मोक्षाची अनुभूती

ऋतुराज-ऋतुजा केळकर


“क्षणिक सुखासाठी अपुल्या
कुणी होतो नीतीभ्रष्ट
कुणी त्यागी जीवन अपुले
दु:खं जागी करण्या नष्ट
देह करी जे जे काही
आत्मा भोगितो नंतर
जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो रे ईश्वर ”


एक असे गीत आहे की, ज्याचा अर्थ कुणालाही खऱ्या अर्थाने कळलाच नाही. त्याचे कारणही तसेच आहे. आज सारेचजण ऐहिक सुखाच्या उपभोगत अडकलेले आहेत. इथे मला एक जंगलच्या राजाची सिंहाची एक छोटीशी, साधीशी कथा आठवते आहे. तर कथा अशी आहे, जंगलातील एक सिंह अनेक दिवस उपाशी होता. एक दिवस त्याला एक छोटासा गोजिरवाणा ससा दिसला. पण त्याने विचार केला “या छोट्याशा सशाने माझं पोट कसं भरणार?” म्हणून त्याने त्याला सोडून दिलं. पुढे त्याला एक धष्टपुष्ट काळवीट दिसलं. सिंहाने त्याच्यावर हल्ला केला, पण उपासमारीने थकलेल्या शरीरात ताकद उरली नव्हती आणि सिंहाला पाहून काळवीट जोराने पळून गेलं आणि सिंह काही त्याचा पाठलाग करू शकला नाही. शेवटी सिंहाने ठरवलं की, “जाऊदे आता निदान छोटासा ससा तर ससा त्याला तरी खाऊन पोट भरावं.” पण एव्हाना ससा सिंहाची चाहूल लागल्यामुळे पळून गेला होता. अशा रीतीने सिंह आपल्या कर्मामुळे उपाशी राहिला. कथा तशी खूपच साधी आहे आणि त्याचा निष्कर्ष देखील. आपल्या एका निर्णयामुळे आपल्याला दूरगामी परिणाम हे भोगावे लागतात.



अगदी साध्या शब्दात सांगायचे झाले तर जसं एखाद्या स्वयंपाकघरात लहान वाटीतील थोडं अन्न नाकारलं जातं, तसा सिंहाने समोर आलेला तो गोजिरवाणा ससा नाकारला. त्याला वाटलं की, “ही छोटी वाटी त्याच्या भुकेला पुरेशी नाही.” पुढे त्याला मोठ्या परातीत भरलेलं जेवण म्हणजे धष्टपुष्ट काळवीट दिसलं. पण जेव्हा त्याने त्या परातीवर हात मारला, तेव्हा ती परात जोराने निसटून गेली. उपासमारीने थकलेल्या सिंहाकडे ती पकडण्याची ताकदच उरली नव्हती. शेवटी, सिंहाच्या ताटात काहीच उरलं नाही. “वाटीही रिकामी, परातही रिकामी” आणि सिंहाच्या पुढ्यात फक्त रिकामं ताट उरलं.



ही कथा आपल्याला सांगते की जीवनात छोट्या संधी नाकारून मोठ्या संधीच्या मागे धाव घेतली, तर शेवटी दोन्ही हातातून निसटतात. जसं स्वयंपाकघरात भांड्यांचा आवाज आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक कणाचं महत्त्व आहे, तसंच जीवनात प्रत्येक क्षणाचं महत्त्व आहे. सिंहाची उपासमार म्हणजे रिकाम्या भांड्यांचा आवाज जो आपल्याला शिकवतो की कर्माने मिळालेलं जे काही आहे, त्याची किंमत ओळखली नाही, तर शेवटी फक्त शून्य उरते आणि हेच तर जीवनाचं गूढ तत्त्वज्ञान आहे. देह जे काही करतो मग तो लहानसहान निर्णय असो वा कुठलाही मोठा, त्याचे परिणाम आत्म्याला भोगावे लागतात. सिंहाने छोट्या सशाला नाकारलं, मोठ्या काळविटाच्या मागे धाव घेतली, पण शेवटी दोन्ही हातातून निसटले. हे त्याच्या देहाचे कर्म होते. पण त्याचा परिणाम आत्म्याला म्हणजेच त्याच्या अस्तित्वाला उपासमारीच्या रूपाने भोगावा लागला.



जीवनात प्रत्येक कर्माचं महत्त्व आहे. कणभराने देखील संपूर्ण परातभर पदार्थ हा बिघडू शकतो. अर्थात,जीवनात प्रत्येक क्षण हा कणासारखा असतो. त्याला दुर्लक्षित केलं तर संपूर्ण जीवनाची परात रिकामी होऊ शकते आणि हीच कर्माची शिकवण आहे आणि हाच ईश्वराचा न्याय म्हणजे कर्माचं भांडं अर्थात, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ. ज्याने छोट्या संधीची किंमत ओळखली नाही, त्याला मोठ्या संधीचं फळही मिळत नाही. आणि ज्याने प्रत्येक कणाचं महत्त्व ओळखलं, त्याला जीवनाच्या परातीतील भरभरून सुग्रास अन्न मिळतं. कसं आहे ना की, आजच्या जीवनात माणूस सतत तृष्णेच्या घुंगुरवाळ्यात अडकलेला आहे. छोट्या संधी नाकारून मोठ्या स्वप्नांच्या मागे धाव घेतो, पण शेवटी दोन्ही हातातून निसटतात. नोकरीत, नातेसंबंधात किंवा दैनंदिन निर्णयांत आपण वाटीतील अन्न नाकारतो आणि परातीच्या मागे धावतो. पण जेव्हा परात निसटते, तेव्हा आपल्या ताटात फक्त रिकामं भांडं उरतं. हीच कथा आपल्याला सांगते की जीवनात प्रत्येक क्षणाचं महत्त्व आहे. जन्मांध सावली जशी प्रकाशाला ओळखत नाही, तशीच आपण छोट्या संधींची किंमत ओळखत नाही. पण त्या सावलीतूनच प्रकाशाचा मार्ग सापडतो. कर्म म्हणजे वाळूतील पाऊलखुणा असल्या तरी त्या खुणा कधी पुसल्या जातात, कधी टिकून राहतात. पण प्रत्येक खुण आत्म्याला पुढे नेते. कर्माच्या वाळूतील पाऊलखुणा या काळाच्या लाटांनी पुसल्या जाऊ शकतात, पण त्यांचा ठसा आत्म्यावर कायम राहतो. त्यांना दुर्लक्षित केलं तर संपूर्ण आयुष्य वैरण होऊ शकते.
मोक्ष प्राप्तीचा मार्ग हा क्षणभंगुर सुखांच्या पाचोळ्यासारखा हलका नाही, तर तो कर्माच्या वाळूतील पाऊलखुणांनी उमटलेला गहिरा प्रवास आहे. प्रत्येक खुण आत्म्याला पुढे नेते, अज्ञानाच्या जन्मांध सावलीतून बाहेर काढते. तृष्णेच्या घुंगुरवाळ्यात अडकलेला जीव जेव्हा मुक्त होतो, तेव्हा त्याला नक्षत्रावरून आलेली पर्जन्यसुक्ताची माहेरवाशिणीची हाक ऐकू येते आणि तीच मोक्षाची खरी अनुभूती आहे.



आई जगदंबेने तळपायाच्या नोंदी करून आपल्याला या जगताच्या भूलभुलय्यामध्ये प्रारब्धवादी वसंतोत्सवात आपल्या कर्माचे घोडे दौडण्याकरिता पाठवले आहे. या तळपायाच्या नोंदी म्हणजे जीवनातील प्रत्येक पाऊल. त्या नोंदी कधी वेदना देतात, कधी सुख देतात. यातील प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक कर्माच्या घोड्याची टाच ही आत्म्याच्या प्रवासात एक ठसा उमटवते, जे पुढे जाऊन प्रत्येकाला कर्माचा खरा अर्थ समजावते पण, या नोंदी केवळ ठसेच नसतात, त्यांच्यासोबत एक ओझंही वाहिलं जातं. त्या पावलांनी निर्माण झालेलं ओझं म्हणजेच भलावण होय. हे ओझं कधी हलकं वाटतं, कधी जड होतं, पण तेच आत्म्याला पुढे नेणारं असतं. भलावण म्हणजे कर्माचं वजन, जे जीवनाच्या प्रवासाला दिशा देतं आणि आत्म्याला त्याच्या मार्गावर पुढे नेतं.
आणि शेवटी, ईश्वराचा न्याय म्हणजे नक्षत्रावरून आलेली पर्जन्यसुक्ताची माहेरवाशिणीची हाक. ती हाक आपल्याला आठवण करून देते की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ. ज्याने छोट्या संधीची किंमत
ओळखली नाही, त्याला मोठ्या संधीचं
फळही मिळत नाही.
अखेरीस माझ्याच शब्दात सांगायचं
झालं तर...
“तृष्णेच्या घुंगुरवाळ्यात जीव गुंतला...
जन्मांध सावलीत सत्य हरपला...
तळपायाच्या नोंदींनी कर्माच्या
पाऊलखुणा उमटल्या...
नक्षत्राच्या भलावण वाहून मोक्षाच्या
ठसा उमटवल्या...”

Comments
Add Comment

Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तसं पाहिलं तर

Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना!

शारदीय नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. पितृपक्ष संपला की दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते. अश्विन महिन्यातील

Sarvapitru Amavasya 2026 : पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, ‘हा’ दिवस ठरणार महत्त्वाचा ! संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी

Sarvapitru Amavasya 2026 : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजेच

Navratri Festival : यंदा नवरात्रीत अष्टमी-नवमी एकाच दिवशी, जाणून घ्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखा

Navratri Festival : नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी यंदाचं नवरात्र विशेष ठरणार आहे. देवीच्या नऊ

Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

Navratri 9 Days Colours 2026: शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये

Shardiya Navratri 2026: नवरात्रीत एका दिवशी पडणार दोन माळ, अष्टमी आणि नवमी तिथीबाबत जाणून घ्या

हिंदू धर्मात शारदीय नवरात्रोत्सवचं विशेष महत्त्व आहे. या नऊ दिवसात देवीचा जागर केला जातो. देवीच्यी नऊ रुपांची