Dhule : धुळ्यात एलपीजी गॅसचा काळाबाजार उघड; ८३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Dhule : धुळे जिल्ह्यात एलपीजी गॅसच्या (LPG gas) काळाबाजाराचा मोठा पर्दाफाश झाला आहे. साक्री तालुक्यातील मैंदाणे येथे महसूल आणि पुरवठा विभागाने (Revenue and Supply Department) मध्यरात्री धाड टाकत एलपीजी टँकरमधून थेट व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरून विक्री करणाऱ्या अवैध रॅकेटचा भांडाफोड केला. या कारवाईत तब्बल ८३ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतर आरोपी अंधार आणि मुसळधार पावसाचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.



नेमकी घटना घडली कुठे ?


साक्री तालुक्यातील मैंदाणे गावाजवळ असलेल्या श्री बालाजी हॉटेल राजस्थानी दालबाटी ढाबा परिसरात हा संपूर्ण प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती महसूल आणि पुरवठा विभागाला मिळाली होती. त्यानुसार अपर तहसीलदार अधिकार पेंढारकर (Adhikar Pendharkar) यांच्या नेतृत्वाखाली पुरवठा निरीक्षक आणि महसूल विभागाच्या पथकाने सात जुलैच्या रात्री सुमारे अकरा वाजता अचानक छापा टाकला.


कारवाईदरम्यान घटनास्थळी भारत पेट्रोलियमचा अशोक लेलंड कंपनीचा एलपीजी टँकर उभा असल्याचे आढळून आले. या टँकरच्या व्हॉल्व्हला रबरी पाईप आणि सहा तोंडी विशेष नोझल जोडण्यात आले होते. त्याद्वारे थेट १९ किलो क्षमतेच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये एलपीजी भरला जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.



संशयित घटनास्थळावरून ताब्यात


अधिकाऱ्यांचे पथक पाहताच घटनास्थळी उपस्थित असलेले बहुतांश संशयित अंधाराचा आणि मुसळधार पावसाचा फायदा घेत पळून गेले. मात्र भरत चौधरी या संशयिताला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत त्याने पारस जैन, महारू चंदू ठाकरे उर्फ गोपी, मनिषभाई आणि विक्की बारडोली यांच्या साथीने हा अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती दिल्याचे अधिकृत तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, टँकरमधून भरलेला हा गॅस महाराष्ट्रासह गुजरातमध्ये विक्रीसाठी पाठवला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे. त्यामुळे या अवैध रॅकेटचे जाळे राज्याबाहेरही पसरले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.



८३ लाखांचा मुद्देमाल जप्त


छाप्यामध्ये सहा भरलेले आणि अकरा रिकामे असे एकूण १७ व्यावसायिक गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. याशिवाय एलपीजीने भरलेला टँकर, सुपर कॅरी वाहन, दोन बोलेरो पिकअप, सहा तोंडी नोझल, प्लास्टिकचे पाईप, गॅस फिटिंगची साधने आणि मोबाईल असा एकूण ८३ लाख ३५ हजार ७४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. टँकरमध्ये तब्बल १७.४० मेट्रिक टन एलपीजी गॅस असल्याची नोंद करण्यात आली आहे.


प्रशासनाच्या मते, एलपीजी टँकरमधून थेट व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरणे हा अत्यंत धोकादायक प्रकार आहे. अशा प्रकारामुळे कोणत्याही क्षणी भीषण स्फोट किंवा आग लागू शकते. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितासह मालमत्तेलाही मोठा धोका निर्माण झाला होता. या प्रकरणी टँकरचे मालक पी. नटराजन पलानीसामी, संबंधित वाहनांचे मालक आणि चालक, भरत चौधरी, पारस जैन, महारू चंदू ठाकरे उर्फ गोपी, मनिषभाई बारडोली तसेच इतर संबंधितांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून या गॅस काळाबाजारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस आणि पुरवठा विभागाकडून सुरू आहे.

Comments
Add Comment

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Apple iPhone18 : iPhone 18 Pro, Pro Maxच्या प्री-ऑर्डरला विलंब? १२ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता

मुंबई : ॲपलच्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxची उत्सुकता वाढली असून, या दोन्ही प्रीमियम मॉडेल्सच्या प्री-ऑर्डरची तारीख

Nashik Crime : समृद्धी महामार्गावरील दरोड्याप्रकरणी सात जण ताब्यात, ५ फरार आरोपींचा शोध सुरू

Nashik Crime : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या