डेंग्यूच्या (Dengue) वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (CDSCO) जपानच्या ताकेडा कंपनीने विकसित केलेल्या 'क्युडेन्गा' (QDENGA) या डेंग्यू लशीला (Vaccine) मंजुरी दिली आहे. यामुळे भारतात डेंग्यूविरोधातील पहिली अधिकृत लस उपलब्ध होणार आहे. दरवर्षी लाखो लोकांना डेंग्यूचा फटका बसत असल्याने ही लस सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

क्युडेन्गा (TAK-003) ही लस डेंग्यूच्या चारही प्रकारच्या विषाणूंविरुद्ध संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या लशीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लस घेण्यापूर्वी व्यक्तीला यापूर्वी डेंग्यू झाला होता की नाही, याची रक्त तपासणी करण्याची गरज नसते. ही लस त्वचेखाली दिली जाते आणि 3 महिन्यांच्या अंतराने 2 डोस घ्यावे लागतात. यापूर्वी या लशीला युरोप, ब्रिटन, ब्राझील आणि इतर अनेक देशांमध्येही मंजुरी मिळाली आहे. (Health Update)

तिसऱ्या टप्प्यातील आंतरराष्ट्रीय चाचण्यांमध्ये 20,000 हून अधिक मुलांवर या लशीची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका सुमारे 84 टक्क्यांनी कमी होत असल्याचे आढळले. तसेच सर्व प्रकारच्या डेंग्यूपासून सुमारे 61 टक्के संरक्षण मिळत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. (Dengue Prevention)

या लशीची भारतातील किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र
हैदराबादमधील बायोलॉजिकल ई कंपनीसोबत उत्पादनासाठी करार झाल्याने मोठ्या प्रमाणात देशातच लस तयार केली जाणार आहे. त्यामुळे तिची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Vaccine)

तज्ज्ञांच्या मते, लस उपलब्ध झाली असली तरी डेंग्यूविरोधातील खबरदारी कमी करता येणार नाही. डासांची पैदास रोखणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि तापाची लक्षणे दिसताच वेळेवर उपचार घेणे तितकेच आवश्यक राहणार आहे. त्यामुळे लस ही संरक्षणाचे महत्त्वाचे साधन असले तरी प्रतिबंधात्मक उपाय सुरू ठेवणे गरजेचे आहे. (Dengue In India)