थ्यांना पेपर पुरवण्यामध्ये खासगी कोचिंग सेंटर्सची मोठी भूमिका असू शकते, त्यामुळे परिसरातील अनेक 'कोचिंग क्लासेस' आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. मुख्य आरोपीच्या अटकेनंतरच पेपर छपाई केंद्रातून फुटला की अन्य कुठून, हे स्पष्ट होईल.



तपासासाठी धडक 'SIT'ची स्थापना


लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलिसांनी तात्काळ एक 'विशेष तपास पथक' (SIT) स्थापन केले आहे. पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोड स्वतः या 'एसआयटी'चे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या दिमतीला सचिन सांगळे, डी. विजय मराठे यांच्यासह ९ पोलीस निरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचे अनुभवी अधिकारी देण्यात आले आहेत. ही प्रश्नपत्रिका या आंतरराज्य टोळीच्या हाती कशी लागली? त्यांनी महाराष्ट्रात कोणकोणत्या उमेदवारांशी आणि दलालांशी संपर्क साधला? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके आता परराज्यांत आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत रवाना करण्यात आली आहेत.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने